एकदा एखादे लक्ष्य निश्चित केले, की मागे वळून पाहायचे नाही हा महाराष्ट्राच्या वनखात्याचा बाणा मोठा कौतुकास्पद आहे. राज्याच्या तीन लाख चौरस किलोमीटरच्या भूमीपैकी जेमतेम ६३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर गेल्या पन्नास वर्षांपासून पसरलेला वनक्षेत्राचा पसारा येत्या तीन वर्षांत एक लाख चौरस किलोमीटपर्यंत वाढविण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या वनखात्याची ‘हरित सेना’ कंबर कसून कामाला लागली आहे. वास्तवात गेल्या ३० वर्षांत वनक्षेत्र तब्बल दहा हजार चौरस किलोमीटरने घटले आणि हे आव्हान आणखीनच खडतर बनले. कोणे एके काळी, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी एक घोषणा गावागावांतील घरांच्या भिंतींवर रंगविलेली असायची. तरीही वनक्षेत्राचा पसारा आटतच चालला हे पाहून वनांनी वेढलेल्या चंद्रपुरात वाढलेल्या मुनगंटीवारांच्या मनाला क्लेष होणे साहजिकच होते. सत्तांतरानंतर लगेचच अवघे राज्य हिरवाईने आच्छादून टाकण्याच्या महत्त्वाकांक्षेने, एका खांद्यावर वनमंत्रिपदाची धुरा आणि दुसऱ्या खांद्यावर कुदळ-फावडे घेऊन मुनगंटीवार कामाला लागले. झाडे जगविण्यासाठी आधी झाडे लावून तरी दाखविली पाहिजेत, हे त्यांच्या खात्याने ओळखले आणि ‘झाडे लावा’ मोहीम सुरू झाली. त्यासाठी राज्यात ‘हरित सेना’ स्थापन झाली. पावसाळ्याचे ढग आकाशात दाटू लागले, की झाडे लावण्याच्या ध्यासाने अवघे वनखाते झपाटून जाते आणि मिळेल त्या जागी झाडे लावण्याचा सपाटा सुरू होतो. सरकारी काम नेहमी आदेशानुसार आणि नियमानुसार पार पडत असते. ‘झाडे लावा’ असा आदेश आला आणि झाडे लावण्याची लाट आली. गेल्या वर्षी लावलेल्या झाडांपैकी जेमतेम ६० टक्के झाडांनी कसा तरी तग धरला, ९० लाख रोपटय़ांनी जीव धरण्याआधीच माना टाकल्या, पण वनखाते डगमगले नाही. जुनी झाडे मेली तरी चालतील, पण नवी झाडे लागलीच पाहिजेत, या निर्धाराने नव्या पावसाळ्यात ही मोहीम वनखात्याने नव्याने हाती घेतली आणि चार कोटी रोपटी आकाशवेध घेण्याची स्वप्ने पाहू लागली. आपले जगणे किंवा मरणेदेखील वनखात्याच्या मर्जीवर अवलंबून आहे, याची त्या नव्या रोपटय़ांना जाणीव असेलच असे नाही. गेल्या वर्षी आपल्यासारख्याच एक कोटी रोपटय़ांनीही जगण्याचे स्वप्न पाहिले आणि मूळ धरण्याआधीच माना टाकल्या, हे या नव्या रोपटय़ांना माहीत नसणार. सरकारी अहवालांचे कागद त्यांना वाचता येत नाहीत, हेच त्यांच्या हिताचे आहे. जगण्याच्या उमेदीने जमिनीत मुळे रुजविण्याच्या त्यांच्या स्वप्नांना किमान शुभेच्छा तरी द्यायला हव्यातच! पुढच्या तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा ‘हरित सेनापतीं’चा निर्धार आहे. तसे झालेच, तर राज्याच्या एक लाख चौरस किलोमीटर क्षेत्राला हिरवाईचे आच्छादन लाभेल, पण त्यासाठी किमान दहा कोटी रोपटय़ांना बलिदानाची तयारीही ठेवावी लागेल. कारण ‘झाडे लावा’ असा सरकारी आदेश आहे. ‘जगण्या’ची जबाबदारी त्या बिचाऱ्या रोपटय़ांचीच असेल!..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा