आता प्रतिमानिर्मितीची सारी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यासाठी गरजेचे असलेले वातावरणही समाजमाध्यमे आणि माध्यमांच्या मदतीने तयार झाले आहे. आणखी दोन-तीन दिवसांतच त्याची फळे पदरात पडावयास हवीत. अगदी उघड नसले, तरी, तिरुमला वेंकटरमणाला मनोमन तसे साकडे घातले आहे. स्थानिक धर्मगुरूंचे आशीर्वादही प्राप्त झाले आहेत. येत्या रविवारी, ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुमला मंदिराच्या दर्शनासाठी तिरुपतीस येतील, तेव्हा राज्याचे नवे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी हेदेखील त्यांच्यासोबत असणार आहेत. त्याच मंदिरदर्शन सोहळ्यात वेंकटेशाचा प्रसाद मोदींच्या हस्ते जगनमोहनांच्या कधीपासून पसरलेल्या हाती पडला, तर ते सोन्याहून पिवळे तर होईलच, पण शपथ घेतल्यापासून आजपर्यंतच्या आठवडाभराच्या काळात गाठी बांधलेल्या या साऱ्या पुण्याईचे फळदेखील प्राप्त होईल. आंध्रला विशेष दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे साकडे घालून सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहण्यात अगोदरचे कित्येक दिवस, महिने, वर्षे वाया गेली.. त्यापायी आधीच्या राज्यकर्त्यांनी स्वतवर धरसोडीचा ठपकाही लावून घेतला आणि अखेर जनतेनेही त्यांना त्यांची जागा दाखविली. आता या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावताच येणार नाहीत यासाठी केंद्रासोबत सहमतीचे राजकारण केले पाहिजे, हे ओळखून तर भेटीगाठींतून सौहार्द स्थापण्याची नीती अवलंबिली, समाजाच्या हिताची, बातम्यांमध्ये येतील अशी कामे केली. इफ्तार पार्टीवर एक कोटींचा खर्च करून धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडविले, तर कॅन्सरग्रस्त रुग्णाईत तरुणाच्या मदतीसाठी रस्त्यावर हात पसरणाऱ्या त्याच्या मित्रांच्या झोळीत क्षणाचाही विचार न करता २० लाख रुपयांचा मदतनिधी अर्पणही केला.. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांना मदत करणारी ऋत्य भरोसा योजनाही जाहीर केली. अशा तऱ्हेने, आंध्र हे समाजाशी, जनतेशी, मतदारांशी बांधिलकी जपणारे राज्य असून जगनमोहन रेड्डी हे या बांधिलकीच्या भावनेचे नायक असल्याचे पुरेसे चित्र आता उभे करण्यात आल्यानंतर तरी केंद्राच्या- म्हणजे मोदी सरकारच्या- हृदयास पाझर फुटावा अशी अपेक्षा करण्यात काहीच गैर नाही. दुसऱ्या बाजूने, ज्यांनी भरघोस विजयासाठी हातभार लावला, त्या समाजमाध्यमवीरांच्या फौजेप्रति ऋणभावनाही व्यक्त करून झाली.. समाजाला जेवढे देता येईल तेवढे देण्याकरिता राज्याची तिजोरी अपुरी पडू नये यासाठी तरी केंद्र सरकारने राज्याला विशेष दर्जा द्यावा या मागणीची झोळी पसरून आंध्रचे हे नवे मुख्यमंत्री केव्हापासून नरेंद्र मोदींच्या दिल्ली दरबारासमोर उभे आहेत. एका हातास मदत देण्याचे बळ मिळावे यासाठी दुसऱ्या हाताने रित्या झोळीत भर टाकावी लागते. आपल्यासमोर पसरल्या गेलेल्या प्रत्येक हातास माणुसकीचे दान देण्यासाठी तरी ही झोळी भरलेली हवी, हे ओळखून जगनमोहन रेड्डी यांनी केंद्रासमोर हात पसरले आहेत. त्या हातात विशेष दर्जाचे दान पडावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे. येत्या दोनचार दिवसांत पंतप्रधानांची पावले राज्याच्या भूमीला लागतील.. नेहमी पार पडणारा तोच, प्रेमळ संवादांचा आणि जिव्हाळापूर्ण मिठय़ांचा सोहळाही साजरा होईल आणि ते पाहून राज्याची जनता सुखावूनही जाईल. पण पसरलेल्या झोळीत ‘पुसली पाने’ पडतात, की दानाची फुले हे कुणासच माहीत नाही. तिरुपतीच्या डोंगरावर वसलेल्या त्या जगन्नियंत्या वेंकटरमणास तरी जगनमोहनाची ही व्यथा ठाऊक असेल ना?.. त्याने तरी त्यांना सद्बुद्धी द्यावी, कारण सुशासनाचा आदर्श म्हणून आंध्र प्रदेशाची ओळख निर्माण करायची आहे.. सारा अट्टहास तर केवळ त्याचसाठी आहे.

Story img Loader