जे काही दिसते, भासते, ते सारे म्हणजे ईश्वराची देणगीच असते, असे भगवान श्रीकृष्णापासून येशू ख्रिस्तापर्यंत सर्वानीच सांगून ठेवले असतानाही, आपल्याला छळणारा हा प्रश्न कधीच का सुटत नाही हे कोडेच आहे. या न्यायाने जगाकडे पाहिले, तर जे दिसते, ती सारी देवाची देणगी असते हे मान्य  करावे लागेल. मग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईश्वराची सर्वात महान देणगी आहेत, असे या पक्षाचे माजी अध्यक्ष आणि मोदी मंत्रिमंडळातील एक निष्ठावान मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले, तर त्यात वाद माजण्यासारखे काहीच उरणार नाही. मुद्दा एवढाच की, आपण सारे जणच जर देवाची देणगी असू, या विश्वात जे जे चराचर आहेत, ते सारेच देवाचीच देणगी असतील, तर नरेंद्र मोदी हेच देवाची देणगी आहेत, असे व्यंकय्यांना मुद्दाम भाजप केंद्रीय कार्यकारिणीच्या व्यासपीठावरून परवा सांगावेसे का वाटले असावे? माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगला मुक्तिलढय़ात बजावलेल्या भूमिकेनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींना ‘दुग्रेचा अवतार’ म्हटले होते, तर इंदिरानिष्ठेचे दर्शन घडविण्यासाठी ‘इंदिरा इज इंडिया अ‍ॅण्ड इंडिया इज इंदिरा’ असा नारा देबकान्त बरुआ यांनी देताच काँग्रेसने तो उचलूनही धरला होता. तिकडे दक्षिणेत कधी जयललिता तर कधी त्यांचे राजकीय गुरू एमजीआर यांना देवत्व बहाल करून त्यांच्या प्रतिमापूजनाचे कार्यक्रम जागोजागी होत असत, अजूनही होतात. सोनिया गांधींच्या एका निष्ठावंताने त्यांच्या शिरावर मुकुट चढवून त्यांची मूर्ती मंदिरात वसविल्याची घटनाही फार जुनी नाही. त्यामुळे, मुद्दा निष्ठेपुरताच मर्यादित असतो. याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपनेते शिवराज सिंह चौहान यांनी मोदी हे दैवी देणगी असल्याचे विधान केले, तेव्हा जणू ते तिरकस बोलताहेत असे समजून शिवराज सिंहांना झालेला तेव्हा साक्षात्कार कोणीही गांभीर्याने घेतला नव्हता. व्यंकय्या नायडूंना नरेंद्र मोदी यांच्यात दैवी देणगीचा साक्षात्कार थोडा उशिराच झाला; पण त्यांच्याच पक्षाचे दुसरे माजी अध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील वरच्या फळीतील नेते राजनाथ सिंह यांना मात्रअद्याप तशी काहीच प्रचीती आली नसावी. नाही तर, व्यंकय्या काय म्हणाले ते आपण नीटसे ऐकलेच नाही असे म्हणण्याची त्यांची िहमतच होती ना! काही निवडकांना थेट देवाची देणगी ठरवून समानतेच्या वरच्या स्तरावर नेण्याचा नायडूंचा  प्रयत्न स्वपक्षातीलच काही नेत्यांनी अद्याप ऐकलेला नसावा किंवा कानाआड करावा, हे योग्य नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा