जे सर्वसाधारण लोकांना करता येत नाही, जे केल्यावर सर्वसामान्यांचे डोके चक्रावून जाते, डोळे विस्फारतात, तोंडाचा भलामोठा ‘आ’ वासला जातो आणि त्याचा अर्थ लावणेही मुश्किल होऊन जाते, ते सारे जादू या प्रकारातच मोडते. अशी जादू किंवा अशी जादू करणारा जादूगार हा बहुतांशपणे बंगाली असतो, म्हणून जादू म्हटले की बंगाल आठवतो. या प्रांतात जादूच्या कलेचा बुजबुजाट झाला आहे, असा समज असतो, म्हणूनच कुठल्याही शहरात कुठल्याही कोपऱ्यात बाबा बंगाली डेरा टाकून बसल्याची बातमी पसरली की गावात त्याची चर्चा होते. हे बंगाली बाबा म्हणजे बंगाली जातीचे ‘माहीर’ असतात. ते आपल्या जादूविद्येने नव्हत्याचे होते आणि होत्याचे नव्हते करू शकतात. वशीकरण, संतानप्राप्ती, प्रेमप्रकरणासारख्या कौटुंबिक समस्यांपासून धंद्यातली खोट आणि राजकारणातील घसरगुंडी यासारख्या समस्यांतून सावरण्याचा हमखास उपाय त्यांच्या बंगाली जादूमध्ये असतो, आणि आपण केलेली ‘करणी’ उलटवून दाखविण्याचे ‘खुल्ला चॅलेन्ज’देखील ते देत असतात. बंगाली जादूचा अंमल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या मनामनावर चढण्याचे हे एक कारण असतेच. पण संपूर्ण बंगाल हीच जणू जादूभारित भूमी आहे आणि या भूमीत काहीही होऊ शकते असे वाटावयास लावणारे प्रसंगही तेथे घडतात. खरे म्हणजे काळी जादू किंवा बंगाली जादू ही निव्वळ अंधश्रद्धा असते. पण कधीकधी तिथे असे काही अकल्पित घडते, की माणसाचा स्वत:च्या कानावर आणि डोळ्यावर विश्वासच बसत नाही. बंगालमध्ये ठाण मांडून सत्तेवर बसलेल्या साम्यवाद्यांचे होत्याचे नव्हते करून ममतादीदींनी सत्ताग्रहण केले, तेव्हा दीदींनी सत्तासंपादनाची ‘जादू’ करून दाखविली, असेच बोलले गेले, आणि दीदींचे पाय बंगालात घट्ट रोवलेले असतानाही शहा-मोदींनी लोकसभा निवडणुकीत दीदींचे स्थान डळमळीत केले, तेव्हा मोदींनी जादू केली असेच म्हटले जाऊ लागले. राजकारणात अशी उलथापालथ करणे हे सोपे काम नव्हेच. त्यासाठी काहीतरी जादूच कामाला येते, हे बंगालच्या भूमीतच स्पष्ट झाल्यावर, अंधश्रद्धांना थारा नसलेल्यांच्या मनातही जादूच्या शंकेचीच पाल चुकचुकली असणार यात शंकाच नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा