आज कविकुलगुरू, नाटय़सम्राट विल्यमराव शेक्सरपियर हयात असते तर आपल्याच मांडीवर जोरदार थाप मारून खोखो हसले असते. म्हणाले असते, ‘आत्ता त्यांना समजला असेल माझ्या त्या वाक्याचा अर्थ.’ जग हे एक रंगभूमी आहे आणि आपण सारे केवळ त्या रंगभूमीवरचे कलाकार. तेव्हा रंगते आयुष्यात कधी कधी असेही नाटक. हसवाफसवीचे. माझ्याच ‘कॉमेडी ऑफ एर्स’सारखे.’ यातील ‘ते’ म्हणजे आपले रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभू. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मंत्रालयाच्या रूक्ष रंगमंचावरच असे एक बहारदार नाटक घडले. अगदी शेक्सपियरच्या ‘कॉमेडी ऑफ एर्स’चे किंवा त्यावरून बंगालीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी लिहिलेल्या ‘भ्रांतिबिलास’चे किंवा त्यावरून गुलजार यांनी काढलेल्या ‘अंगुर’ या सदाबहार चित्रपटाचे आधुनिक रूपच असे. त्यातील प्रमुख कलाकार होते, अर्थातच आपले एस. प्रभू आणि त्यांच्यासह दोन ममता आणि दोन तपन रॉय. फरक इतकाच, की ‘कॉमेडी ऑफ एर्स’ ही जुळ्या भावांची आणि त्यांच्या जुळ्या नोकरांची कहाणी होती. येथे पात्रे जुळी नव्हती. नावे मात्र सारखी होती. त्यातून उडालेली मौज मात्र सारख्याच बहारीची होती. त्याचे असे झाले की, अलीकडेच तृणमूलच्या नेत्या ममता यांचे स्वीय सचिव तपन रॉय यांनी रेल्वेमंत्रालयास दूरध्वनी केला. म्हणाले, ममतांना प्रभूंना भेटायचे आहे. वेळ हवी. ममता म्हणजे प्रभूंच्या एकेकाळच्या, वाजपेयी मंत्रिमंडळातील सहकारी. त्यांनी तातडीने आपल्या अधिकाऱ्यांना ममतांच्या सचिवास कळविण्यास सांगितले, की मंत्रालयात पाच मिनिटांची भेट कसली मागताय? मंत्र्यांच्या घरी जेवायलाच या. तेथे बोलू या. ममता येणार म्हटल्यावर प्रभू यांनी त्या दिवशीच्या सर्व भेटीगाठीही रद्द करून टाकल्या. अधिकाऱ्यांना सांगून ममतांसाठी खास भेटवस्तू आणण्यास सांगितली. एका अधिकाऱ्याने कोलकात्याला दूरध्वनी केला, की मॅडम त्या दिवशी दिल्लीत किती वाजता येणार आहेत? तिकडे कोलकात्यातील त्या अधिकाऱ्याला समजेनाच की हे असे काय विचारत आहेत? त्यावर जेव्हा उलटी चौकशी सुरू झाली तेव्हा लक्षात आले, की या ममता त्या नव्हेतच. ज्या ममतांना प्रभूंची भेट हवी होती त्यांचे नाव ममता ठाकूर. त्याही तृणमूलच्या. ममता बॅनर्जी यांच्या सचिवाचे नाव तपन रॉय. योगायोग असा की ठाकूरांच्या सचिवाचे नावही तेच. त्यामुळे हे सगळे अंगुरी नाटय़ घडले. हे ऐकल्यावर झालेल्या फसगतीने लोक हसले असते. पण प्रभू चिडले. त्यांनी आपले वैयक्तिक सचिव भालेराव, भेटीगाठी ठरविणारे अधिकारी ए व्ही एस राव अशा सगळ्यांची हजेरी घेतली. ज्याने दूरध्वनी घेतला त्या दूरध्वनी संचालकाची तर बदलीच करून टाकली. आज शेक्सपियर असते, तर हा अवघ्या नाटय़ाचा रसभंग करणारा प्रकार पाहून नक्कीच म्हणाले असते, ‘हे प्रभू त्यांना माफ कर, आपण कसे फसलो हे त्यांचे त्यांनाच कळाले नाही.’ पण आपले प्रभू पडले कोकणातले. अशी सारख्या नावांची माणसे उभी करून मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करायचा आणि समोरच्या उमेदवाराचा पत्ता कापायचा ही तेथील निवडणुकीतील आचारसंहिताच. कदाचित कधी काळी प्रभूंनाही त्याचा फटका बसला असेल. बहुधा या ‘मार्च-फूल’ मुळेच ते कोपले असतील. एरवी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याने या दोन ममतांच्या अंगुरीनाटय़ाचे अंगूर गोड मानून घेतले असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा