शिवाजी पार्कलगतच्या ‘कृष्णकुंज’मध्ये १२ ऑक्टोबर २०१८ ही तारीख काहीशी अस्वस्थपणेच उजाडली होती. ‘तारीख अस्वस्थपणे- किंवा स्वस्थपणे – कशी काय उजाडते?’ हा प्रश्न विचारू नका. आधी पार्श्वभूमी नीट समजून घ्या. १२ ऑक्टोबर. म्हणजे तोवर, गुजरातमधला कामधंदा सोडून हजारो मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधल्या आपापल्या मूळ गावी नुकतेच परतलेले होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून या ‘भय्यां’वर तिकडे गुजरातमध्ये होणारे हल्लेही ‘त्या’ अस्वस्थ सकाळपर्यंत ओसरू लागलेले होते आणि चॅनेलीय चर्चामध्येही गुजरात सोडून गावी पळणाऱ्या ‘भय्यां’चा विषय दिसत नव्हता. परंतु चॅनेलचर्चा नसल्या किंवा एकंदर गुजरातमधल्या उत्तर प्रदेशींवर होणाऱ्या हल्ल्यांची कुठेच फार वाच्यता नसली, म्हणून संजय निरुपम काही थांबले नव्हते. नागपूरला जाऊन ते म्हणाले होते – उत्तर भारतीय नसतील तर मुंबई बंद पडेल! या विधानावरचा गदारोळ मात्र दोन-तीन दिवस नंतरही सुरूच होता. अशा त्या दिवशी ‘उत्तर भारतीय महापंचायत संघा’चे शिष्टमंडळ कृष्णकुंजमध्ये पोहोचणार होते. भेटीची वेळ ठरलेली होती. ‘शिष्टमंडळ ठरल्या वेळेवर आले का? समजा आले, तरी त्यांना ठरल्या वेळी भेट मिळाली का?’ असे प्रश्न विचारू नका. आधी भेटीचे महत्त्व नीट समजून घ्या. याच भेटीनंतर हिंदी प्रसारमाध्यमांवर बातम्या झळकल्या- मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयों को करेंगे संबोधित. दो दिसम्बर को होगा भाषण. ती फेकन्यूज नाही, याची खात्री करण्यास मराठी प्रसारमाध्यमांना काहीसा वेळ लागला असेलही. आता, ‘वेळ का लागला?’ हा प्रश्न नका विचारू. बातम्या सर्वत्र आल्या, हे समजून घ्या.  त्या भेटीला आता महिना उलटला. ‘दो दिसम्बर’ला दोन आठवडे राहिले. आता तर, इंग्रजी प्रसारमाध्यमेही राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या ‘फोरम’वर जाणार असल्याच्या बातम्या देऊ लागली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी अशी सारीच माध्यमे आता ‘काय बोलणार राज ठाकरे?’ असा प्रश्न विचारू लागली आहेत.

नीट समजून न घेताच होत आहे हे सगळे. म्हणूनच तर प्रश्न विचारले जातात.

राज ठाकरे यांनी जे शांतता आणि सौहार्द अभियान एका तपापूर्वी छेडले होते, त्याची रसाळ गोमटी फळे आता सर्वत्र लगडलेली आहेत. बिहारी समाजाच्या छठपूजेत आता एकही ध्वनिवर्धक नसतो, एकही रस्ता आणि कोणताही किनारा आता छठपूजेमुळे अडत नाही, उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेले सारे टॅक्सीचालक आता हात दाखवताच थांबतात, सौजन्याने बोलतात, प्रवासी सांगतील तिथे न कुरकुरता सोडतात आणि भाडेही अत्यंत वाजवी घेतात.. ‘एकाच क्रमांकाच्या दोन-दोन टॅक्सी’ ही राज यांनी मनसेच्या स्थापनासभेत केलेली तक्रारही आता इतिहासजमाच झाली असून, ‘ओला’ किंवा तत्सम खासगी सेवांमुळे तर मराठीच तरुणांना रोजगार मिळालेला आहे, मराठी तरुणांचेच काय पण मराठी विद्यार्थी, मराठी महिला, मराठी पेन्शनरांसकट सर्वाचे सारे प्रश्न संपलेले आहेत.. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्या बांधवांशी नाते जोडायलाच हवे. १२ ऑक्टोबरची अस्वस्थता ही नाते जोडण्यापूर्वीच्या हुरहुरीची होती. हेच जर तुम्हाला समजूनच घ्यायचे नसेल, तर तुम्ही बसा प्रश्न विचारत!

Story img Loader