‘अध्यक्ष महोदय, राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २८८ जणांच्या वतीने मी इथे बोलण्यासाठी उभा आहे. माझा आवाज थोडा मोठा असल्याने माझे बोलणे ‘ओरडण्यासारखे’ वाटेल पण तसे ते समजू नये अशी विनंती मी आधीच करतो. आमच्यासाठी लागू केलेल्या आचारसंहितेचा मुद्दा सध्या राज्यभर गाजतोय. गेल्या वर्षभरापासून त्याचे कटाक्षाने पालन सुरू झाल्याने अनेकांवर कारवाई झालेली. मी कुणाच्याही बेशिस्तीचे समर्थन करणार नाही पण या संहितापालनाच्या अतिरेकामुळे अनेकांवर नाहक अन्याय होतोय. तो कसा ते मी तुमच्या निदर्शनास आणून देतो. ही संहिता वाचून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. तेव्हा छडीचा धाक होता, आता संहितेचा आहे. तेव्हा बाकावर उभे राहणे ही शिक्षा असायची, आता उभे राहिल्यावर शिक्षा मिळू लागलीय. त्यामुळे माझ्या नातीने ‘आजोबा तुम्ही पण ‘स्कूल’मध्ये जाता का?’ असा प्रश्न विचारला. आमच्या शाळेत ‘पुस्तकातले उतारे’ वाचू देतात, तुमच्या का नाही या तिच्या प्रश्नाचे उत्तर मला देता आले नाही. आमच्या क्षेत्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या आम्हाला वर्तमानपत्रामधूनच कळतात. त्यावरून आम्ही सभागृहात बोलतो. आता वर्तमानपत्र आत आणायचा नाही म्हणजे अख्खी बातमी पाठ करणे आले. तुम्हीच सांगा अध्यक्ष महाराज, या वयात एवढे पाठांतर कसे शक्य आहे? आत वर्तमानपत्र फडकावले नाही तर माध्यमे नाराज होतील त्याचे काय? घोरणे ही जागतिक समस्या आहे. तरीही या मुद्दय़ावरून अनेकांवर कारवाई झाली. त्यामुळे अनेक सहकारी सरकारी खर्चाने रुग्णालयात दाखल होऊ लागल्याने तिजोरीवर अतिरिक्त ताण पडू लागलाय. यंत्रणेने कितीही दावा केला तरी सभागृहात ढेकणांचा सुळसुळाट आहे. एका सहकाऱ्यावर त्यांचे ‘रक्तपिपासू’ प्रयोग सुरू झाल्याबरोबर तो अगतिकतेतून अंगविक्षेप करू लागला. कामकाज सुरू असल्याने व त्यात तोच बोलत असल्याने त्याची फारच पंचाईत झाली. त्याला काय झाले हे न विचारताच ‘विशिष्ट पवित्रा’ घेतला म्हणून निलंबित केले. त्यावर तातडीने शेजारच्या सहकाऱ्याने ‘त्यांना असे असे झाले’ हे सांगण्याचा प्रयत्न करताच मध्येच उठून ‘तृतीय पुरुषी’ संबोधन केले म्हणून कारवाई करण्यात आली. आपले एक सहकारी काव्यातून बोलण्यामुळे त्यांच्या भागात लोकप्रिय आहेत. या संहितेमुळे त्याच्या तोंडावर कुलूपच लागले. आता तुम्हीच सांगा, त्यांनी प्रश्न कसे मांडायचे? येथे अनेक मधुमेहग्रस्त आहेत. धोका व्हायला नको म्हणून ते बिस्कीटचा पुडा सोबत ठेवतात. त्यांनी स्वत: खाल्ले व सौजन्याने इतरांना दिले म्हणून कारवाई करणे कसे योग्य ठरू शकते? महोदय, तुम्हाला पाठ दाखवणे हा संहिताभंग असल्याने काही सदस्यांनी तुमच्याकडे तोंड करून उलटी पावले टाकत बाहेर जाण्याचा प्रयोग केला. त्यात काही पडले, काहींची विरोधी सदस्यांशी टक्कर झाली. त्याची तक्रार होताच लगेच कारवाई झाली. आता किमान उलटे चालण्याचे प्रशिक्षण तरी आम्हाला द्यावे, जेणेकरून कारवाई होणार नाही. एका नवीन सहकाऱ्याची पत्नी गॅलरीत बसली होती. त्याने भाषण करताना तिच्याकडे फक्त प्रेमाने पाहिले, ‘खाणाखुणा’ही केल्या नाहीत, तरी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पत्नीकडे बघणे हाही या राज्यात गुन्हा ठरू लागणे हे दुर्दैवी नाही का? या संहितापालनाने सभागृहाची शाळा करून टाकलीय. तेव्हा यावर तातडीने पुनर्विचार व्हावा अशी विनंती करून थांबतो. (नंतर बराच काळ बाके वाजत राहतात)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा