‘तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यास करताय तात्या.. माध्यमांसारखे वागू नका!’.. नाना वैतागूनच बोलले आणि तात्यांना हसू आवरेना. नाना आणि तात्यांचे संवाद म्हणजे उभ्या चाळीची करमणूक असायची. घूमजाव करायची नानांची सवय तात्यांना माहीत होती. म्हणूनच, नानांना कोंडीत पकडायचा छंदच तात्यांना लागला होता. नाना वाद घालायला लागले, की त्यांचीच जुनी वाक्ये त्यांच्यासमोर फेकायची आणि नानांच्या वैतागण्याची मजा घ्यायची हा तात्यांचा खेळच झाला होता. संध्याकाळी नानांच्या घरी गप्पांची बैठक जमवताना चहाचे घोट घेत नानांची वक्तव्ये त्यांच्या गळ्यात मारणे हा तात्यांचा रोजचा टाइमपास होता. आजही संध्याकाळ होताच तात्या नानांच्या घरी गेले. नेहमीप्रमाणे सकाळी नानांच्याच घरून वाचावयास नेलेले वर्तमानपत्र तात्यांनी काखोटीस मारले होते. सध्या निवडणुकीचे दिवस असल्याने, नानांनी केलेल्या विश्लेषणाची खिल्ली उडविण्याचा नवाच छंद तात्यांना लागला होता.   तात्यांनी एका बातमीवर बोट ठेवले, आणि नाना बोलू लागले. ‘पाकिस्तानात विमाने घुसविण्याचा सल्ला साहेबांनीच दिला हो सरकारला. आमचे साहेब संरक्षणमंत्री होते, त्यांच्या सल्ल्याशिवाय सरकारचे पानच हलणार नाही..’  नाना म्हणाले आणि नेमकी हीच संधी साधून तात्यांनी वर्तमानपत्र उघडून ‘ती’ बातमी नानांच्या समोर नाचविण्यास सुरुवात केली. ‘नाना, कालची बातमी आज आम्हाला सांगताय होय?.. मीच सरकारला सल्ला दिला, असे साहेब काल म्हणाले होते. आज ही बातमी जुनी झाली. आज बघा, असा सल्लाबिल्ला काही मी दिला नव्हता असे तुमचे साहेबच म्हणतायत’.. तात्यांनी खिजविले आणि नानांचा चेहरा गोरामोरा झाला. ‘तात्या, तुम्हाला सांगतो.. माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका.. ही बातमी काल वर्तमानपत्रात छापूनही आली होती.’ नाना रागाने बोलले, आणि तात्यांना हसू आवरेना..  ‘नाना, बघा आजकालची माध्यमे.. साहेबांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास करतात. अगदी तुमचे सरकार होते, तेव्हाही साहेबांच्या बोलण्याचा माध्यमांनीच विपर्यास केला होता.. फायलींवर सही करताना त्यांच्या हाताला लकवा मारतो असे कोण म्हणाले होते?.. सांगा बरे?’.. नानांना कोंडीत पकडण्यासाठी तात्यांनी जुना खडा टाकला, आणि नाना थबकले. ‘कोण म्हणजे? साहेबच म्हणाले होते’.. नानांनी चुटकीसरशी दिलेले उत्तर ऐकून तात्यांनी चुटकी वाजवली. ‘नाना, तुम्ही चुकलात.. तेव्हाही माध्यमांनीच तो विपर्यास केला होता हो’.. तात्या म्हणाले, आणि नानांनी बनियनने चेहरा खसाखसा पुसला.. ‘असेल असेल, ही माध्यमे तर नेहमीच साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास करतात आणि वर, साहेबांनी घूमजाव केले म्हणून तोरा मिरवितात’.. नाना रागाने म्हणाले, आणि तात्या पुन्हा हसू लागले.. ‘नाना, आजकाल घूमजाव करायची सोय राहिलेली नाही. मोठय़ा नेत्यांची भाषणे लगेचच टीव्हीवर जिवंत दिसतात हो’.. तात्या म्हणाले, आणि नानांनी पानाचा तोबरा तोंडात कोंबला.. बोलती बंद झाली की नाना तोंडात पानाचा तिहेरी विडा कोंबून मौन धारण करतात, हे तात्यांना माहीत होते. म्हणून चहाचा कप बाजूला ठेवून तात्या उठले आणि पाठ फिरवत ‘घूमजाव’ करून ते नानांच्या घरातून बाहेर पडले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा