‘हे बघा, ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते जरा जास्तच खळखळ करायलेत. देशभर फिरण्याआधी त्यांच्या दारी जा. सरकारने केलेल्या ‘आझादी’च्या आवाहनाला त्यांचा प्रतिसाद कसा ते बघा व त्वरित अहवाल सादर करा..’ वरिष्ठांकडून अनौपचारिक सूचना मिळताच ‘देशभक्ती पडताळणी समिती’ने प्रतिभावंतांची यादी सोबत घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनी पहिले दार ठोठावले तर लेखकाच्या पत्नी समोर आल्या. समितीने परिचय देताच त्या भडाभडा बोलू लागल्या. ‘अहो, अकादमीकडून मेल आल्यापासून त्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झालीय. ‘मुगल साम्राज्याचा इतिहास’ हे लिहीत असलेले पुस्तकही त्यांनी थांबवलेय. रोज सकाळी उठून सिगारेटची पाकिटे घेऊन घराबाहेर पडतात. उपाशीपोटीच दिवसभर भटकतात, भरल्या पोटाने नाही. देश सोडण्याची भाषा सतत करतात. त्यांचे चित्त थाऱ्यावर यावे म्हणून मी मेल वाचून येत नसताना एक रांगोळी काढली पण त्याकडे त्यांनी ढुंकूनही बघितले नाही. त्यांचे काही बरेवाईट झाले तर बघा,’ असे म्हणत खाडकन् दार बंद झाले. मग समितीने दुसऱ्याकडे मोर्चा वळवला. भेट होताच ते उत्साहाने सांगू लागले, ‘मेल मिळाल्याबरोबर मी ‘अजेय हिंदुस्तान’ या ग्रंथाचे लेखन थांबवून देशभक्तीपर गाणी लिहिण्याचा सपाटा सुरू केला. आतापर्यंत शंभर गाणी शहरभर फिरून विविध संघटनांना दिली. त्यांना कार्यक्रमास लागणाऱ्या निधीसाठी चार लोकांकडे शब्द टाकला. माझ्या पत्नीने कॉलनीतल्या महिलांना एकत्र करून एक भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केलीय. मला फक्त दोनच कवींनी नकार दिला. त्यांना मी देश सोडा असे सांगून टाकले. आमच्या पुढाकाराने आयोजित सर्व कार्यक्रमांचे चित्रण करून मी अकादमीकडे पाठवणार. तुम्ही कशाचीही काळजी करू नका फक्त ते ‘पद्म’चे तेवढे बघा.’ हे ऐकून समिती आनंदली. ‘उत्तम’ असा शेरा लिहिल्यावर तिने तिसरीकडे प्रयाण केले. यादीतून पत्ता शोधत ते एका लहान घराजवळ गेले तर दाराला कुलूप. विजेत्याचेच घर होते ते. आजूबाजूला कुणाला विचारावे का, या विचारात असताना त्यांना दारावर एक कागद चिकटवलेला दिसला. ‘मी देशभक्तीपर गीते लिहिणार नाही वा कुणाला गायला सांगणार नाही. माझ्या मते रांगोळी ही अनावश्यक खर्चाची बाब. त्यासाठी कुणाला प्रवृत्त करणार नाही. मला पाठवलेला मेल हा भक्ती नाही तर सक्तीचा प्रकार आहे. मी लेखनासोबतच गरिबांच्या शोषणाविरुद्ध कायम लढा देत आलो. जोवर त्यांना न्याय मिळत नाही तोवर सर्वामध्ये देशभक्तीची भावना रुजणे शक्य नाही. मी ‘असली’ आझादीची लढाई लढण्यासाठी जातोय. मला शोधू नका. इन्कलाब जिंदाबाद!’ मजकूर वाचून समितीने रकान्यात प्रतिकूल असा शेरा लिहिला व पेन्सिलने कंसात ‘संशयित शहरी नक्षल’ अशी नोंद केली. मग समिती सदस्य चौथ्याकडे पोहोचले तर मोठे आवार रांगोळ्यांनी सजलेले. त्यांना पाहताच प्रतिभावंत व त्याचे अख्खे कुटुंब धावतच समोर आले. सर्वानी वाकून मुजरा केला. तिथला एक शेजारी समिती सदस्याच्या कानात कुजबुजला, ‘हा ‘जिधर दम उधर हम’वाला आहे’. तेवढय़ात प्रतिभावंताने सुरुवात केली, ‘मला विशेष सूत्रांकडून कळले होते, तुम्ही येणार म्हणून. मी जनमत बघून विचार मांडतो व लेखन करतो. देश सोडण्याची भाषा करणाऱ्या अनंतमूर्तीना खडसावणारा पहिला मीच. त्याआधी सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी घातली तेव्हा त्याला देशात येऊ देऊ नका असे मीच बोललो. तेव्हा आता तुम्ही चिंता करू नका. धडाक्यात अमृत महोत्सव साजरा होईल.’ हे ऐकून समिती सकारात्मक शेरा मारून निघाली. आणखी बऱ्याच घरी त्यांना जायचे होते..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा