हल्ली वृत्तपत्रे घरपोच येण्यास विलंब होतो किंवा येतच नाहीत, म्हणून ‘चांदोबा’ वगैरे मासिकांचे जुने अंक हल्लीच फावल्या वेळात घर साफ करताना माळ्यावर सापडले, ते काढून हाताशी ठेवले आहेत. सकाळी चहा पिताना वृत्तपत्र हाती नसले, की त्यांपैकी एखादे मासिक काढून वाचतो.. आणि काय आश्चर्य! काही वेळा, जे वाचले ते ताजेच वाटू लागते. ही करामत बहुधा आमच्याकडील चहाची असावी. नमुना म्हणून, आम्ही आजच वाचलेली ही ‘सुवर्णमध्य’ नावाची गोष्ट संक्षेपाने पाहू : ‘‘कर्णावत नावाच्या देशात इंद्रसेन राजाच्या राज्याभिषेकानंतर सहा वर्षांनी एक विचित्र व्याधी लोकांना जडू लागली. राजधानी कर्णावतीतले अनेक पौरजन, श्रेष्ठी, योद्धे आणि प्रजाजन या व्याधीने गतप्राण होऊ लागले. व्याधी जडली आहे हे समजत नसे, पण गतप्राण झालेल्याचा कंठ निळा दिसे. नगरीतील वैद्यदेखील या व्याधीपुढे हरले. नाडीपरीक्षेने ही व्याधी समजत नाही, म्हणून उपचारही उमजत नाही असे म्हणत साऱ्या वैद्यांनी हात टेकले. अखेर काही ज्येष्ठ वैद्यांनी यावर एक परीक्षा शोधून काढली. सुवर्णपात्रात सलग तीन दिवस वारंवार उकळलेले पाणी प्यावयास दिले असता ज्याचा कंठ रक्तवर्णी (लालसर) होतो, त्यास या व्याधीची बाधा झाली असे समजावे. श्रेष्ठी आणि पौरजनांकडे मोठमोठी सुवर्णपात्रे होतीच. योद्धे आणि प्रजाजनांकडे मात्र नव्हती. आपल्या प्रजेला वाचविले नाही, तर योद्धे आणि प्रजाजन मिळून बंड करतील अशी राजास मनोमन भीती वाटली. राजनिष्ठ न्यायाधीशांनी ही भीती ओळखली आणि स्वत:हूनच आदेश दिला- ‘नगरीतील साऱ्या सुवर्णकारांनी सुवर्णपात्रे बनवावीत आणि व्याधीपरीक्षेसाठी वैद्यांकडे मोफत द्यावीत. वैद्यांनी मग प्रजेची व्याधीपरीक्षा मोफत करावी.’ आपणास कवडीही न घेता काम करावे लागेल, हे जाणून सुवर्णकार आणि काही वैद्य हबकले. मात्र राजाच्या भयाने त्यांनी मोफत काम सुरू केले. चारपाच दिवसांनी सुवर्णकारांच्या लक्षात आले की आपण दिलेली पात्रे वारंवार विस्तवावर ठेवल्याने झिजतात. ही झीज भरून कोण देणार? साऱ्याच वैद्यांनी कानांवर हात ठेवले. हा तंटा पुन्हा नगरीच्या न्यायाधीशासमोर गेला. तेव्हा न्यायाधीशांस आपली चूक उमगली खरी, पण स्वत:चा मान कायम ठेवीत न्यायाधीश म्हणाले : ‘तुम्हांस कोणी सांगितले साऱ्यांची व्याधीपरीक्षा मोफतच करा म्हणून? ज्यांच्या घरी सुवर्णालंकार आदी आहेत, त्यांच्याकडून पात्राच्या झिजेपेक्षा दीडपट सुवर्ण घ्यावे, त्याचे तीन वाटे करून दोन सुवर्णकारांना द्यावेत!’’’
.. ‘दारिद्रय़रेषा’ वगैरे शब्द त्या काळात नव्हते. नाहीतर ‘सुवर्णमध्य’ काढून स्वत:चा अवमान टाळणाऱ्या त्या न्यायाधीशांनी, आपला आदेश दारिद्रय़रेषेखालील प्रजेसाठी होता, असे स्पष्ट केले असते. मुद्दा तो नाही. मुद्दा हा की, सकाळी चहासोबत काहीतरी छापील वाचल्याने मनुष्यास शहाणपण येते!