नमस्कार, रामायण एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या सर्व साधुसंत व प्रवाशांचे रेल्वेतर्फे हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीला मिळालेला उदंड प्रतिसाद बघून आम्ही लगेच ही दुसरी फेरी आयोजित केली आहे. देशभरातील साधुसंतांची भूमिका ही सरकारच्या लेखी सर्वोच्च असल्याने त्यांच्या मागणीची दखल घेत आम्ही या फेरीत गाडीतील सेवकांच्या- वेटर्सच्या- पोशाखात पूर्णपणे बदल केला आहे. त्यांना भगव्याऐवजी इतर रंगाचे कपडे देण्यात आले असून रुद्राक्षाची माळ आता त्यांच्या गळ्यात नव्हे तर खिशात असेल. एखाद्या माळ विसरलेल्या साधूला जप करण्याची इच्छा झाल्यास वेटर ती लगेच काढून देईल. जपानंतर ती परत करणे बंधनकारक असेल. या १७ दिवसांच्या प्रवासात तुम्हाला मागाल तेव्हा बोरे मिळतील. ती उष्टावलेली अथवा चाखलेली नसतील याची हमी रेल्वे देत आहे. प्रवाशांमध्ये साधूंची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांनी कृपया बोरे खाल्ल्यावर त्याच्या बिया-गुठळ्या इतस्तत: फेकून अस्वच्छतेचे प्रदर्शन घडवू नये. या दीर्घ प्रवासात जेवण व न्याहरीची सोय आम्ही केलीच आहे. शिवाय रामफळ व सीताफळसुद्धा मागाल तेव्हा मिळेल. त्याची मागणी पैसे दिल्यावरच नोंदवता येईल. त्यामुळे यावरून साधू वाद उकरून काढणार नाहीत अशी अपेक्षा आहे. संपूर्ण गाडी वातानुकूलित असल्याने थंडीपासून बचाव करता यावा म्हणून खास साधूंसाठी उत्तेजनावर्धक चिलीमची व्यवस्था आम्ही केली आहे. ती ओढताना त्यातली जळती राख खाली पडून काही दुर्घटना घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे, अन्यथा लंकादहनासारखा अनर्थ ओढवेल. प्रवास करणाऱ्या साधूंना आंघोळ करावीशी वाटल्यास त्या इच्छेचे स्वागतच केले जाईल. श्रद्धा व परंपरा लक्षात घेऊन आम्ही डब्यातल्या न्हाणीघरात येणाऱ्या पाण्यात गंगाजलाचे मिश्रण केले आहे. त्यामुळे प्रवासात त्यांना गंगास्नानाचा आनंद घेता येईल. स्नानानंतर केस वाळवण्यासाठी साधूंनी दरवाजात उभे राहू नये. दार हीच लक्ष्मणरेषा समजावी, ती ओलांडली तर कोणते ‘रामायण’ घडू शकते याची कल्पना साऱ्यांना आहेच. रेल्वेसाठी देशभरातले सर्व आखाडे व त्यातले साधू समान आहेत. शिवाय आमची तिकीट वितरण यंत्रणा संगणकीकृत असल्याने ती आखाडय़ांत भेदभाव करत नाही. त्यामुळे साधूंनी डब्यात विरुद्ध आखाडय़ाचे साधू दिसले तर भांडण उकरून काढू नये व बोगीला ‘आखाडय़ा’चे स्वरूप देऊ नये. वयाच्या ज्येष्ठतेनुसार बर्थचे वाटप ही रेल्वेची परंपरा आहे, आखाडय़ातील पदानुसार नाही. त्यामुळे बर्थ वरचा का, खालचा का नाही असे फुटकळ वाद घालून शांतता भंग करू नये. या संपूर्ण प्रवासात डब्यात लागलेल्या स्क्रीनवर रामायणातले प्रसंग दाखवले जातील तसेच मध्येमध्ये नामवंत लोककलावंत त्यातील विविध पात्रांची वेशभूषा परिधान करून ‘लाईव्ह’ कला सादर करतील. त्या सर्वाशी प्रवाशांनी व विशेषत: साधूंनी सौजन्याने वागणे अपेक्षित आहे. हनुमानाचे पात्र साकारणाऱ्या कलावंताकडे मला खांद्यावर बसवून पुढचा प्रवास घडवून आण असला बालिश आग्रह कुणी धरू नये. रेल्वेतर्फे देण्यात येणारे पांघरूण ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे ती परत करताना स्वच्छ राहील याची काळजी प्रत्येकाने घ्यावी व राष्ट्राच्या स्वच्छता मोहिमेत ‘खारीचा वाटा’ उचलावा. प्रवासात ध्यानस्थ होताना, प्रवास कधी संपणार आहे याकडे लक्ष असू द्यावे, अन्यथा पुन्हा रामेश्वर ते सफदरगंज असा परतीचा प्रवास करावा लागेल व त्याचे भाडे भरावे लागेल. आपला प्रवास सुखकर होवो, धन्यवाद!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा