मराठी भाषेत अनेक शब्दांना संवेदना आणि सौंदर्यही आहे, याची ओळख मराठीविषयी फारसे ज्ञान नसलेल्या अनेकांना होण्यास न्यायालयाच्या एका ताज्या ताशेऱ्यामुळे मदत होईल. येत्या २७ तारखेला मराठी भाषा दिवस साजरा केला जाईल. मराठीची अभिमानगीते गावोगावी आणि जागोजागी गायिली जातील. नेमक्या याच वेळी मराठीतील शब्दांचे सौंदर्य किंवा त्यामागील भावनांचा उलगडा करून देण्यासाठी कोणत्या का निमित्ताने होईना, न्यायालयाने पुढाकार घेतला हे बरे झाले. तसेही, काही शब्दोच्चारांच्या सुरुवातीला तीव्र आघात असल्यामुळे त्यांच्या अर्थाविषयी उगीचच संशय घेतला जात असल्याने त्या अक्षरांनाच एक नकोसा वास येत असतो. पण थोडय़ाशा संवेदनशीलतेने ती अक्षरे कुरवाळली, तर त्यांमध्ये असलेल्या सौंदर्याचा स्पर्शही सुखावून सोडणारा असतो. मराठीतल्या ‘भ’, ‘फ’, ‘घ’ अशी तीव्र आघाती अक्षरे जणू शिव्यांना जन्म देण्यासाठीच निर्माण झाली असावीत, असा प्राथमिक समज असला तरी या अक्षरांनी सुरू होणाऱ्या शब्दांनाही सौंदर्य आणि संवेदना असते. काही शिव्या तर, त्यामागील भावनेशी जोडल्या गेल्या तर त्यामधील जिव्हाळ्याचा स्पर्शही सुखावणारा असतो. त्यामुळे विशिष्टप्रसंगी केलेल्या मराठी शिव्यांच्या उच्चारातून त्यामागील भावना समजून घेण्याची क्षमता फक्त मराठी मनाकडेच असते. म्हणूनच मराठीची जाण नसलेल्यांनी दिलेल्या शिवीमागील भावना ओळखणारे मन दुखावते. मुंबईत नववर्षांचे स्वागत अनेकांनी अनेक परींनी केले. त्याचा उत्साह दांडगा होता. एका स्वागत सोहळ्यात सहभागी झालेल्या एका जोडप्याशी पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यामध्ये ‘घाटी’ हा शब्द उच्चारला गेला. ज्या पश्चिम घाटाला निसर्गसौंदर्याचे लेणे लाभले आहे, त्या घाटाच्या सहवासात राहणाऱ्यांसाठी घाटी हा शब्द अभिमानिबदू असला, तरी मुंबईत मात्र तो काहीशा उपहासानेच व उपेक्षेसाठीच वापरला जातो. त्या शाब्दिक बाचाबाचीतही त्या शब्दामागील उपहास स्पष्ट झाला आणि मुंबईत ‘घाटी’ हा शब्द अनेकांना शिवीसारखा वाटतो, हे न्यायालयानेही मान्य केले. आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अभिमानिबदू असलेला ‘घाटीपणा’ मुंबईतही अभिमानाने मिरविला जाईल. ‘गर्व से कहो, हम घाटी है’.. अशी एखादी नवी घोषणा देताना कुणालाही कमीपणा वाटणार नाही आणि तीव्र आघाती अक्षरे नेहमीच शिव्यांच्या शब्दांचे जनक नसतात, हेही उमजून येईल. मराठीतील ‘भ’ची बाराखडी जणू शिव्यांची गटारगंगा असावी अशा समजुतीने बदनाम झालेली आहे. पण याच ‘भ’च्या बाराखडीने भय, भूक, भ्रष्टाचाराविरुद्धच्या जाणिवाही जागविल्या आहेत. भावनेच्या ओलाव्यानिशी समोर आलेली एखादी शिवीदेखील कधी कधी सहज समजून घेतली जाते. म्हणूनच, शिवीलादेखील संवेदना असतात आणि शिवीमागील भावनांचा पोत महत्त्वाचा असतो. मुंबईत शिवीसारखा वापरल्या जाणाऱ्या घाटी या शब्दाला न्यायालयाने प्रतिष्ठा मिळवून दिली, हे मराठी भाषा दिनाच्या पाश्र्वभूमीवर कौतुकास्पद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा