पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला ‘अच्छे दिन’ म्हणतात, त्याला मराठीत ‘सुगीचे दिवस’ असे म्हणतात. या दिवसांत धनधान्य मुबलक असते, पाणीही भरपूर असते आणि ‘ओला चारा’ मिळाल्याने, गाय-बैलादी जनावरेही धष्टपुष्ट माजतात. अलीकडे दुष्काळाच्या सावटात पार करपून गेलेले हे सुगीचे दिवस कधी तरी पुन्हा पाहायला मिळतील, याकडे आम जनता डोळे लावून बसली असली, तरी राजकारणात वावरणाऱ्यांना मात्र, येत्या महिनाभरात सुगीचे दिवस- अर्थात ‘अच्छे दिन’ पाहायला मिळणार आहेत. परवा या दिवसांची वर्दी दिली गेली. देशाच्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.. संपूर्ण देशात याच दिवसांचे ‘मतलबी वारे’ वाहू लागतील आणि पाच राज्यांच्या राजकारणात ‘अच्छे दिन’ बरसू लागतील. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करताच लगेचच काही ‘माध्यमवीरां’नाही सुगीच्या दिवसांची स्वप्ने पडू लागली असावीत. निवडणुका जाहीर होऊन चोवीस तास उलटण्याच्या आतच पाहणी, सर्वेक्षणे आणि निकालांचे अंदाज वर्तविण्याचा धंदा सुरूदेखील झाला. पहिल्याच सर्वेक्षणात, चार राज्यांतील परिवर्तनाच्या वाऱ्यांची चाहूलही लागून गेली. आता ज्यांच्यासाठी ही चाहूलही अनुकूल असेल, ते नक्कीच सुखावले असतील. त्यामुळे त्यांच्यासाठी आगामी दिवस हे काही काळापुरते तरी ‘सुगीचे दिवस’ असतील, यात शंका नाही. केरळ हे पश्चिम किनारपट्टीवरचे, म्हणजे भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या ‘उजव्या अंगा’चे राज्य असले तरी तेथे पारंपरिकरीत्या ‘डाव्यां’चे वर्चस्व होते. गेल्या पाच वर्षांपासून या राज्यात त्यांचे काहीसे ‘बुरे दिन’ सुरू होते. आता केरळात स्वत:चीच ‘चांदी’ करण्याचे घोटाळेबाज उद्योग सुरू झाल्याने डाव्यांना ‘अच्छे दिन’च्या वाऱ्यांची चाहूल सुखावू लागली असेल. म्हणजे डाव्या कार्यकर्त्यांनाही सुगीच्या दिवसांची स्वप्ने पडू लागली असतील हेही ओघानेच आले. पश्चिम बंगालात ममतादीदीच्या ‘तृणमूल’ची पाळेमुळे फोफावणार, असा अंदाज लगेचच वर्तविला गेल्याने, तेथे ‘ओला चारा’ मुबलक होणार या सुखावह स्वप्नात ममतादीदी मश्गूल झाल्या असतील. तामिळनाडूत मात्र, ‘अच्छे दिन’च्या पायघडय़ांवर वावरणाऱ्या जयललितांच्या पक्षाचे वारे काहीसे फिरणार असे भाकीत ताज्या पाहणीने वर्तविल्याने, पुढच्या काही दिवसांत हे वारे थोपविण्यासाठी ‘अद्रमुक’ला ताकद पणाला लावावी लागणार आहे. ‘अच्छे दिन’ हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न. ते त्यांनी देशात रुजविले असले, तरी सत्तेवर आल्यापासून मोदी आणि त्यांच्या भाजपची नजर ईशान्येकडे लागली होती. ‘लुक ईस्ट’ हा नारा घेऊन सुरू केलेल्या कामाची फळे आता चाखावयास मिळतील या अपेक्षेने आता भाजपला काहीसे सुखावल्यासारखे झाले असेल.. विविधता हे आपल्या देशाचे सौंदर्य आहे. त्यामुळे कुठे तरी अच्छे दिन म्हणजे, सुगीचे दिवस सुरू झाले, तर तेवढय़ा जाणिवेनेदेखील इकडे दुष्काळात होरपळणाऱ्यांनी समाधान मानावे, अशी अपेक्षा करावी काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा