एकदा एक भुकेला कोल्हा शिकारीच्या शोधात हिंडत असतानाच त्याच्यासमोर एक पट्टेदार प्राणी खांदे पाडून, मान खाली घालून उभा राहिला. लहानपणी शिकार करून आणलेले मांस भरवताना आई त्याला वाघसिंहांच्या गोष्टी सांगायची. त्यामुळे, हा वाघ असावा असा त्याने तर्क केला. तो फडशा पाडतो, त्याच्या जबडय़ात हात घालून दात मोजायची कुणाची हिंमत नसते वगैरे वाघाच्या गोष्टी कोल्ह्यने ऐकल्या होत्या. तेव्हापासून, काही तरी करून वाघाशी मैत्री केली पाहिजे असे त्याला वाटत असे. आता अचानक समोर आलेल्या वाघास पाहून कोल्ह्यस आनंद झाला. वाघ दुखावलेला, भेदरलेला आहे हे धूर्त कोल्ह्याने ओळखले. त्याने प्रेमाने वाघाजवळ जाऊन पंजाने त्याला कुरवाळले आणि खुणेनेच आपल्यासोबत चालण्यास सांगितले. दुखावलेला वाघ कोल्ह्यशी गप्पा मारत निमूटपणे त्याच्या मागोमाग निघाला. काही अंतर चालल्यावर दोघेही एका गुहेशी पोहोचले. कोल्ह्यने पुढचा पंजा तोंडाशी नेऊन, आवाज न करण्यास वाघास बजावले आणि तो गुहेत डोकावला. वाघाची उत्सुकता वाढली होती. एवढा चांगल्या स्वभावाच्या कोल्ह्यच्या भाऊबंदांशी आपण उगीचच वैर केले असा विचार करीत तो प्रेमाने कोल्ह्यच्या अंगास अंग घासू लागला. वाघ आपल्या पूर्ण कह्यत आला असून आता रोज आयती ताजी शिकार मिळवण्यासाठी त्याला कामाला लावले पाहिजे, असा विचार करीतच त्याने पंजांचा आवाज न करता वाघास गुहेत नेले. आत एक सिंह सुस्तपणे पहुडला होता. बऱ्याच दिवसांत कुणीच भेटावयासही न आल्याने व काहीच काम नसल्याने तोही आळसावला होता. कोल्हा आणि वाघ समोर येताच संशयाने तो सावरून बसला. कोल्ह्याने कसेनुसे हसत वाघाशी त्याची ओळख करून दिली. सिंहाने वाघास ओळखले, पण दोघेही आपापल्या हद्दीत आपले आपले राज्य सांभाळत असल्याने, एकमेकांसमोर येण्याची वेळ पहिल्यांदाच आली होती. त्याने आस्थेने वाघ व कोल्ह्यस बसावयास सांगितले. आता गुहेमध्ये तिघे जण एकमेकांशेजारी बसले होते. कधीकाळी आपण एकमेकांचे शत्रू होतो, हे विसरून ते गप्पा मारू लागले आणि आपण खूप चांगले मित्र होऊ शकतो, याची जाणीव प्रत्येकास झाली. धूर्त कोल्हा मात्र, मनाशीच विचार करत होता. त्याने डोळ्यांनी खुणावतच सिंहास हळूच बाजूला घेतले व त्याच्या कानात काही तरी सांगितले. काही वेळ एकमेकांशी चर्चा करून दोघे बाहेर आले. मग सिंहाने दुखावलेल्या वाघाच्या पाठीवर पंजाने थोपटत त्याला दिलासा दिला. ‘आता आपण एकत्र राहावयाचे असल्याने, कामाचे वाटप करून घेऊ’.. कोल्हा म्हणाला आणि वाघाने आज्ञाधारकपणे मान हलविली. ‘मी शिकार करण्यात पटाईत असल्याने रोज शिकार करत जाईन’.. तो स्वत:हून म्हणाला. ‘मला शिकारीचे वाटे करता येतात’.. कोल्हा उत्साहाने म्हणाला व त्याने सिंहाकडे पाहिले. ‘सिंह हा आपला राजा, त्याला काहीच काम द्यायचे नाही’.. कोल्हा म्हणाला. दुखावलेला वाघ एव्हाना कोल्हा व सिंहाच्या पाहुणचाराने भारावला होता. सिंह आणि कोल्ह्यसारखे बडे मित्र मिळाल्याने वाघाचे भेदरलेपण पार पळाले. मैत्रीसाठी काहीही करण्याची हमी त्याने दिली! ..आणि आळसावलेला सिंह अधिकच सुस्तावला. आता आपली चंगळ, या कल्पनेने कोल्हा सुखावला आणि नव्या मैत्रीकडे तमाम प्राण्यांनी कुतूहलाने नजरा लावल्या. कोल्ह्याचे कौतुक करीत जंगलात जो तो या मैत्रीचीच चर्चा करू लागला.

Story img Loader