सांप्रतकाळी आपल्या देशी मराठी नाटय़ परिनिरीक्षण मंडळ नामक ‘सेन्सॉर’वाली मंडळी नसती तर मराठी संस्कृतीचे, समाजाचे आणि एकुणातच नैतिकतेचे काय झाले असते, हा गहन संशोधनाचाच विषय ठरावा. या मंडळामुळेच मराठी नाटय़रसिकांची नाटय़ाभिरुची टिकून राहिलेली आहे. हे करताना अनेकदा मंडळींना मोठा संघर्ष करावा लागला. टीकेचे वार, निंदेचे प्रहार झेलावे लागले. ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’ अशा ‘तें’च्या किंवा त्यांच्यासारख्यांच्या नाटकांचे प्रयोग काही काळ तरी रोखून रंगभूमीचे पावित्र्य टिकविण्याचे काम याच मंडळींनी केले. आज ‘जय भीम, जय भारत’ या नाटकाला अडवून या मंडळींनी त्याच लढाईच्या स्मृती पुन्हा ताज्या केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी आणि एक दलित कार्यकर्ता यांच्यातील काल्पनिक संवादांतून आजच्या सामाजिक, राजकीय स्थितीवर भाष्य करणारे हे नाटक. वस्तुत: कोणत्याही लेखकाने असा विषय मुळात घ्यायलाच नको. विषय कसे कौटुंबिक जिव्हाळ्याचे, काळजाच्या कुहराचा वेध घेणारे हवेत. नैतिक आदर्श ठेवणारे हवेत. नाटक, चित्रपट हा काही समाजाचा आरसा नव्हे. काही लोक तसे मानतात, परंतु ते धादांत चुकीचे आहे. समाजातील कुरूपे तर पडद्यावर वा मंचावर अजिबात येता कामा नयेत. कलेचे खरे व अंतिम कार्य मनोरंजनाची हवा येऊ देणे एवढेच असते. पण प्रस्तुत नाटकात जनभावना भडकतील, स्मृतींच्या जखमा ताज्या होतील असा मसाला आहे म्हणतात. त्यामुळेच मंडळींनी त्याला आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे एवढेच असावे की, नाटक हे एरवीही काल्पनिकच, तर त्याला वास्तवाचा वेश कशाला चढवायचा? तेव्हा खैरलांजी हे नाव बदलावे. त्यास वैरांजली म्हणावे. कुत्रा शब्द कशाला हवा? तेथे श्वान म्हणावे. रमाबाईनगराचे नामांतर मीराबाईनगर असे करावे. नामदेव ढसाळ यांच्या कविता विद्यापीठात शिकवल्या जात असताना त्यांतील काही ओळी नाटकात घेऊन असे काय घोडे मारणार आहात आपण? तेव्हा त्या वगळाव्यात. थोडक्यात सांकेतिकपणे सगळे मांडावे. साहित्य सांकेतिक असावे असा संकेतच ते सांगत आहेत. तो प्राचीनतम होऊनही बराच काळ लोटला म्हणून त्यास नाकारावे असे थोडेच आहे? तेव्हा त्यावरून वाद होण्याचे काहीच कारण नाही. राहता राहिला प्रश्न शब्दांचा. तर कोणतीही कलाकृती ही समग्रतेनेच पाहायची असते, त्यातील सुटय़ा वाक्यांचा, शब्दांचा संदर्भ ध्यानी घ्यायचा असतो, त्यातून समग्र अर्थाकडे जायचे असते, हे खरेच. परंतु मंडळाला केवळ कलाजाणिवा ठेवूनच भागत नसते. शेवटी राजकीय परिस्थितीही लक्षात घ्यावीच लागते. जशी ती ‘मी नथुराम’च्या वेळी ध्यानी घेतली होती. ते चरित्रात्मक नाटक असूनही त्यात काल्पनिकतेच्या आणि अनैतिहासिकतेच्या भरपूर भराऱ्या होत्या. इतक्या की, य. दि. फडके यांच्यासारख्या अभ्यासकांनी त्यावर पुस्तक लिहिले. तरीही ते संमत करण्यात आले. तशाच काल्पनिकतेच्या भराऱ्या ‘जय भीम, जय भारत’ने मारल्या असत्या, तर आक्षेपाचे काही कारणच नव्हते. आता त्याच्या निर्मात्यांना हे आक्षेप स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. शब्द बदलायचे नसतील तर किमान आक्षेपार्ह शब्दांच्या जागी बीप ध्वनीचा वापर केलाच पाहिजे. सेन्सॉरचा आणि पर्यायाने सामाजिक नीतिमूल्यांचा, शांततेचा, सौहार्दाचा जय होण्यासाठी हे बीप ध्वनी आवश्यकच आहेत. किंबहुना ते समाजातील अनेक नेते, अभिनेते आदींच्या वक्तव्यांना पर्यायस्वरूप आले तरी चालतील. सेन्सॉरने याचाही विचार जरूर करावा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा