मोबाइलच्या कर्णकर्कश्श रिंगटोनने बबड्याची तंद्री भंगली आणि दुसऱ्याच क्षणी त्याची भयंकर चिडचिड झाली. कुठून ऐकू येणारे झाकीर हुसेनच्या तबल्याचे बोल, कुठून ऐकू येणारे हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे सूर, व्हायोलीनची आणि माऊथ ऑर्गनची कुठून तरी ऐकू येणारी सुरावट हे सगळं ऐकण्यात त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. आणि मोबाइलच्या रिंगटोनने ती पार भंगली. गेला पाऊण तास तो रोजच्यासारखाच महाभयंकर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला होता. पण अलीकडच्या काळात हे ट्रॅफिक जॅम त्याच्यासारख्या संगीतप्रेमी माणसालाच नाही, तर भारतामधल्या सगळ्याच लोकांना महाभयंकर वाटेनासे झाले होते. उलट कुठल्याही शहरात जा, कधी एकदा आपण घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर किंवा जिथे कुठे चार भिंतीत, छपराखाली असू, तिथून पडतो आणि ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो असं लोकांना झालेलं असायचं.

‘ही सगळी महामहीम नितीनजी गडकरी यांची कृपा…’ बबड्या मनातल्या मनात म्हणायचा. गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्यांचे आणि अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाड्यांचे सायरन आकाशवाणी, दूरदर्शनच्या जुन्या काळामधल्या सुमधुर धून असलेले असले पाहिजेत, असा कायदाच त्यांनी करून घेतल्यामुळे सगळीकडचेच रस्ते संगीतमय होऊन गेले होते. त्यात ट्रॅफिक जॅममध्ये अडकणं म्हणजे तर झुबिन मेहतांचा वाद्यमेळ ऐकायला बसण्यासारखंच. फक्त त्यात सगळी भारतीय वाद्यं. एरवी शेजारून अ‍ॅम्ब्युलन्स गेली तरी ज्यांच्या छातीत धडधडायचं त्यांना हल्ली तिच्या सायरनऐवजी आकाशवाणीची ती धून ऐकू आली की अलगद मोरपीस फिरवल्यासारखं वाटायला लागलं होतं. सुनसान रस्त्यावरून वेगाने येणारी एखादी रॉयल एनफिल्ड एखाद्या वळणावर, एखाद्या खुणेच्या घराजवळ तबला बडवून जायची किंवा एखादा अजस्त्र ट्रक लांबूनच कुणी तरी दिसलं की माऊथ ऑर्गनचे सूर छेडायचा तेव्हा त्याच्या त्या अगडबंब धुडाशी ते विसंगत वाटायचं खरं, पण आधीच्या पों पों करत जाणाऱ्या हॉर्नपेक्षा ती मंजुळ सुरावट कान तृप्त करत जायची.

गडकरींनी हॉर्नसाठी बासरी, तबला, व्हायोलीन, माऊथ ऑर्गन आणि हामोनियम ही पाच वाद्यंच ठरवून दिली असली तरी काही नतद्रष्ट मंडळींनी त्याहीपुढे जात ढोल, ताशे, तुतारी, पिपाणी, नाशिक बँजो या वाद्यांचाही आपापल्या वाहनांमध्ये हॉर्न म्हणून बिनधास्त वापर केला होता. पण बासरी आणि व्हायोलीनच्या नाजूक सुरावटींसमोर त्यांचा धडधडाट इतका उठून दिसला की दुसऱ्याच दिवशी ती वाहनं जप्त झाली आणि वाहनचालकांना जबर दंड झाला. तेव्हापासून सगळ्यांनीच अशा गडगडाटी वाद्य मंडळींचा धसका घेतला आहे. आता कसं सगळं गार गार आहे. शाळा भरण्याची वेळ असो वा सुटण्याची, हॉस्पिटलचा परिसर असो वा मॉलचा, पुण्यातला लक्ष्मी रोड असो वा दादरचा रानडे रोड… वाहनांची गर्दी आणि त्या गर्दीत वाजणारे हॉर्न म्हणजे कटकट उरलेली नाही, तर मिनि सवाईसारखे कार्यक्रमच गल्लोगल्ली भरले आहेत, असं सगळ्यांना वाटायला लागलं आहे. मंत्रिमहोदयांच्या आदेशाच्या एका फटक्यात सगळा देश एक म्युझिकल होऊन गेला आहे.

Story img Loader