‘हमारा देश बदल रहा है’ हे एव्हाना तरी तुम्हाआम्हास कळायला हवे होते. ज्यांना अजूनही ते कळले नसेल, त्यांनी खरोखरच चूळभर पाण्यात बुडी मारून जीव देण्याचे नुकतेच करण्यात आलेले जाहीर आवाहन ऐकावे. खरे तर, बुडून मरण्याची एक घाऊक संधी महिनाभरापूर्वी महाराष्ट्रासमोर निसर्गाने आणून उभी केली होती. पण तिचा लाभ घ्यावा असे तेव्हा कुणास सुचलेच नाही. सांगली-कोल्हापुरात कधी नव्हे एवढा महापूर आला होता. अगदी कालपरवा, ‘स्मार्ट सिटी’ असलेल्या पुण्यातही ही संधी चालून आली होती. पण, देश बदलतोय हे समजलेच नाही हे तेव्हा लक्षात आलेले नसल्याने बुडून मरायची ती घाऊक संधी तुम्हीआम्ही नाहक गमावली. मात्र एवढय़ाशा कारणाने निराश होण्याचे किंवा खचून जाण्याचे कारण नाही. बुडून मरण्याच्या अनेक संधी यापुढेही येतच राहणार आहेत. यंदाचा पावसाळा बरा गेल्यामुळे पुढे उन्हाळ्यात फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही. ‘मी लाभार्थी’ असे विश्वासाने सांगणारी माणसे कधीपासून पावलोपावली उभी आहेत; म्हणजे सरकारने जागोजागी हजारो कोटी रुपये खर्च करून योजनाही राबवल्या आहेत. तरीही पुढे जर पाण्याची टंचाई उद्भवलीच, तर चूळभर पाण्यात बुडी मारून मरण पत्करणेच चांगले! आजकाल मरणालाही प्रतिष्ठा असते. नाहीतर, कुणीही उठतो, आणि आत्महत्येसारख्या मार्गाने मरण पत्करतो. कर्जाच्या कोंडीमध्ये नाकातोंडापर्यंत बुडून मरणारे शेतकरी तुम्हाआम्हाला माहीत आहेत. बुडालेल्या बँकांसोबत आयुष्यभराची पुंजी बुडाल्याचा धसका घेऊन मरणाला सामोरे जाणारी माणसेही तुम्हाआम्हाला माहीत आहेत. मंदीच्या खाईत सापडून बेकारीत बुडालेली माणसेही आसपास तुम्हीआम्ही पाहात आहोत, आणि नोटाबंदीच्या फटक्याने बुडालेल्या धंद्याच्या गल्ल्यावर निराशपणे डोक्याला हात लावून बसलेली जमातही तुम्हाआम्हाला पाहावी लागलेली आहे. ही माणसे बुडाली, पण मेली कशी नाहीत? कारण एकच, देश बदलतोय असेच त्यांनाही वाटत असावे. विकासाचा डिंडिम चहूकडे वाजतो आहे, काश्मीरची घुसमट करणारे ३७० वे कलम काळाआड गडप झाले आहे, त्याआधीच ‘घरात घुसून’ हल्ले केल्यामुळे विकलांग झालेल्या पाकिस्तानला जगाच्या मंचावर एकाकी पाडण्यात आपल्याला यश आले आहे. आपला महाराष्ट्र तर, अभूतपूर्व घोडदौड करत वेगाने विकासाच्या वाटेवर पुढे जात आहे. हजारो शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत, शिक्षण क्षेत्रात नवनव्या क्षितिजांवर वेगवेगळे सूर्योदय दिसू लागले आहेत, मुले-महिला सुरक्षिततेच्या भावनेने आश्वस्त होऊन मुक्तपणे वावरत आहेत, आणि संरक्षित असल्याच्या जाणिवांनी निसर्गातील झाडेसुद्धा नव्या जोमाने बहरत आहेत. गावोगावीचे गडकिल्ले पूर्वजांच्या पराक्रमाचे पोवाडे गात निधडय़ा छातीने इतिहासाची सोनेरी पाने मिरवत उभे आहेत.. एकंदरीत चहूबाजूंना असे समाधानाचे वारे वाहत असल्यामुळे, देश बदल रहा है असे त्यांना वाटत असावे. त्याच आशेवर बुडत्या अवस्थेतही एखाद्या काडीचा आधार शोधून ती जगतच राहिली. आता जर तुम्हाआम्हांस ते लक्षात आलेच नसेल, त्या हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मेगाभरतीकडे डोळे लावून वणवण भटकणारे ते तरुणांचे तांडे, रस्त्यांची दुर्दशा, पुराने उद्ध्वस्त झालेली शहरे आणि जीव मुठीत घेऊन बेभरवशी शहरांत स्वत:स झोकून देणारी असहाय माणसे हेच दृश्य तुम्हाआम्हाला सतत दिसत असेल, तर मात्र बुडून मरणेच योग्य आहे. तसेही, ‘हीच ती वेळ आहे’ असा आवाज आजकाल चहूबाजूंनी कानात घुमतच असतो. मग अजूनही तुम्हीआम्ही शुद्धीवर आलेले नसू, तर, खरोखरीच, हे नक्की समजा, बुडून मरण्यासाठीही, हीच ती वेळ आहे!
हीच ती वेळ आहे..
एकंदरीत चहूबाजूंना असे समाधानाचे वारे वाहत असल्यामुळे, देश बदल रहा है असे त्यांना वाटत असावे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-10-2019 at 04:43 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra flood situation water crisis in maharashtra farmers sucide in maharashtra zws