नाही नाही, अत्तर ते परफ्यूम हा समाजवादाचा प्रवास वैचारिकतेकडून प्रतीकाकडे जाणारा आहे असे समजण्याचे काहीच कारण नाही. काळानुरूप सुगंधाचे स्वरूप बदलले एवढेच. बाकी तेच वैचारिक अधिष्ठान, तेच बुद्धिचातुर्य कायम आहे हो पक्षात. भलेही एकाच यादव कुळातले ३७ जण राजकारणात पदे भोगत असतील, पण ते सारे विचाराने अगदी साधे समाजवादीच. आता तुम्ही म्हणाल की अखिलेशभाऊंनी आणलेल्या परफ्यूमने काय फरक पडणार? अहो, बघतच राहा, त्या योगी राजवटीतली दुर्गंधी हा नवा सुगंध कसा दूर करतो ते! आणि कृपा करून याचा संबंध त्या जुन्या काळातल्या राजनारायणांशी जोडू नका. ते एकीकडे अत्तर लावायचे व दुसरीकडे पक्षात वादाची दुर्गंधी पसरवायचे. यावरून त्यांना मोरारजींनी टोकलेही होते म्हणे. हे जुने जाऊ द्या. आताचा परफ्यूम तसा नाहीच. तो एकदा अंगावर फवारला की वाद घालण्याची सवयच नष्ट होते. म्हणून तर भाऊंनी एक बाटली हळूच शिवपाल काकांकडे पाठवून दिलीच. बघा ना! त्यांनी ती लावायला सुरुवात केल्याबरोबर कशी भाषा बदलली त्यांची. शेवटी एकेक करत साऱ्यांची मोट जोडायची म्हणजे काही तरी साधन हाताशी लागणारच ना! केवळ सायकलवर विसंबून कसे चालेल? याची एकच कुपी शंभरांना जवळ आणते. शिवाय हा सुगंध म्हणजे नवतेचा आविष्कार. त्यामुळे त्यात पर्यायही वेगवेगळे. कुणाला कोणता आवडतो हे लक्षात ठेवले की झाली कामगिरी फत्ते! त्यामानाने सायकल जुनी झालेली. मग नवा प्रयोग केला तर काय वाईट. त्या योगींच्या माणसांचे सोडून द्या हो. काहीही केले की टीका करतातच बेटे. नुसते ज ला ज व ट ला ट जोडण्यातच आयुष्य चालले त्यांचे. आता बघा हा सुगंध कसा उत्तर प्रदेशभर दरवळतो ते! एकदा कपडय़ांना लागला की सायकल चालवण्याची ऊर्मी येईल. ‘एमवाय’ समीकरणाच्या बाहेर जाऊन विचार करण्याची शक्ती प्रदान करेल. आपण जो विचार करतो तोच सर्वश्रेष्ठ आहे अशी भावना मनात बळावेल. दृष्टीत जबरीने घुसवण्यात आलेला धार्मिक भेद आपसूकच नष्ट करेल. ज्यांच्या मनात समाजवादाविषयी अढी आहे ती केवळ हा सुगंध नाकात शिरल्याने दूर होईल. एवढेच काय तर गटातटात विखुरलेल्या बाहेरच्या राज्यातील समाजवाद्यांना तो एकत्र आणेल. ते सारे नंतर भांडू असे म्हणत पक्षाच्या प्रचारात सहभागी होतील. आणि हो, यादवांमध्ये भिनलेली सरंजामी वृत्तीही तो दूर करेल. बघा, फायदेच फायदे! आता त्या योगींचा धुव्वा उडालाच म्हणून समजा. आतापर्यंत या परफ्यूमच्या चार लाख कुप्या खपल्यात म्हणे! रोज मागणी वाढतेय ती वेगळीच. काही शहाणे याला समाजवादाच्या नावावर भांडवलदारी असे रूप देताहेत. अहो, त्याची किंमत बघा ना! किती कमी आहे ते. सत्ता आली की साऱ्यांना फुकटातच वाटणार आहेत त्या कुप्या. तेव्हाच शांत बसतील हे. गेली असेल यादवांची सत्ता एखाद्या चुकीमुळे. म्हणून काय सुगंधी प्रचारही करायचा नाही? कार्याच्या सुगंधाचे म्हणाल तर तो सत्तेनंतर पसरणारच सगळीकडे. तोवर कुपी तर घ्या!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा