तब्बल एक महिन्यानंतर आमदारसाहेबांची पाजेरो गावाकडे वळली आणि वाडय़ावर मॅनेजरचा फोन वाजला. सकाळच्याला साहेब घरी येणार असा निरोप मॅनेजरने वैनीसायेबांना दिला आणि वाडय़ावर धामधूम सुरू झाली. लगेचच गावात बातमी पसरली. लगोलग गावात स्वागताचे फ्लेक्स लागले. वाडय़ाबाहेरचा मांडव पताकांनी सजला. वाडय़ावर झेंडाही फडकला. पहाट फुटू लागली तसा गाव वेशीवर लोटला. लांबवर धुरळ्याचा लोट उसळताच ताशे तडतडू लागले. बॅन्जोने सूर लावला अन् कार्यकर्त्यां पोरांनी शिटय़ा वाजवत डान्स सुरू केला. तब्बल एक महिना मुंबईत सगळ्या पंचतारांकित हॉटेलांची बडदास्त झोडपून आमदारसाहेब वाडय़ावर येणार असल्याने वैनीसाहेब आणि कारभारी काळजीतच होते. घरात पंखे होते, फ्रिज होता, दिवाणखान्यात आणि बेडरूममध्ये एसी होता. तरीही कारभाऱ्याला घोर लागला होता. लाइटच नसेल तर एसी कसा लावायचा, हा विचार त्याला छळत होता. सकाळी जातीने देखरेख करून साहेबांच्या खोलीत विहिरीच्या पाण्याचं मडकं भरून ठेवलं होतं हे कारभाऱ्याला आठवत होतं; पण आता त्याचं डोकं चक्रावलं. महिनाभर मुंबईतल्या सगळ्या ‘फायस्टार’ हाटेलात राहून साहेबाची विहिरीच्या पाण्याची सवय मोडली असणार.. आयत्या वेळी गावात बिसलेरी मिळाली नाही तर साहेब आपली बिनपाण्याने हजामत करणार या भीतीने त्याला सुचेनासे झाले. एवढय़ात पाजेरो वेशीवर आली. रावसाहेब नमस्कार करतच बाहेर उतरले आणि कारभारी रावसाहेबांकडे पाहातच राहिले. साहेबांचा रंग चांगलाच उजळला होता. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मावळल्या होत्या, डोळ्याखालची काळी वर्तुळंही गायब झाली होती. ‘साहेबांना मालिशची सवय लागली वाटतं’.. आता गावाकडं मालिशवाला कुठून आणायचा, या विचारानं कारभारी कातावला. तोवर साहेब समोर उभे राहिले होते. साहेबांनी कारभाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हात उंचावून गर्दीच्या स्वागताचा स्वीकार करत कारभाऱ्यासोबत साहेब पुन्हा पाजेरोमध्ये बसले. थोडय़ाच वेळात गाडी वाडय़ावर पोचली. दरवाजावर वैनीसाहेब पंचारती घेऊन उभ्या होत्या. त्यांनी रावसाहेबांकडे पाहिलं आणि त्यांच्याही डोळ्यात आश्चर्य उमटलं. हा पंचतारांकित हाटिलातल्या मुक्कामाचा परिणाम.. वैनीसाहेबांनी साहेबांना ओवाळलं. दिवाणखान्यात येऊन सोफ्यावर बसताना साहेबांनी चहूकडे नजर फिरवली. त्यांच्या डोळ्यात नापसंती उमटली होती. तितक्यात हरकाम्या मॅनेजरने चहा आणला. साहेबांची स्पेशल कपबशी असलेला ट्रे त्याने समोर ठेवला आणि साहेबांचं तोंड कसंनुसं झालं. ‘फायस्टार’ हॉटेलातल्या सकाळच्या चहाच्या जामानिम्याची आठवण साहेबांच्या डोळ्यात उमटली होती. साहेबांनी नाराजीनंच कप तोंडाला लावला. फायस्टारमधे सगळा चहा संपवून कप रिकामा करायचा नसतो, हे साहेबांना माहीत झालं होतं. दोन घोट घशाखाली ओतून नाराजीनंच साहेब उठले, गर्दीही पांगली. वैनीसाहेब दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. झणझणीत लसणाच्या फोडणीचा वास वाडय़ात दरवळला आणि साहेब पुन्हा फायस्टार लंचच्या आठवणीने कासावीस झाले.. त्यांनी खोलीतला दांडीवरचा टॉवेल उचलला आणि न्हाणीघरात जाऊन थंड पाण्याच्या दहाबारा घागरी डोक्यावर घेत आंघोळ उरकली. डोकं खसाखसा पुसत बाहेर येताना साहेबांच्या मनात ‘फायस्टार’ बाथरूममधली शाही आंघोळीची आठवण रुंजी घालत होती. अंगाला चिकटलेला लाइफबॉयचा वास त्यांना नकोसा वाटू लागला. असंच परत मुंबईला जावं, असाही विचार त्यांच्या मनात आला. पण रावसाहेबांनी तो झटकला. पुढच्या पाच वर्षांत वाडय़ाचाच ‘फायस्टार’ कायापालट करून टाकायचा, असं त्यांनी मनाशी ठरवलं आणि कारभाऱ्याला हाक मारली. तो समोर येताच त्याला घेऊन आमदारसाहेब आत गेले. बंद दरवाजाआड वाडय़ाच्या ‘रिनोवेशन’वर खल सुरू झाला!
‘काया’पालट..
बंद दरवाजाआड वाडय़ाच्या ‘रिनोवेशन’वर खल सुरू झाला!
Written by लोकसत्ता टीम
First published on: 29-11-2019 at 04:32 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla in 5 star hotels in maharashtra maharashtra mlas stay in five star hotel zws