या अफाट विश्वाच्या जगड्व्याळ पसाऱ्यात आपल्याशी नातं असलेलं कुणी तरी, पृथ्वीपासून दूर कुठे तरी, अज्ञाताच्या प्रदेशात एकाकीपणे का होईना, आपल्या शक्तिनिशी लुकलुकत असतं. त्याची स्वयंप्रकाशी किरणे हजारो प्रकाशवर्षे दूर असली तरी कुठे तरी पोहोचून आपल्या अस्तित्वाचे अंश उधळतात, ही जाणीवदेखील अतिशय सुखावणारी आहे. धृवतारा माहीत होतो, तो धृवबाळाची गोष्ट ऐकून.. मग आपल्याला माहीत असलेल्या कुणाचे नाव अंतराळातल्या एखाद्या ग्रहाला मिळाले, तर त्यामुळे मिळणारा आनंद तर साहजिकच त्याहून शतपटीने अधिक असावयास हवा यात शंका नाही. अशा नावांची ओळख एखाद्या ग्रह-ताऱ्याला मिळाल्यावर त्या ग्रहाच्या भावना कशा असतील, ते आपणास समजणे शक्य नाही. कदाचित, तो ग्रह जेथे कुठे आपल्या अस्तित्वाची खूण असलेल्या प्रकाशाची किरणे आसपासच्या ज्या विश्वावर उधळत असेल, त्यालाही त्या नावाची जाणीव असणे शक्य नाही. तरीही, या ग्रहाला आपल्या माणसाच्या नावाची ओळख मिळाल्याचा आनंद होणे आणि स्वैरपणे उधळून तो आनंद साजरा करणे हा माणसाच्या भावनांचा साहजिक आविष्कार असतो. तसा आनंद उधळण्याची संधी आज पुन्हा आपल्याला मिळाली. संगीताच्या विश्वात स्वत:चे असे एक अढळपद निर्माण करणाऱ्या पंडित जसराज यांचे नाव ग्रहमालिकेच्या पसाऱ्यात मंदपणे तेवणाऱ्या एका लहानशा ग्रहास देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय खगोलविज्ञान संघटनेने घेतला.. मंगळ आणि गुरूच्या आसपास असलेल्या या लहानशा ग्रहावर वातावरण आहे की नाही हे कदाचित आपल्याला माहीतही नसेल. तरीही आपल्या मनातील आनंदाच्या लहरी त्या अज्ञात लघुग्रहाच्या दिशेने नक्कीच अंतराळात झेपावतील आणि भारतीय शास्त्रीय संगीताची एखादी तरी लकेर त्या दिशेने अवकाशात उमटेल! भारतातील मोजक्या नामवंतांच्या नावाची ओळख मिरविण्याची संधी या विश्वातील अगणित ग्रह-ताऱ्यांपैकी आठ-दहाच ग्रहांच्या नशिबी आली आहे. विष्णु रेड्डी, हंसा पद्मनाभन, सैउद्दीन पट्टाझी, विष्णु जयप्रकाश, अनीश मुखर्जी, देवराध्य सरकार, हेतल वैष्णव, अक्षत सिंघल, माधव पाठक, विश्वनाथन आनंद यांचे नाव मिरविणारे ग्रह आज अवकाशात आहेत. पंडित जसराज यांचे नाव मिळाल्याने, आणखी एका अनामिक ग्रहाला एक ओळख मिळाली आहे. आपल्या जगापासून हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या, जवळपास तेरा वर्षांपूर्वी आपल्या प्रगत विज्ञानासही अज्ञात असलेल्या आणि आपल्या जगाशी ओळख झालेल्या या लहानशा ग्रहाचे यानिमित्ताने आपल्याशी भावनिक नाते जडावे, हा एक आनंदयोग म्हटला पाहिजे. पंडित जसराज यांचे नाव देऊन खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतीय शास्त्रीय संगीताची पताका विश्वाच्या विशाल पसाऱ्यात फडकावली, ही आनंद उधळण्याचीच घटना. एखाद्या लहान ग्रहावर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणारे पंडित जसराज हे पहिले संगीतज्ञ ठरले, ही त्या आनंदक्षणावरची साखरपेरणी.. अंबरातल्या या अढळपदावर कधी हवेची झुळूक वाहात असलीच, तर त्यातून उमटणारा आवाज भारतीय शास्त्रीय संगीताचा असावा, ही काव्यात्म अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही..

Story img Loader