लोकसभेची निवडणूक कधी नव्हे तितकी रंगतदार होण्यासाठी जे जे आवश्यक असते, ते सारे एकत्र आले, आणि चार टप्पे पूर्ण  झाल्यानंतर हा रंग अधिकच गहिरा झाला. त्याआधीही अनेकांनी आपले आपले रंग भरले, पण जो रंग नेमका उमटावयास हवा होता, तोच अवतरलेला नव्हता, त्यामुळे काहीसा नीरसपणाही उमटू लागला होता. माळेचे मणी ओढत राहावे, पण खुणेचा मणी गायब असल्याने सुरुवात कोठून झाली आणि शेवट कुठे झाला हेच कळू नये असेच हे झाले. खरे तर, एका माळेचे सारे मणी सारखेच, पण खुणेच्या मण्याचे महत्त्व आगळे. तो मणी गायब झाल्याने, उद्धारमंत्राचा जप करूनही या मंत्राची जपमाळ पूर्ण झाल्यासारखे वाटतच नव्हते. तो खुणेचा  मणी अचानक अवतरला, आणि उद्धारमंत्राच्या जपमाळेचा एक वेढा पूर्ण झाला. म्हणून त्या मण्याचे स्थान वेगळे! या माळेतील काही मण्यांची लकाकी खास होती, पण बरेचसे मणी एकाच गुणाचे. पुढे या माळेच्या उद्धारमंत्राच्या शक्तीचा साक्षात्कार झाला, आणि अनेक मणी एकाच माळेत जमा झाले. नेमके तेव्हाच,खुणेचा हा मणी अचानक गळून पडला. त्याची एक स्वतंत्र कहाणी आहे. त्याआधी त्या  मण्यानेच अनेकांना उद्धारमंत्राच्या दीक्षा दिल्या होत्या. दिग्विजय नावाचा एक मणी तर खुणेच्या मण्याशेजारीच, त्याच्याएवढय़ाच महत्त्वाच्या जागी स्थानापन्न होता. तो दिग्विजय मणी तळपत असतानाच, निरुपम नावाचा आणखी  एक मणी आपल्या तेजाची ओळख करून देऊ लागला, आणि त्याच्या तेजाने निवडणुकीचे रंग गहिरे होत असतानाच, सॅम मण्याच्या मुखातून मुक्ताफळांची बरसात सुरू झाली.. तिकडे, खुणेच्या मण्याच्या दुसऱ्या बाजूनेही काही मणी आपल्या तेजाला नवी चकाकी देण्याचा प्रयत्न करतच होते. निवडणूक जवळ येऊ लागली, तेव्हा सारेच मणी चमकू लागले होते. आता सारी माळच चमकदार झाली होती, आणि खुणेचा मणी जागेवर येताच मंत्रजपाला जोर आला. दोन वर्षांपूर्वी जो ‘नीचउद्धार मंत्र’ अंगाशी आला होता, त्याच मंत्रामध्ये जबरदस्त ताकद आहे, असा साक्षात्कार खुणेच्या मण्यास झाला, आणि आल्याबरोबर त्याने पुन्हा, दोन वर्षांपूर्वी निष्प्रभ झालेल्या त्या नीचउद्धार  मंत्राचाच जप सुरू केला. त्याआधी, सॅमकाकांच्या ‘हुआ तो हुआ’ मंत्राची मात्रा अंगावरच उलटल्याने काकांनी मंत्रजपातून काढता पाय घेतला होता, तर निरुपम मण्याचे  तोंड शिवले गेले होते. दुसरीकडे दुसऱ्या बाजूच्या मण्यांनी आपल्या पोतडीतील उद्धारमंत्रांचा मारा सुरू केला, आणि निवडणुकीच्या राजकारणावर या मंत्राचा प्रभाव पडणार असे  दिसू लागताच, अस्वस्थ झालेल्या खुणेच्या मण्याने तोंड उघडले. नीचमंत्र हाच खरा मंत्र, असे त्याने ठासून सांगितले, आणि सारी माळ            त्या मंत्राभेवती उलटसुलट फिरू लागली. सारे मणी एकाच माळेचे असले, तरी काही मणी उलटय़ा दिशेने, तर काही सुलटय़ा दिशेने परस्परांवर या मंत्राचा मारा करताना दिसू लागले. अशा तऱ्हेने, नीचमंत्रजपाने भारित एकाच माळेचे मणी आता गरगरा फिरू लागले आहेत. खुणेच्या मण्याला आता जुनी ओळखही मिळाली आहे. तोच हा ‘मणिशंकर’!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा