(तळटीप – या मजकुरातील सर्व पात्रे प्रत्यक्षात अस्तित्वात असून प्रसंगदेखील फारसे काल्पनिक नाहीत. मात्र, असेच प्रसंग किंवा या पात्रांशी मिळतीजुळती पात्रे अन्यत्र कोठे आढळल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा.) देशातील एका मोठय़ा राज्यात राजकीय दबदबा असलेल्या एका कुटुंबात सत्तास्पध्रेतून दुफळी निर्माण होते. एकाच कुटुंबातील, रक्ताच्या नात्यातील दोघांची फाटाफूट होते आणि एक नवाच राजकीय पक्ष जन्माला येतो. मग कार्यकत्रे संभ्रमात पडतात. ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी त्यांची मानसिक अवस्था होते. त्यातून हे कार्यकत्रे स्वत:स सोयीस्कर असा तोडगा काढतात. मूळ पक्षाशी फारकत घेऊन नव्या पक्षाच्या नेत्याच्या पाठीशी उभे राहतात, तरीही त्यांच्या मनातील निष्ठेचा एक कोपरा मात्र, मूळ पक्षाच्या मूळ पुरुषाशी बांधिलकीने भारावलेलाच असतो. पुढे निवडणुका येतात आणि मूळ पक्षाच्या मूळ पुरुषापुढे पेच निर्माण होतो. आपल्याच कुटुंबातील आणि आपल्याला सारखेच प्रिय असलेल्या दोघांनी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी परस्परांच्या समोर दंड थोपटले असल्याने, आपण कोणाच्या पाठीशी उभे राहावे, या द्विधावस्थेत तो सापडतो आणि मध्यममार्गासाठी धडपडू लागतो. दोघांनीही एकत्र यावे असे त्याला वाटत असते. कार्यकर्त्यांचीही तीच इच्छा असते; पण हा प्रश्न किचकट असतो. मूळ पक्षाचा मूळ नेता दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करू लागतो. त्यासाठी दोघांच्याही घराचे उंबरठे झिजवितो. कार्यकर्त्यांना काही तरी आशेचे किरण दिसू लागतात, कारण एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याने कोणाचेच भले होणार नाही, हे मूळ पुरुषास माहीत असते. अगोदर तो मूळ पक्षातून बाहेर गेलेल्याच्या घरी जातो. मग आपल्याच कुटुंबातील, पक्षातून फुटून बाहेर पडत नवा पक्ष स्थापन केलेल्या या नेत्याच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होतात; पण त्याला फारसे यश येत नाही.. एका बातमीचा हा पूर्वार्ध!.. हे असेच अगोदरही कुठे तरी घडले आहे, असे वाचकांना वाटत असले, तरी ही बातमी गेल्या दोन-तीन दिवसांतीलच आहे. ती उत्तर प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीतून बाहेर पडून त्यांचा धाकटा भाऊ, शिवपाल यादव यांनी स्वत:चा नवा पक्ष- प्रगतिशील समाजवादी पार्टी- स्थापन केला आणि मुलायमसिंहांचे अनेक निष्ठावान कार्यकत्रे शिवपालांच्या पक्षात दाखल झाले. येत्या डिसेंबरात या पक्षाचे शक्तिप्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याने मूळ पक्षाचे नेता असलेल्या मुलायमसिंहांना अस्वस्थ वाटणे साहजिकच होते. पक्षातील या दुफळीनंतर आपल्या पुत्राचे, अखिलेश यादव यांचे कसे होणार या चिंतेची त्यात भर पडली आणि मुलायमसिंह यादव शिवपालांचे मन वळविण्याच्या कामी लागले; पण नवाच पेच निर्माण झाला. मुलायमसिंह यांनीच आपल्या पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवावी, असा देकार शिवपाल यांच्याकडून घेऊन मुलायमसिंहाना परतावे लागले. दोन पक्षांना एकत्र आणून ढळू पाहणारा राजकीय तोल सावरण्याच्या प्रयत्नात, कोणत्या बाजूस झुकावे अशी नवीच समस्या मुलायमसिंहांपुढे उभी राहिली आहे.. कार्यकत्रे अजूनही संभ्रमातच आहेत! असेच साधम्र्य अन्यत्र कोठे आढळल्यास, तो योगायोग समजावा!