आपला फेसबुकी झुक्या काहीच लपवून ठेवत नाही. सारे काही स्पष्ट व मोकळेपणाने सांगण्याची त्याची सवयच. त्यामुळे तोंडात एक पोटात एक अशा दुहेरी नीतीचा अवलंब करणाऱ्या देशी नेत्यांची चांगलीच पंचाईत होते. आता हेच बघा.. फेबुच्या पारदर्शी पानावरून समाजसेवेच्या नावाखाली पक्षाचा प्रचार करण्यासाठी पैसे देणाऱ्या नेत्यांचा खर्चच झुक्याने जाहीर करून टाकला. करोनाच्या आपत्तीमुळे ‘काटकसर करा’ असे उच्चरवात सांगणाऱ्या पक्षाचे नेते, कायम आकांडतांडव करणाऱ्या बंगदीदी या खर्चात अग्रेसर असल्याचे दिसून आले. तसेही दुहेरी नीती हा भारतीय राजकारण्यांचा स्थायीभाव आहे. लग्नसमारंभावर पैसे उधळू नका असे जाहीरपणे सांगणारे त्यांच्या घरातील लग्ने मात्र धडाक्यात करतात हा अनुभव तसा जुनाच. आता पोटाला चिमटा घेण्याच्या चर्चा सुरू असताना सुद्धा या नेत्यांचा उधळेपणा समोर आलाच.  मोठा गाजावाजा करून जाहीर झालेली नेत्यांची वेतनकपात फसवी होती असा अर्थ काढायला आता काही हरकत नसावी. नेत्यांची ही चलाखी झुक्याने समोर आणली असली तरी त्यांच्या एकंदर हुशारीला मात्र दाद द्यायलाच हवी. टाळेबंदीच्या काळात गर्दी कुठे जमू शकते या नेत्यांनी नेमके हेरले. भले प्रत्यक्षातील नसेल पण समाजमाध्यमावर जमणाऱ्या गर्दीसमोर आपण असायलाच हवे या ध्येयाने पछाडलेल्या या नेत्यांनी प्रचाराचा हा नवा फंडा शोधला. त्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे. विकल अवस्थेत जनतेची मानसिकता वळवणे सोपे असते असे शास्त्र सांगते. सध्या करोनाच्या भीतीमुळे अनेकांच्या मानसिकतेला धक्का बसला आहेच. अशावेळी आम्हीच मसीहा, तुमचे तारणहार, मदतीसाठी धावून येणारे आणि आमचे राजकीय विरोधक मात्र नालायक असे ठसवण्यात ही मंडळी यशस्वी होत असेल तर त्यावर होणाऱ्या खर्चाकडे दुर्लक्षच करायला हवे. ‘आहे पैसा म्हणून केला जनतेच्या भल्यासाठी खर्च,’ असा युक्तिवाद नेते करत असतील तर त्यात चुका शोधण्याचा प्रयत्न कुणी करण्याचे काही कारण नाही. हा पैसा कुठून आला हे सुद्धा कुणी विचारण्याचे काही प्रयोजन नाही. सध्याचा काळ याचक आणि शासकाचा आहे असे गृहीत धरले तर हा जाहिरातबाज समाजसेवेचा गुन्हा तसा क्षम्यच मानायला हवा. करोनाचे वादळ घोंगावत असताना सुद्धा एखाद्या राज्यात सत्तांतरांचा खेळ खेळला जाऊ शकतो, अमेरिकी तात्याचे जंगी स्वागत केले जाऊ शकते, हे सर्व विनासायास घडावे म्हणून उपाययोजना लांबणीवर टाकल्या जाऊ शकतात. अशा महान देशात ही क्षुल्लक जाहिरातबाजी फारच चिल्लर गोष्ट आहे हे आता साऱ्यांनी समजून घ्यायला हवे. फेबुवर एक दिवस ‘पोष्टलो’ नाही तर मागे पडू अशी मानसिकता बळावणाऱ्या समाजासाठी सेवेचे माध्यमही तेवढेच तत्पर व जलदगतीचे असायला हवे ना! मग लाखभर रुपये खर्च केले तर कुंठीत माध्यमांच्या पोटात दुखायचे कारणच काय? शेवटी ही दुहेरी नीतीच राष्ट्रभक्तीच्या जयघोषाला अधिक धारदार करते, तर तक्रार कशाला?  भारतीय राजकारणाचे हेच रूप देशाला प्रगतिपथाकडे नेणारे आहे. त्यामुळे कुणीही यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, अन्यथा आहे त्याच टाळेबंदीचा कालावधी वाढवला जाईल याची नोंद घ्यावी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा