सल्लूभाई, अरे काय चालवलंय काय आहे तुझ्या लोकांनी. तुझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मी तुला कडकडून भेटायला काय आलो तर किती चर्चा. बाकी तू असल्यावर ती होणारच म्हणा.. तू काही चांगलं कर, नाही तर वाईट कर.. नाम तो होना ही है.. अरे पण ते करताना थोडा विचार तरी करशील का नाही.. राजस्थानात सिनेमाचं शूटिंग करायला गेलास ते कुठल्या तर ‘हम साथ साथ है..’ मग या ‘साथ साथ’मध्ये फक्त माणसंच येतात होय रे ? तिथे जाऊन सगळे नियम, कायदेकानू गुंडाळून ठेवलेस आणि माझ्या भाईलोकांची शिकार केलीस तर सगळे येणारच ना अंगावर. वर ‘टायगर’ सिनेमात तू काय म्हणतोस.. ‘शिकार तो सब करते है, लेकिन टायगर से बेहतर कोई शिकारी नही..’ अरे, पण वाघसुद्धा भूक लागते तेव्हाच शिकार करतो, उगीच गंमत म्हणून दुसऱ्या प्राण्याला मारत नाही ना भावा.. पण खरं सांगतो, या प्रकरणानंतर आम्हा प्राण्यांना खरोखर वाटलं होतं, की एवढय़ावर तरी तू शहाणा होशील. पण त्यानंतर चार वर्षांनी तर तुझी गाडी माणसांवरच घसरली. अरे बाबा, ‘जिंदगी में तीन चीजे कभी अंडरएस्टिमेट ना करना, आय, मी, मायसेल्फ’ हा तुझा स्वत:चाच डायलॉग किती खरा करून दाखवशील ? शेवटी म्हणे तुला कुणी तरी सल्ला दिला ‘माणूस’ बनण्याचा आणि तू माणूस आहेस हे जगाला दाखवण्याचा. मग ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नहीं सुनता’ असं म्हणत तू कामाला लागलास म्हणे. ‘बीईंग ह्यूमन’ हा कपडय़ांचा ब्रँड नसून ती तुझी संस्था आहे नि शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करते असं ऐकलंय. शिवाय फारसे कपडे घालणंही परवडत नाही अशा परदेशांतून येणाऱ्या गरीब बिचाऱ्या विस्थापित मुलींना बॉलीवूडमध्ये रोजगार मिळवून देण्याचा परोपकारही तू करतोस असं कानावर आलं आहे. त्यांचं हिंदूी सुधारून देण्याची जबाबदारीही तूच पेलतोस म्हणे. तसा तू मनाने वाईट नाहीस, जगच तुझ्याशी वाईट वागतं असं तुझ्या वडिलांचंही मत आहे. त्यांना बिचाऱ्यांना आपल्या या ५६ वर्षांच्या बबडय़ाचं कसं होणार अशी अजूनही काळजी वाटते. साहजिकच आहे रे, शेवटी बापाचंच हृदय ते. तुझ्या सगळय़ा चाहत्यांना मात्र तुझं लग्न कधी होणार आणि तू रांगेला कधी लागणार हीच काळजी (अजूनही) वाटते. बाकी तुझं काहीही असो, पण तुझ्यामधला उपवर मात्र अगदी शहाणासुर्ता आहे. म्हणूनच त्या एका मुलाखतीत तू सांगून टाकलंस की ‘कसं करू लग्न? माझ्यावर आधीच एवढय़ा कोर्ट केसेस आहेत. मी कधीही तुरुंगात जाऊ शकतो तर कशाला उगीच एखाद्या बिचारीचं आयुष्य संकटात घालू? ’ तुझं हे जे काही ‘सलमानपण’ आहे ना ते फार भारी आहे. तू काही शाहरूखसारखं मार्केटिंग करायला जात नाहीस की आमिरसारखा मीही कसा बुद्धिमान असं दाखवायला जात नाहीस. मी आहे हा असा आहे, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या हा तुझा पवित्रा गडय़ा फार भारी. तो आपल्याला फार आवडतो. तू माझ्या एरियात येऊन राहतोस आणि त्या दिवशी योगायोगाने दिसलास म्हणून कडकडून भेटलो तर नतद्रष्ट लोक ‘सलमानला साप चावला’ म्हणून बातम्या करायला लागले. बरं, बरं थांबतो इथेच. कारण परत तू म्हणशीलच की ‘मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हूं, समझ में नहीं..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा