शनिवारी कामावरून परतल्यापासून चिंतू बेचैनच होता. वर्ष संपायला जेमतेम दोन दिवस उरले तरी नव्या वर्षांसाठी कोणता संकल्प करावा हेच त्याला सुचत नव्हते. काही तरी तडीस नेता येईल असाच संकल्प करावा एवढाच संकल्प सध्या पुरे, असे ठरवून तो रात्री अंथरुणावर पहुडला, पण त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. नव्या वर्षांत रोज डायरी लिहायची असा संकल्प आपण गेल्या वर्षी याच दिवशी केला होता असे त्याला वर्ष संपतासंपता अचानक आठवले. बाजूच्याच मेजावर कधीपासून पडलेल्या डायरीच्या कव्हरवर धूळ साचली होती आणि त्यावरील २०१८ या आकडय़ाचा सोनेरी रंगदेखील फिका पडला होता. नवे वर्ष आनंदाचे जावो असा व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मित्रांना पाठविलेला गेल्या वर्षीचाच संदेश या वर्षी पुन्हा फॉरवर्ड करून टाकावा असे ठरवून संकल्पाचा विचार चिंतूने सोडून दिला आणि पुढच्या काही मिनिटांतच त्याला गाढ झोपही लागली. तब्बल आठ तासांनंतर चिंतूला सकाळी जाग आली तेव्हा बाहेर चांगलेच उजाडले होते. तोंडात टुथब्रश खूपसूनच चिंतूने दरवाजा उघडला आणि कडीला अडकवलेले वर्तमानपत्र काखेत पकडून त्याने मुखमार्जन आटोपले. तोवर बायकोने चहाचा कप टेबलावर आदळला होता. ते पाहून, वर्षांचा अखेरचा दिवस तरी आनंदात जावा या विचारावरही चिंतूने पाणी सोडले आणि आज गप्प बसलेलेच चांगले असा विचार करून चहाचा घोट घेताघेता त्याने वर्तमानपत्र उघडले. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरच्याच आठवडय़ात कमला मिल कंपाऊंडमध्ये पबच्या आगीत १४ जण ठार झाल्याने आनंदावर विरजण पडणार या काळजीने तेव्हाही आपण बेचैन होतो, पण मुंबईकरांनी नेहमीचे स्पिरीट दाखवत नववर्षांचे स्वागत केले हे चिंतूला आठवले. यंदाही स्वागताच्या जल्लोषात कमतरता राहणार नाही, असा विचार करत असतानाच त्याची नजर एका बातमीवर स्थिरावली. वर्षअखेरीच्या दिवशी बार आणि पब रात्रभर सुरू राहणार हे वाचून चिंतूला बरेदेखील वाटले. भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी रात्रजीवनास चालना देण्याचे प्रयत्न करणाऱ्या आदित्यचे त्याला कौतुकही वाटले. सरत्या वर्षांच्या अखेरच्या रात्री तरी आदित्यचे स्वप्न रात्रीपुरते साकारणार असे वाटून, ‘आवाज कुणाचा’ असे म्हणण्याची ऊर्मी चिंतूच्या मनात दाटली, पण बायकोचे काही तरी बिनसल्याचे लक्षात आल्याने तो विचारच त्याने गिळून टाकला. त्याने मोबाइल उचलला आणि तो व्हॉट्सअॅपवर आलेले संदेश वाचू लागला. नववर्षांच्या आगमनाची चाहूल ग्रुपला लागली होती. त्यानेही भराभर काही संदेश फॉरवर्ड केले. नवे वर्ष आनंदाचे जावो असा मेसेज टाइप केला, आणि तो सगळ्या ग्रुपवर रवाना केला. सरते वर्ष कसेही असले तरी सारे जण त्याला जल्लोषातच निरोप देणार आणि नवे वर्ष कसेही असले तरी त्याचे जल्लोषातच स्वागत करणार या विचाराने चिंतूला बरे वाटले. त्याने हळूच बायकोकडे कटाक्ष टाकला. ती धुसफुसतच होती. वर्षअखेरीस बाहेर काय होईल ते होवो, आपल्या घरात फटाके वाजणार अशी चिंतूला खात्री झाली आणि फटाक्यांचा विचार मनात येताच तो चमकला. रात्री दहानंतर फटाकेबंदी असताना वर्षअखेरच्या मध्यरात्री फटाके वाजणार की नाही या विचाराने चिंतू पुन्हा चिंतातुर झाला.
चिंतू आणि त्याचे नवे वर्ष..
शनिवारी कामावरून परतल्यापासून चिंतू बेचैनच होता.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 31-12-2018 at 00:13 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year resolution