‘पुलवामाची घटना घडल्यानंतर सर्व देश स्तब्ध झाला होता. मात्र तरीही काही लोकांनी युतीसाठी बैठका घेतल्या. या बैठका कशासाठी झाल्या तर सत्तेसाठी, स्वत:च्या स्वार्थासाठी. महाराष्ट्रात आघाडय़ा आणि युत्या होत आहेत. त्याचे कारण यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवार नाहीत.’ – हे उद्गार महाराष्ट्राच्या, त्यातही कोकणच्याच सुपुत्राने काढलेले असणार, हे वेगळे सांगायला नको. वांद्रे येथील रंगशारदा नाटय़गृहात हा आवाज घुमला, तेव्हा त्या मंचावर आता आपल्या राजकीय संभ्रमाच्या शंकासुराचा अचूक वेध घेऊन स्वबळाचा दशावतारी राजाच अवतरतो आहे, असा भास लांबलांबून आलेल्या उपस्थितांना झाला असेल!
त्या उद्गारांमध्ये आत्मविश्वास होता, आणि खरेपणासुद्धा.. पुलवामाच्या घटनेनंतर देश स्तब्ध झाला नव्हता का? होता! त्याच रात्री बोलणी सुरू नव्हती का? होती! ती बोलणी कशासाठी होती? युतीसाठी! आणि युती कशासाठी? अर्थातच सत्तेसाठी.. विरोधी बाकांवर बसण्यासाठी कोण कशाला युती करेल! असो. या बैठकीवर कोणी तरी कोरडे ओढणे आवश्यकच होते. तसे ट्विटर आदी समाजमाध्यमांवरून तोंड न दाखवता काहींनी ओढलेसुद्धा. पण पुलवामा घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या शेकडो समर्थकांचा मेळावा घेऊन, जाहीरपणे टीका करण्याची हिंमत कुणीही दाखवली नाही.. ती रंगशारदा नाटय़गृहात दिसली, याला म्हणतात आत्मविश्वास!
या आत्मविश्वासाला सत्याची जोड नव्हती असे कोण म्हणेल? तरीही काही जण म्हणतील.. ‘त्यांच्याकडे उमेदवार नाहीत’ या वाक्यावर खुसपटे काढतील. परंतु याच रंगशारदा नाटय़गृहात, त्याच शुक्रवार दिनांक १५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी घडलेली पुढली घडामोड खुलेपणाने जाणून घेतली, तर अविश्वासाचे तेवढे खुसपटदेखील गळून पडेल.. याच मंचावरून, स्वबळाच्या पहिल्या स्वाभिमानी उमेदवाराची घोषणा झाली.
खुलेपणाला जास्तच उधळू देणारे काही तज्ज्ञ सांगतील की, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षातर्फे लोकसभा निवडणूक- तीही स्वबळावर- लढवणार असलेल्या उमेदवारांची १०० टक्के नावे याच मेळाव्यात जाहीर झालेली आहेत. तज्ज्ञांचे सांगणे खोटे नसते, पण खरेही मानायचे नसते. खरे सांगण्यासाठी स्वाभिमान आवश्यक असतो, तो स्वाभिमान काही नेत्यांकडेच असतो. अशा नेत्यांचा स्वाभिमान, कुणा सत्ताधारी पक्षाच्या ‘घोषणापत्र समिती’त समावेश झाला म्हणून कमी होत नाही किंवा विरोधी पक्षांच्या आघाडीशी बोलणी केल्याने डागाळत नाही.
पुलवामाच काय, ‘२६/११’ च्या घटनेनंतरही कुणीही राजकारण करू नये आणि राज्याचे नेतृत्व तातडीने बदलले जावे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यासाठी स्वाभिमान आवश्यक असतो. अशा स्वाभिमानी नेत्यांना रसद कुठून मिळेल, मदत कुठून मिळेल, याची चिंता करावी लागत नाही. आघाडीकडून पाठबळ मिळेल, अशा आशेवर न राहता स्वत:च ‘तुमच्याकडे उमेदवार नाही’ असे आघाडीला सांगणे म्हणजे स्वाभिमान! स्वाभिमानाची ही महती ज्यांना माहितीच नाही, त्यांना म.स्वा. पक्षाचे संस्थापक नारायण राणे आणि पहिले उमेदवार नीलेश राणे ही नावे माहीत असण्याचा हक्कच नाही.