शहरालगतच्या त्या नाना-नानी पार्कात येणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय ज्येष्ठांचा बुधवार नेहमीच गप्पाटप्पांचा असतो. हास्य क्लबला त्या दिवशी सुट्टी असते. पण आज सारेच सुतकी चेहरे करून बसल्यासारखे का दिसताहेत? ‘चिंताक्लब’तर नाही सुरू झाला एखादा? ‘सुरू नाही झाला, पण या-या असल्याच बातम्या दिल्यात तर होईल सुरू. अख्ख्या वाचून दाखवतात. देशाभिमान तर नाहीच, मग बसतात चेहरे पाडून.. कसं होणार, काही खरं नाही म्हणत..’ – तिरीमिरीतच पार्काबाहेर निघालेले अण्णा म्हणाले. कसली बातमी? ती अण्णांच्या मोबाइल पडद्यावर, उघडलेलीच होती. ‘एअरव्हिज्युअल’ नावाच्या कुणा संस्थेने ‘ग्रीनपीस’च्या सहकार्याने जगातल्या सर्वात प्रदूषित शहरांची यादी केली, त्यात भारतातील २२ शहरे पहिल्या तिसांमध्ये आहेत. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा वगैरे भारताच्या ‘राजधानी क्षेत्रा’त मोडणारी पाचही शहरे अतिप्रदूषित आहेत. जगातील सर्व देशांच्या राजधान्यांपैकी दिल्लीच सर्वाधिक प्रदूषित आहे. भारताच्या उत्तर भागातील पाटणा, लखनऊ, जोधपूर, मुजफ्फरपूर, वाराणसी, गया, कानपूर, कोलकाता अशी २० शहरे पहिल्या २५ प्रदूषित शहरांत आहेत, मुंबईचा क्रमांक ७१ वा असून त्यानंतर औरंगाबाद, नागपूर आणि पुणे ही कमी-कमी प्रदूषित शहरे आहेत.. बातमी वाचत असतानाच स्वत:चा मोबाइल खेचून घेऊन – ‘ग्रीनपीसचा कट आहे हो सगळा..’ – म्हणत अण्णा तरातरा निघाले. पार्कामधून दाराकडे येणारा ज्येष्ठांचा घोळका त्यांना जणू दिसला असावा. या घोळक्यातून उलगडा झाला तो अण्णांच्या देशभक्तीविषयी आदर वाढविणारा आहे. काय झाले असावे, याची कल्पना उपलब्ध माहितीवरून आपण करू शकतो. ‘ग्रीनपीसचा भारतविरोधी कट आहे हो सगळा..’ हे वाक्य अण्णांनी पार्कातही, बातमी ऐकताक्षणी उच्चारले, तेव्हा ‘खाई त्याला खवखवे’ अशी त्यांची हेटाळणी झाली. तरीही ते गप्पा सोडून निघून न जाता थांबले. तर बाकीच्या साऱ्यांनी- अगदी स्मिताताईंनीसुद्धा – हेटाळणीखोराचीच बाजू घेतली. ‘खाई त्याला खवखवे’चा रोख होता तो ग्रीनपीस या आंतरराष्ट्रीय संघटनेची ज्या प्रकारे कोंडी करण्यात आली त्यावरच, हे अण्णांनी क्षणार्धात् ताडले होते. उसळून अण्णांनी किल्ला लढविला. अक्षरश: एकहाती. ‘पाहा पाहा पाहा.. म्हणे मुंबई कमी प्रदूषित- अरे का म्हणून? यांचे छुपे अर्बन नक्षल मुंबईतच असतात ना? म्हणून! आणि बरोब्बर गौरक्षकांचीच शहरं कशी हो प्रदूषित दिसतात यांना? आँ?’ यावर, हे फक्त हवेतल्या ‘पीएम२.५’ नावाच्या सूक्ष्मकणांनी होणारे प्रदूषण आहे, बाकीचे नव्हे, हे सांगण्याचा प्रयत्न काहींनी केला. ‘पीएम२.५’ची मात्रा हवेत किती आहे हे मोजण्याची यंत्रे अगदी पाच-सहाशे रुपयांपासून ते चारेक हजार रुपयांपर्यंत कुणीही विकत घेऊ शकते आणि ‘एअरव्हिज्युअल’सारख्या संस्थांनी तर अॅप लोकांहाती दिल्यामुळे, मोजलेली माहिती चटकन त्या संस्थेकडे जाऊ शकते, हे कालच ब्रिटनस्थित मुला-नातवंडांकडून मिळालेले ज्ञानही स्मिताताईंनी अण्णांना देऊ केले. ‘चुलीत घाला तुमची ती यंत्रं- ग्रीनपीसनं नादी लावलंय साऱ्यांना’, असे म्हणत अण्णा थरथरू लागले तेव्हा ‘कसं होणार’, ‘काही खरं नाही’ असे हताश- चिंताग्रस्त आवाज उमटत होते. देशबांधवांची ही हताशा असह्य होऊन अण्णा चालते झाले.
हवेतले आरोप..
जगातील सर्व देशांच्या राजधान्यांपैकी दिल्लीच सर्वाधिक प्रदूषित आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 07-03-2019 at 01:10 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most polluted cities 22 of 30 most polluted cities in world are in india india air pollution