‘ते’ म्हणाले, ‘मी पुन्हा येईन!’.. ‘हे’ म्हणाले, ‘बोलणं कमी, काम जास्त..’ आणखी कुणी म्हणालं, ‘आम्हीच तुमचा सत्तेतील आवाज!’ ..या अखंड गदारोळाने जागा झालेला मतदार ‘लोकशाहीचा धागा’ होऊन हा सारा खेळ पाहात असतो. हा लोकशाहीचा उत्सव म्हणजे सत्तेची साठमारीच, त्या खेळात आपल्याला ओढून तात्पुरता राजा बनविले जाते, हेही त्याला ठाऊक असते. पण तो सामील होतो. नाईलाजानेच!.. खेळ रंगात येतो, कसलेले खेळाडू मतदाराला मैदानाच्या मध्यभागी आणून घेरतात, आणि मतदाराची स्तुतिगीते गाण्याची स्पर्धा सुरू होते. हे सारे मतदारासाठीच चालले आहे, असा सोहळा रचला जातो. जणू जनतेच्या सेवेसाठीच सुरू झालेल्या या शर्यतीत नम्रभाव शिगेला पोहोचलेला असतो. अशातच, ‘पहिल्या क्रमांका’साठी गळेकापू स्पर्धा कधी सुरू झाली हे मतदारासही कळतच नाही. आसपासचा गदारोळ त्याच्या कानात घुमू लागतो, आणि तो गोंधळून जातो. ‘कोणता झेंडा होऊ हाती’ अशा संभ्रमावस्थेत तो मैदानाबाहेर पडण्याचीच केविलवाणी धडपड करू लागतो. चहूबाजूंनी घेरलले हात त्याला स्वत:कडे खेचू लागतात. अवस्थ मतदार डोळे मिटून, स्वत:स त्या हातांच्या हवाली करून कसाबसा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची तयारी करू लागतो.. ऐन मतदानाच्या दिवशी, ‘आजचा दिवस आपला’ हे माहीत असूनही मतदार मात्र, केंद्रावर जाण्याचा कंटाळाच करतो. मग मतदारास केंद्रावर आणण्याची धावपळ सुरू होते. एखाद्या नेत्याने प्रायोजित केलेली ‘फुकट मिसळ प्रोत्साहन योजना’ कुणीतरी गाजावाजापूर्वक जाहीर करतो, तर कुणी मतदानाच्या निमित्ताने मतदारास आकृष्ट करून मंदीच्या विळख्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा केविलवाणा मार्ग शोधू जातो. ‘खरेदीवर सवलती’च्या योजना जाहीर होतात. तरीही मतदार उदासीनच. सकाळचा पहिला प्रहर असाच, निरुत्साहात संपतो. मतदाराच्या मनात नेमके काय आहे याचा अंदाजच आलेला नसतो. कार्यालयांवर काळजीची काजळी पसरते. टक्केवारीचे हिशेब करून जुन्या मतदानांचा इतिहास चाळला जातो. कमी मतदान कुणाच्या फायद्याचे याची गणिते मांडण्यासाठी पक्षापक्षांची चाणक्य मंडळे कामाला लागतात, आणि ‘काहीही झाले तरी मतदाराचा कौल आपल्यालाच मिळणार’ हा दोन दिवस टिकणारा पारंपरिक निष्कर्ष काढला जातो. दुपापर्यंत मतदानाची टक्केवारी जेमतेम आकडय़ापर्यंत पोहोचलेली असते. शतकाच्या उंबरठय़ावरचे वृद्धही बोट उंचावून मतदानाचे आवाहन करण्यासाठी ‘वाहिन्यां’वर प्रकटतात, आणि तरुण मतदार अजून फारसा जागा झालेलाच नाही, हे जाणवते. मग पुन्हा तीच अस्वस्थता सुरू होते, आणि तरुणांना केंद्राकडे खेचण्यासाठी नवी शक्कल लढविली जाते. ‘शाई लावलेल्या बोटासह सेल्फी काढा आणि वेबसाइटवर अपलोड करा’, असे आवाहनही केले जाते. तरीही उत्सवाचा उत्साह मरगळलेलाच.. मतदार राजा नेमका कोणत्या स्थितीत आहे, हेच कळेनासे! कुणी म्हणते, मतदार राजा झोपलेला आहे. कुणाला वाटते, मतदार राजा खडबडून जागा झाला म्हणूनच त्याने पाठ फिरविली आहे. दोन्ही बाजूंनी याकडे पाहणारे कुणी तरी हसत हसत स्वत:शीच म्हणू लागते, ‘हीच ती वेळ आहे’!..
कोणता झेंडा घेऊ हाती?
सकाळचा पहिला प्रहर असाच, निरुत्साहात संपतो. मतदाराच्या मनात नेमके काय आहे याचा अंदाजच आलेला नसतो.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 22-10-2019 at 01:08 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2019 voter turnout drop in maharashtra zws