‘आजकाल राजकारणात नैतिकता राहिलेली नाही’.. लेलेंच्या बैठकीच्या खोलीतील ताजे वर्तमानपत्र उचलून घरी नेण्याआधी चाळताचाळता नेने पुटपुटले आणि लेलेंनी चष्म्याच्या काचेवरून त्यांच्याकडे पाहात चेहरा प्रश्नार्थक केला. मग नेनेंनी समोरच्या खुर्चीवर बैठक मारली, आणि वर्तमानपत्राच्या एका बातमीवर बोट ठेवले. ‘बघा ना.. राजीनामे खिशात असतानाही इमानेइतबारे एका पक्षाला पाठिंबा देणारे आपल्याकडचे राजकीय पक्ष कुठे, आणि जेमतेम दोन आमदारांच्या जिवावर मध्य प्रदेशच्या विधानसभेत सर्वात मोठय़ा पक्षाच्या सरकारला धारेवर धरणारे पक्ष कुठे.. शेवटी मराठी माणसाचं राजकारणही सुसंस्कृत असतं म्हणतात ते उगीच नाही’.. खुर्चीत स्वत:ला नीट बसवत नेने म्हणाले.  आता पुढे दहापंधरा मिनिटं नेने याच विषयावर लेलेंना राजकारण समजावून सांगणार हे ठरलेलं होतं. लेलेंनी नाकावरचा चष्मा नीट बसवला, आणि कुतुहलाने नेनेंकडे पाहिले. मग नेनेंनी वर्तमानपत्राची ती बातमी नीट  उघडली. मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या नव्यानव्या सरकारला बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा असलेल्या मायावतींनी चक्क धमकावले होते. राज्यकारभार सुरू करून जेमतेम दोन आठवडे होतात तोच मायावतींनी पाठिंब्याच्या मुद्दय़ालाच हात घातला होता. बहुमतासाठी दोन आमदारांची गरज असलेल्या काँग्रेसला मायावतींच्या पक्षाच्या दोघा आमदारांचा आधार मिळाल्याने काँग्रेसचे सरकार तरले, आणि कारभार सुरू होण्याआधीच मायावतींनी काँग्रेसला त्यांच्या ताकदीची पहिली जाणीव करून दिली. ‘आता काँग्रेसला मायावतींच्या नाकदुऱ्या काढत बसावे लागणार बघा!’ नेने तावातावाने म्हणाले. लेलेंनी नुसतीच मान हलविली. ‘पण ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचं तुम्ही काहीतरी म्हणालात नेने’.. नेनेंच्या हातातील वर्तमानपत्राकडे रोखून पाहात लेले म्हणाले. आपल्या घरी आलेले वर्तमानपत्र आता संध्याकाळी नेनेंच्या घरी जाऊनच मागून आणावे लागणार या विचाराने त्यांच्या कपाळावरची शीर काहीशी फुगलीच होती. नेनेंनी त्याकडे दुर्लक्ष केले, आणि घसा खाकरला. ‘हे बघा लेले, महाराष्ट्रातही आपल्या फडणवीसास बहुमत नाही. पण त्यांचा जुना मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेने मोठय़ा मनाने लहान भावाची भूमिका निभावली.. हो की नाही?’ लेलेंनी मान हलवून होकार भरला. ‘प्रसंगी सरकारला धारेवर धरू असेही अधूनमधून शिवसेना फडणवीसांस बजावते.. हे खरे ना?’ पुन्हा लेलेंनी मान हलविली. ‘राजीनामे आमच्या खिशात आहेत, असे सांगत साडेचार वर्षे गेली. पण काढले का कधी त्यांनी ते बाहेर?’ नेनेंनी डाव्या हातावर उजवी मूठ आपटत विचारले, आणि लेलेंनी नकारार्थी मान हलविली. ‘.. याला म्हणायचे राजकीय संस्कृती!’ आपला मुद्दा पटवून दिल्याचे ध्यानात येऊन नेने दिलखुलास हसले.  ‘सरकार कोसळेल असे काहीही त्यांनी कधी केले नाही. अगदी, त्यांचीच थुंकी त्यांच्याच तोंडावर उडणार असे फडणवीस म्हणाले, तरीदेखील!’.. पुन्हा एकदा नेने हसत हसत म्हणाले, आणि मायावतींच्या बातमीवर त्यांनी बोट ठेवले. ‘आता बघाच तुम्ही.. ही तर  सुरुवात आहे. ही बहीण, थोरल्या भावाला कसे ऊठसूट जेरीस आणते, आणि थोरल्या भावास धाकटेपणाची भूमिका घ्यायला लावते ते!’ नेने पुन्हा गडगडाटी हसत खुर्चीतून उठले, आणि वर्तमानपत्र काखेत खुपसून लेलेंच्या घरातून बाहेरही पडले. ‘संध्याकाळी वर्तमानपत्र परत आणून ही बातमी सविस्तर वाचली पाहिजे!’.. नेनेंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे  पाहात लेले पुटपुटले.

Story img Loader