गावाकडच्या एखाद्या लहानशा घरात, सुट्टीच्या दिवशी, पाहुणे म्हणून आलेल्या बच्चेकंपनीसोबत ‘व्यापार’चा खेळ खेळताना कागदी पैसा घेऊन मुंबईच्या कानाकोपऱ्यात फेरफटका मारत पैका जमविताना मिळालेल्या आनंदातून रुजलेले मुंबईप्रेम पुढे वय वाढत जाते तसतसे वाढतच जाते आणि कधी तरी ‘जिवाची मुंबई’ करायचे एक स्वप्न सोबत घेऊनच पहिल्या ‘मुंबईवारी’ची आखणी केली जाते. त्यात ‘म्हातारीचा बूट’ असतो, ‘राणीचा बाग’देखील असतो. राणीच्या बागेतील प्राण्यांच्या पिंजऱ्यासमोर ताटकळताना आपण मुंबईच्या गजबजाटाचे भान हरपतो. या बागेत पेंग्विनच्या जोडय़ांचे आगमन झाले आणि बागेच्या आकर्षण केंद्राला अधिकच बहर आला. इथे भेट देणे आणि वन्यसौंदर्य न्याहाळणे हा लहानांबरोबरच मोठय़ांचाही विरंगुळा होऊ लागला. आताशा, साऱ्या नजरा राणीच्या बागेत नव्या पाहुण्यांच्या आगमनवार्तेकडे लागलेल्या असतात. पेंग्विनला बाळ झाले, पाणघोडय़ाला पिल्लू झाले, तेव्हाही त्यांना पाहण्याचा पहिला मान पटकावण्यासाठी पर्यटकांची चढाओढ सुरू झालीच होती. एकंदरीत, राणीच्या बागेतील प्रत्येक नवा पाहुणा हे पर्यटकांचे कमालीचे आकर्षणच असते. हे लक्षात घेऊन पालिका प्रशासनही नवनव्या आकर्षणांची राणीच्या बागेत भर घालत असते. प्राणी आणि पक्षीनिरीक्षणाच्या मौजेत भर घालावी यासाठी पालिका नवनव्या युक्त्यादेखील वापरत असते. आता मुलांना आकर्षित करण्यासाठी राणीच्या बागेत एक सेल्फी पॉइंट तयार केला गेला आहे. तेथे मिकी माऊस आहे, डोनाल्ड डक आहे, आणि मुलांच्या भावविश्वाशी नाते जोडणाऱ्या कार्टून्समधील वेगवेगळ्या व्यक्तिरेखाही आहेत. छोटा भीम, मोटू, पतलू, चुटकीनेदेखील राणीच्या बागेत मोक्याच्या जागा पटकावल्या आहेत. एवढे सगळे जण जेव्हा एकत्र जमतात, तेव्हा साहजिकच, कोण कोठे आहेत हे पर्यटकांना पटकन कळावे यासाठी दिशादर्शक फलक लावावे लागतात. वाघ कोठे आहे, हरणांचे पिंजरे कोणत्या दिशेला आहेत, जिराफाच्या पिंजऱ्यात सध्या कोण आहे, मोरांचे पिंजरे पाहावयास जावे की नाही, पाणघोडय़ांचे पाणघर कोठे आहे, आणि पेंग्विनचा अड्डा कोठे आहे याची माहिती देणारे दिशादर्शक फलक जागोजागी लावणे हा व्यवस्थेचा भाग झाला. प्रत्येक वेळी राणीच्या बागेत गेले, की एखादा नवा फलक तेथे दिसतो, आणि कोणी तरी नवा पाहुणा राणीच्या बागेत आला आहे याची खबर मिळून पर्यटकांची पावले उत्सुकतेने त्या दिशेला वळतात..

येत्या महिन्याभरात असाच एक नवा फलक या बागेतील एखाद्या चौकात पाहावयास मिळणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. शिवाजी पार्कच्या परिसरातील महापौरांच्या बंगल्यात येत्या काही महिन्यांत बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभे राहणार आहे. महापौर बंगल्यातील स्मारकाचे भूमिपूजन झाले, की राणीच्या बागेत हा नवा फलक लागेल. वाघ, सिंह, पेंग्विन, मगरी, हरणांच्या पिंजऱ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील फलकांच्या रांगेत, ‘महापौर निवासाकडे’ अशा नव्या फलकाची भर पडेल. प्राणी पाहण्यासाठी फेरफटके मारणाऱ्या पर्यटकांना त्याचे आकर्षण असेल किंवा नाही, हे आत्ताच ठरविता येणार नाही. पण राणीच्या बागेत हा नवा पाहुणा येणार याची चर्चा मात्र आता सुरू झालीच आहे..