आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ हे मंगेश पाडगावकरांनी सांगितल्यावर मराठी माणसाला एका सत्याचा नव्याने साक्षात्कार झाला असला, तरी प्राण्यांच्या जगाला त्याचे खरेपण केव्हाच कळले असावे. म्हणूनच प्राण्यांच्या जगातील प्रेमाच्या कथा माणसाच्या प्रेमकथांहून प्रणयात्मक असतात. प्राणिविश्वातील प्रेमकाव्याचा सूर समजण्यासाठी तेवढी उमज मात्र असावी लागते. चंद्रपूरच्या विरूर व्याघ्रप्रकल्पातील चत्रा नावाची वाघीण आणि तेलंगणाच्या शिरपूर व्याघ्रप्रकल्पात मुक्काम हलवून राहिलेला वैशाख नावाचा वाघ यांच्यातील अनोख्या प्रेमकाव्याची चर्चा सध्या चंद्रपूरच्या परिसरात सुरू आहे. मुळात हे प्रेमकाव्य आहे, विरहिणी आहे की संशयकल्लोळ याचा मात्र अजून शोध लागलेला नाही. वैशाखला भेटण्यासाठी चंद्रपूरच्या जंगलातली ही चत्रा दररोज म्हणे ८० किलोमीटरचा पल्ला ओलांडून शिरपूरच्या कावल व्याघ्रप्रकल्पात दाखल होते आणि तेवढेच अंतर पार करून पुन्हा विरूरच्या माहेरघरी परतते. कधी काळी चत्रा आणि वैशाखची नजरभेट झाली, मत्री जमली. विरूरच्या जंगलात हे प्रेम फुलत असतानाच कधी तरी वैशाखने महाराष्ट्राची हद्द ओलांडून तेलंगणाच्या कावल व्याघ्रप्रकल्पात मुक्काम ठोकला आणि इकडे चत्रा व्याकूळ झाली. चत्राने त्याच्या शोधासाठी परिसरातील सारी जंगले पालथी घातली. अखेर तिला वैशाख तेलंगणाच्या जंगलात सापडला. पुन्हा प्रेम बहरले तरी वैशाख मात्र घरी परतायला तयार नाही. आता बिचाऱ्या चत्राला रोजचा ८० किलोमीटरचा पल्ला ओलांडून वैशाखविरहाची व्यथा शमवावी लागते. प्रेमाच्या अग्निपरीक्षेत चत्रा उत्तीर्ण झाली असली, तरी वैशाखच्या वागण्यात काही तरी गडबड असली पाहिजे, असे उलटय़ा चष्म्यातून दिसते आहे. वनाधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला पाहिजे. वैशाखचा बाहेरख्यालीपणा वाढला तर नाही ना, असा संशय आम्हास येऊ लागला आहे. प्रेम एरवी सेम असले, तरी माणसांच्या जगात प्रेमभंगदेखील होतात. मग दुरावा, अबोलाही वाढतो आणि कधी कधी तर अ‍ॅसिडहल्लेही होतात. आता चत्रा रोज कावलला जाते ती प्रेमापोटी की वैशाखच्या बाहेरख्यालीपणावर नजर ठेवण्यासाठी हे कळायला आपणास मार्ग नाही. जंगलातले कॅमेरेदेखील या प्रेमप्रमेयाची उकल करू शकतील असे वाटत नाही. पण खरोखरच वैशाख-चत्राचे प्रेम निखळ असेल, तर उगीचच ही विरहिणी आणखी न ताणता, वैशाखने घरी परतावे आणि पुन्हा आपला संसार सुरू करावा असा सल्ला माणसांच्या प्रेमशाळेतील कोणताही लव्हगुरू देईल. वैशाखला त्याच्या भाषेत हे कसे समजावायचे, हा प्रश्न बाकी उरतो. तो कसा सोडवायचा, हे वनाधिकाऱ्यांनी पाहून घ्यावे. तोवर चत्रा प्रेमभंगाच्या भावनेने दुखावणार नाही, दगाफटका करणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी..

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh padgaonkar and there poem