ही बातमी ऐकून उगीचच मनाला रुखरुख लागून राहिली आहे. चार लाख किलोमीटर अंतरावर असूनही, सगळ्यात जवळचा वाटणारा हा चंदामामा, पृथ्वीपासून दूर दूर जातोय.. हजारो वर्षांनंतर पावणेचार सेंटिमीटरने लांब जाताना या चांदोबाने आता तर, अंगही चोरून घ्यायला सुरुवात केली आहे. हे ऐकल्यापासून तर आम्ही अधिकच बेचैन आहोत. असं झालं तरी काय असावं? एवढा रुसवा कशाने आला असावा?.. युगायुगांपासून सूर्याचा दाह सोसूनही त्याच्या प्रेमविरहाने व्याकूळ होऊन प्रीतीची याचना करीत त्याच्याभोवती घिरटय़ा घालताना, चांदोबाला सूर्याचा ताप सोसणार नाही याची काळजी घेणाऱ्या पृथ्वीचा हा छोटा भाऊ, पृथ्वीपासूनच दूर दूर पळतोय, ही काळजीची बाब नव्हे काय? चांदोबाला सूर्याचा ताप सोसणार नाही, म्हणून दिवसभर त्याला आडोशाला लपवून सूर्य मावळल्यानंतरच आकाशातल्या भटकंतीला पाठवायची पृथ्वीची वर्षांनुवर्षांची प्रथा.. एवढी काळजी करणाऱ्या, मायेची पाखर धरणाऱ्या पृथ्वीपासून तो चांदोबा दूर दूर का जात आहे? या चांदोबाच्या शीतल प्रकाशातच पृथ्वीवरच्या कित्येक प्रेमकथा बहरल्या, मनामनांमध्ये प्रतिभेला बहर आला, कवितांचे ताटवे फुलले, कित्येक चक्रवाक तर त्याचे शीतल चांदणे पिऊनच जगत राहिले.. कित्येक मातांनी या चांदोबाच्या साक्षीनेच आपल्या कडेवरच्या मुलांना दूधभाताचा पहिलावहिला घास भरविला, आणि कित्येक रात्री चांदोबाच्या गोष्टी ऐकतच आईच्या मांडीवरल्या किती तरी बाळांचे पेंगुळलेले डोळे अलगद झोपेच्या आधीन झाले.. हजारो वर्षांपूर्वी कधी तरी म्हणे, पौर्णिमेच्या रात्री गोष्ट ऐकतानाच, चांदोबा हवा म्हणून रामाने हट्ट केला, आणि त्याची समजूत काढताना तीनही माता हैराण झाल्याने दयावान होऊन, साडेतीन हजार किलोमीटर व्यासाचा हाच अगडबंब चांदोबा इवल्याशा परातीमधील पाण्यात येऊन बसला.. मग खुशीत आलेला इवलासा राम खुदकन हसला, अन् राजाने साऱ्या नगरीला साखर वाटून आनंद साजरा केला.. रामाच्या चंद्रहट्टाची हीच गोष्ट ऐकत मोठय़ा झालेल्या मुलांशी खेळताना एखाद्या पुनवेच्या रात्री कधी तोच चांदोबा निंबोणीच्या झाडामागे लपला, कधी बघता बघता ढगाआड गडप होऊन गंमतही करू लागला, आणि ‘पुन्हा कधी दिसशील का’, अशा चिंतेने मुलेबाळे आभाळाकडे नजरा लावून व्याकूळ झाली. पृथ्वीला वेढा घालणारा अथांग सागर तर, कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रकोरीच्या ओढीने धसमुसळेपणा करत वर्षांनुवर्षे वेडावल्यागत उसळ्या मारतोय.. या साऱ्या अद्भुत नात्याचा आणि पृथ्वीतलाशी जडलेल्या अद्वैताचा अव्हेर करून इंचाइंचाने लांबलांब पळावे, अंग आक्रसून घ्यावे असे त्याला का बरे वाटत असावे?.. हजारो मैलांवरून दिसणाऱ्या त्याच्या शीतल तेजामागचे खरे रूप माणसाने उघडकीस आणले, निर्वात, ओबडधोबड रूक्षपणा ही त्याची खरी ओळख आहे हे हजारो वर्षांपासून दडून राहिलेले गुपित माणसाला कळले म्हणून तर रुसून तो माणसांच्या जगापासून दूर दूर जात नसेल?.. पण त्याला तसे करण्याचे काहीच कारण नाही. जोवर त्याचे शीतल चांदणे पृथ्वीवर बरसत राहते, जोवर त्याच्या कलेकलेने वाढणाऱ्या रूपाने सागराला वेडावल्यागत होत असते, तोवर चांदोबाच्या वास्तव रूपाकडे वाकडय़ा नजरेने पाहावेसे कुणालाच वाटणार नाही.. चांदोबाने रुसू नये, हेच आमच्या आधीच्या आणि पुढच्याही पिढय़ांचेही साकडे आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा