ख्यातनाम दिग्दर्शक रिडले स्कॉटच्या नव्या कोऱ्या ‘मार्शियन’मधील अंतराळवीराने मंगळावर बटाटे पिकविले हे पाहिल्यानंतर हे सिनेमावाले आविष्कारस्वातंत्र्याच्या आडोशाने काहीही दाखवतात अशी भावनासंतप्त प्रतिक्रिया हिंदी परिकथासदृश विज्ञानपटांना सरावलेल्या प्रेक्षकांमध्ये नक्कीच उमटली असेल. मात्र इंग्रजीत असे साय-फाय चित्रपट सातत्याने निघत असतात आणि त्यात दाखविण्यात येणारे काल्पनिक शोध प्रत्यक्षात उतरल्याची उदाहरणेही पाहावयास मिळतात. सध्याच अंतराळयानातील नियंत्रित वातावरणापुरते भाज्या वगैरे पिकविण्याचे प्रयोग होतही आहेत. आता तर, ‘नासा’च्या अंतराळस्थानकात स्कॉट केली या अंतराळ-माळ्याने झिनियाचे फूल उगवून दाखविले आहे. झिनिया या पुष्पवनस्पतीचा वापर खाण्यासाठीही होऊ शकतो. आता या प्रयोगातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून मानव अंतराळात शेती पिकवील तो दिवस फार दूर नाही असे आपण निश्चित म्हणू शकू. एकदा ती कृषिक्रांती यशस्वी झाली की जगासमोरील अनेक प्रश्न नक्कीच दूर होतील, यात काही शंका नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने तर या प्रयोगाचे यश अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कारण त्यामुळे येथील शेतजमिनी ‘एनए’ करण्याचा मार्ग अत्यंत सुकर होईल. शेतजमिनी अकृषक करणे हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी असा राष्ट्रीय प्रकल्प आपण हाती घेतला आहे. त्यात अडथळा एकाच गोष्टीचा असतो. काही लोक या अत्यंत मौल्यवान अशा जमिनीमध्ये चक्क पिके वगैरे घेतात. त्याऐवजी तेथे इमारती पिकविणे ही केवढी लोककल्याणकारी बाब आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. मुळात शेतांचा वापर कुठलीशी धान्ये वगैरे पिकविण्याऐवजी सेझ, विमानतळ, धरणे अशा प्रकल्पांसाठीच झाला पाहिजे. एकदा अंतराळात शेतीवाडी सुरू झाली की हे सर्व विनाअडथळा करता येईल व त्यातून देशाचा विकास साध्य होईल. अंतराळात पाण्याचा प्रश्न बिकट असणार हे आहेच. एका धूमकेतूमध्ये पाणी सापडल्याच्याही बातम्या आहेत. मंगळावर तर ते जणू सापडलेच म्हणतात. पण तेथून ते पाणी आणणे गंगासागरातले पाणी जायकवाडीला नेण्याइतकेच अवघड. त्यापेक्षा अंतराळटँकर नेणे परवडेल. त्या कामी ‘नासा’सारख्या अंतराळ संस्थांना महाराष्ट्रातील टँकरलॉबी नक्कीच साह्य़ करू शकेल. तशी मदत तर आपल्या मराठवाडय़ातील साखर कारखानदारही करू शकतील अशी आम्हास खात्री आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या मराठवाडय़ात जे साखरसम्राट उसासारखे जन्माचे तहानलेले पीक घेऊ शकतात, ते पाण्याची कमतरता असलेल्या अंतराळस्थानकांत फुले पिकविण्याचे शास्त्र विकसित करू शकणार नाहीत? नक्कीच करतील. त्यांना फक्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या शेतीमंत्र्यांनी त्याबाबत पुढाकार घ्यावा. किंबहुना एक-दोन साखरसम्राटांना अभ्यासदौरा म्हणून अंतराळात पाठविण्याची व्यवस्थाही करावी. एरवी आपण इस्रायलला वगैरे असे दौरे नेतच असतो. हे त्याच्या पुढचे आपले एक पाऊल.

Story img Loader