सडय़ावरल्या आपल्या घराच्या अंगणातील दिवाळीआधी नव्यानेच नारळीच्या झावळांनी शाकारलेल्या मांडवाच्या सावलीत आरामखुर्ची टाकून वर्तमानपत्र वाचताना अचानक चिंतूनानाची नजर एका बातमीवर खिळली आणि त्यानं चुटकी वाजवली. सारवलेल्या खळ्यावर साचलेला कचरा काढताकाढता बाबल्या एकदम थबकला. आता चिंतूनाना काही तरी बातमी देणार हे बाबल्याला ठाऊक होतं. चिंतूनानाकडून रोज जगातली एक तरी बातमी समजत असल्याने लिहितावाचता येत नसल्याचं दुख बाबल्याला कधीच होत नसे. आज नानांची चुटकी वाजताच नेहमीच्या सवयीनं केरसुणी काखेखाली दाबून बाबल्या एका जागी उभा राहिला. नानाने त्याच्याकडे बघितलं. ‘ऐकलंस का बाबल्या, अमेरिकेन् ते यान चंद्रावर पाठवलान् म्हणतात ते काय खरं नाय रे.. मी तेव्हाच सांगितलं होतं. दिवसभर आकाशात गरगर फिरवून रात्रीच्या अंधारात नासाच्या मागच्या ओसाड परडय़ात कुठं तरी उतरवलानी आणि त्याचे फोटो काढून जगभर वाटल्यानी, अशी मला तेव्हाच शंका आली होता. चंद्रावर तो झेंडा फडकताना दाखवल्यानी फोटोत, आम्ही काय दुधखुळं हाय होय रे.. यांच्या  चंद्रावर वारा कुठून सुटला रे?’ अर्धवट स्वतशीच, अर्धवट बाबल्याशी बोलत चिंतूनानांनी अडकित्त्यात दाबून सुपारी फोडली आणि एक खांड तोंडात टाकून ते बातमी वाचू लागले. ‘पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेने चंद्रावर यान उतरविल्याची शहानिशा आता रशिया करणार आहे’.. नाना बाबल्याकडे बघत बोलले, आणि बाबल्यानं काखेतून                   केरसुणी हातात घेतली. अमेरिकेचं यान चंद्रावर उतरल्याची बातमी नानानं सांगितली, तेव्हा बाबल्या अगदीच पोरगा होता. ‘यान  म्हणजे काय’, असं त्यानं विचारलं, तेव्हा नाना काहीसे गोंधळले होते. ‘तुला कशाला हव्यात नको त्या चौकशा?.. तू कचरा काढ’.. असं त्यांनी बाबल्याला बजावलंही होतं. बाबल्याला ते आठवलं. रामाला पाळण्यातनं चंद्र दिसला, आणि तो त्यासाठी हट्ट धरून                रडायला लागला, ती एकच गोष्ट बाबल्याला माहीत होती. रामाच्या वेळी अमेरिका असती                तर त्यांनी यानातनं चंद्र आणायला कुणाला तरी पाठवलं असतं, असंही तेव्हा बाबल्याला              वाटलं होतं, आणि त्यानं तसं बोलूनही दाखवलं होतं, पण शंकेखोर चिंतूनानाला अमेरिकेच्या यानाची ती बातमी तेव्हाही खरी वाटलीच नव्हती. ‘यानबिन असं कायपण नसतं,’ असंच नाना  तेव्हा बोलल्याचं बाबल्याला आठवलं.. आज पन्नास वर्षांनंतर नानाच्या चेहऱ्यावर चमकणारा आनंद बाबल्याला दिसत होता. ‘अमेरिकेचं यान चंद्रावर उतरलेलंच नाही असं रशियानं सिद्ध केलं, तर माझी तेव्हाची शंका खरी ठरणार’.. चिंतूनाना म्हणाला. ‘आता अमेरिका मंगळावर गेली आहे म्हणे.. तिथले फोटूपण तपासून घ्या म्हणावं रशियाला’.. नानाचा आनंद गगनात मावत नव्हता. अमेरिकेन् सातवं आरमार बंगालच्या उपसागरात आणलान् तेव्हापास्नं नाना अमेरिकेचा पक्का विरोधक होता. आता ही बातमी वाचल्यावर तर नाना पक्का रशियावादी बनला होता. बाबल्यानं अंगणातला कचरा काढून गोळा केला आणि अंगणाच्या बांधावर बसून तळव्यावर तंबाखू मळत तो विचार करू लागला. ‘ते चंद्रावर गेले काय, नि नाय गेले काय.. आपल्या मंदिराची काय बातमी आसंल तर बगा नानानूं’.. बाबल्या बोलला, आणि चिंतूनानानं पेपराचं पान पालटलंन्..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा