करोनाच्या या साथीमुळे टाळेबंदी झाली अन् सारे कसे शांत शांत झाले. कधी कधी ही शांतता खायला उठत असली तरी याच शांततेमुळे गावाबाहेर रानात, जंगलात असलेले प्राणीपक्षी निर्मनुष्य रस्त्यांवर सहजसंचार करू लागले आहेत. अनेक पक्षी तर आपल्या पिंजराबंद भावंडांचा सूड उगवण्यासाठीच जणू आता, घरांमध्ये बंदिस्त असलेल्या व खिडकी-गॅलरीतून हळूच डोकावून पाहणाऱ्या माणसांच्या घरांसमोर मुद्दाम बागडत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर-सोसायटय़ांमध्ये नानाविध पक्ष्यांचा आवाज ऐकू येत आहे. नागरी वस्त्यांमधील सिमेंट-काँक्रीटची जंगले-माणसांची गर्दी आणि वाहनांचे प्रदूषण या तिघांच्या महाविकास आघाडीमुळे सत्तेतून परागंदा झालेल्या चिमण्यांचा चिवचिवाटही हळूहळू ऐकू येत आहे. रस्ते-वस्त्यांमध्ये चिवचिवाट सुरू असताना ट्विटरसारख्या समाजमाध्यमांतील टिवटिवाटही वाढत आहे. मग परपक्षीय आणि स्वपक्षीय राजकीय विरोधकांवर टीकेचे घणाघाती प्रहार करणारे आक्रमक नेते खासदार नारायणराव राणे यांचे पुत्र व आमदार नीतेश राणे हे तर मागे कसे राहणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेताना त्यातून पोलीस व आरोग्य यंत्रणेला वगळल्याबद्दल नीतेश यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचे ट्विटरवरून जाहीर कौतुक केले. आता निव्वळ कौतुक करून थांबले तर ते कसले राजकारणी. उलट आपण कसलेले राजकारणी आहोत हे दाखवण्याची संधी साधत नीतेश यांनी, ‘‘अजितदादा तुमच्याकडे अनुभव व प्रशासकीय कौशल्य असल्यानेच असा योग्य निर्णय घेऊ शकले, खरे तर तुम्हीच राज्याचा गाडा हाकत आहात,’’ अशी स्तुतिसुमने उधळली, इतर लोक फेसबुक लाइव्ह करत बसले आहेत, असा टोला कुणाचेही नाव न घेता लगावला. सर्वसाधारण माणसे एकाच दगडात फारतर दोन वगैरे पक्षी मारतात. पण नीतेश नुसतेच राजकारणी नाही तर राणेपुत्र. त्यांनी एकाच ट्वीटमध्ये अजितदादांबद्दल प्रेमाचा संकेत दिला. दुसरे करोनाबाबत सातत्याने फेसबुकवरून जनतेशी संवाद साधणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आणि तिसरे ते आता भाजपचे आमदार असल्याने अजितदादांना गळाला लावण्यासाठी भाजप अजूनही संधी शोधत असल्याचा गर्भित इशाराही उद्धव यांच्यापर्यंत पोहोचेल व ते अस्वस्थ होतील, अशी तजवीजही केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी मधल्या अस्थिर वातावरणात भाजपने सत्तास्थापनेसाठी बहुमताची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवल्याचे खुद्द नारायणराव राणे यांनीच जाहीर केले होते. शिवाय अजित पवारांसह आघाडी सरकारच्या काळातील जुना दोस्तानाही आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या हिवाळ्यात शिशिराची पानगळ होऊन गेली. त्या काळात नागपूरची संत्री येतात. पण ती आंबट-गोड. येणारा काळ कोकणात फळांचा राजा आंब्याचा. आमराईतील कलमांना फळे येण्याचा, मोहोर बहरण्याचा. नवनिर्मितीच्या या कालखंडात एप्रिल-मे महिन्यात मिळणाऱ्या मिठ्ठास फळांचा गोडवा चाखण्याची चाहूल निसर्गाला लागते. कोकीळ आदी पक्षी एकमेकांना तर कोकणातली माणसे बाहेरच्यांना साद घालतात, आमंत्रण देतात. हे ट्वीट म्हणजे ती अजितदादांना घातलेली साद तर नव्हे..