‘वज्राहूनही कठोर’ व्यक्तींना ‘मेणाहून’ नव्हे तरी मेणाइतके मऊ करण्याची युक्ती मादाम तुस्साँ संग्रहालयाला साधली नसती, तर जगातील अनेक थोर पुरुष एका रांगेत निमूटपणे स्वस्थ बसलेले पाहण्याची संधी तुम्हाआम्हाला लाभलीच नसती. या महापुरुषांच्या खांद्यला खांदा लावून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे दाखल होताहेत. मोदींचे वर्णन भारताचा ‘लोहपुरुष’ असे होऊ लागले, तेव्हाच त्यांचा ‘मेणाचा पुतळा’ करण्याचे तुस्साँ म्युझियमने ठरवले असावे. मेणाच्या आगळ्यावेगळ्या मोदींना पाहण्याची, त्यांच्या खांद्यवर हात टाकून किंवा शेजारी उभे राहून थाटात फोटो काढून घेण्याची संधी तुस्साँ म्युझियममुळे नव्या भारतातील फोटोवेडय़ा आणि सेल्फीवेडय़ा मोदीप्रेमींना मिळणार आहे. ‘मेणाचे मोदी’ ही कल्पनाच भारतीयांसाठी रोमहर्षक असल्याने, अशा मोदींसोबतच्या ‘सेल्फी’ची संधी साधण्यासाठी तुस्साँ गाठण्यास आता मागेपुढे पाहिले जाणारही नाही. रंगीबेरंगी मोदी जाकीट घातलेल्या, हात जोडून ‘नमस्ते’ करणाऱ्या मोदींच्या मेणाच्या पुतळ्याचे डोळे समोरच्या कॅमेऱ्यावरच खिळलेले असतील, अशी काळजी तुस्साँचे कलाकार घेणार आहेत, की नाही हे कळायला मार्ग नाही, पण अनेक भारतीयांची मात्र ती मागणी आहे. मेणाच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे स्वप्नरंजन आतापासूनच भारतात सुरू झाले असेल, यातही शंका नाही. या पुतळ्यासोबत सेल्फी काढूनच नरेंद्र मोदी त्याचे अनावरण करतील का, त्या वेळी त्यांची नजर कॅमेऱ्यावर असेल, की पुतळ्यावर असेल, कॅमेऱ्यात स्वत:चीच छबी असावी म्हणून ते मेणाच्या मोदींना बाजूला तर सारणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न ‘स्वयंप्रतिमानिष्ठे’च्या प्रेमात गुरफटलेल्या अनेकांच्या मनात येणे सहाजिकच आहे. मेणाच्या मोदींच्या खांद्यला खांदा लावून उभे राहण्याची, इतकेच नव्हे, तर त्यासोबत सेल्फी काढून घेण्याची संधी पर्यटकांना मिळेल असे तुस्साँच्या व्यवस्थापनाने अगोदरच जाहीर करून टाकले आहे. समाजमाध्यमांवरील मोदींचा सर्वसंचार आणि त्यांच्याविषयीची सार्वजनिक उत्सुकता पाहता, समाजमाध्यमांवरील त्यांच्या आभासी लोकप्रियतेप्रमाणेच त्यांच्या मेणाच्या पुतळ्यालाही लोकांचे प्रेम लाभेल असाही तुस्साँ व्यवस्थापनाचा विश्वास आहे. दोन वर्षांंपूर्वी डिसेंबरात मुंबईत भाजपच्या ‘महाजागरण’ मेळाव्यात मोदींच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण राजनाथ सिंह यांनी केले, तेव्हाही गर्दीतून मोदीनामाचा गजर उमटला होता. पण तेव्हा मोदीप्रेमींमध्ये सेल्फीवेडाची लाट उमटली नव्हती. आता सेल्फीसाठी किंवा सेल्फी काढतानाचा फोटो समाजमाध्यमांवर झळकावण्यासाठी एक हक्काचा ‘सेल्फी पॉइंट’ तयार होणार आहे. तुस्साँ संग्रहालयात गेलातच, तर तिथल्या महामानवांच्या रांगेत आणखी वर्षभराने अरविंद केजरीवालही दाखल झालेले असतील, अशी खात्रीशीर बातमी आहे. केजरीवाल हे मेणाचा पुतळा होणारे भारतातील पहिलेच मुख्यमंत्री ठरतील. पण सेल्फी काढावा तर मोदींसोबतच, हे काय सांगायला हवे ?
मादाम तुस्साँचा ‘सेल्फी पॉईंट’..
वज्राहूनही कठोर व्यक्तींना मेणाहून नव्हे तरी मेणाइतके मऊ करण्याची युक्ती मादाम तुस्साँ संग्रहालयाला साधली नसती
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-03-2016 at 00:29 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madame tussauds narendra modi