अवघ्या महाराष्ट्राचं राजकीय शक्तिस्थान असलेल्या ‘वर्षां’वर राहायला गेल्यानंतरही त्यांनी स्कूटरवरून बँकेत जाण्याचा आपला हट्ट काही सोडला नाही. असू आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी; म्हणून आपण आपलं स्वत्व थोडंच सोडायला हवं? दारी गाडय़ाघोडे आणि हाताखाली नोकरचाकर असले, तरीही ते आपल्या वाटय़ाचे नाहीत, याचं भान तर ठेवायलाच हवं ना. हा सारा जामानिमा त्या मुख्यमंत्रिपदाचा असतो याची जाणीव आहे त्यांना. अशा विवेकी आणि सहृदय असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला एका ‘अवतारी बाबा’कडून मिळालेली सोनसाखळी पाहून साऱ्या मराठी महिलांचे डोळे भरून यायचेच काय ते बाकी होते. बरं ही भेट काही अशीतशी नव्हती. हातात न मावणारा फुलांचा गुच्छ किंवा चेहराही झाकून जाईल, अशा भेटवस्तूपेक्षा ती खूपच वेगळी आणि ‘आशीर्वादात्मक’ अशी. त्या बाबांनी चक्क हवेतून काढून दिलेली सोनसाखळी ती. केवढी पवित्र आणि मंत्र भारलेली! बाईंना गहिवरून आलंही असेल, त्या वेळी! इतकी वर्षे आपण बँकेत रोजच्या रोज जाऊन इमानेइतबारे नोकरी करीत आहोत, याची चाड कुणाला तरी आहे म्हणायचं, या कल्पनेने मोहरायलाही झालं असेल त्यांना. नवऱ्यानं असं ‘करिअर’ निवडलंय की त्यात काही भरोसा नाही. त्यामुळे आपण आपली नोकरी करावी. याला कुणी त्याग वगैरे म्हणत असेल, पण खरं म्हणजे असं वागणं हे पक्व असल्याचंच लक्षण. उगाच आपलं रोजच्या रोज मालिकांमधल्या बायकांसारखे शालू आणि पैठण्या नेसून आणि दागदागिने घालून पतीबरोबर कार्यक्रमांना हजेरी लावण्यापेक्षा आपलं स्वत:चं करिअर विकसित करणं केव्हाही अधिक चांगलं. मग ती बँकेतली नोकरी असो की गाणं. कधी काळी व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केल्याची आठवण एखादा कलाकार कशी बरं विसरेल? एखाद्या चित्रपटासाठी पाश्र्वगायन करावं अशी ऊर्मी तर तेव्हापासूनच होती, पण संधी मिळाली नव्हती. ‘वर्षां’वर राहायला जाताच ती मिळाली, तर त्यात काय वावगं? गळ्यातलं गाणं तर स्वत:चं आहे ना, ते तर काही कुणी भेट म्हणून दिलेलं नाही. लोकांना काय जातं नुसती चर्चा करायला. सध्या कुठे कुठे बोलावतात, तेव्हा गाणं गायचा आग्रहही केला जातो. योग्यच तो. कलेची बूज राखणारा वगैरे. पुण्यातल्या कार्यक्रमात त्या बाबांनी चमत्कारानं काही दिल्यामुळे त्याची बातमी झाली. अन्यथा सगळ्यांनी कौतुकच केलं असतं. ‘उत्तम बँक कर्मचारी’ (बेस्ट बँक एम्प्लॉयी) म्हणून असा सन्मान स्वीकारण्यात मुख्यमंत्रिपद कसं मध्ये येतं कोण जाणे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा