संक्रांत हा खरे तर, गोड बोलण्याचा दिवस. या दिवशी तरी शब्दाशब्दाला साखरेचा मुलामा चढवावा, अशी अपेक्षा यांच्याकडून ठेवण्यात गैर नाही. पण नितीनभाऊंना संक्रांतीचा विसर पडला. संक्रांतीच्या तिळगुळाच्या गोडव्याऐवजी, त्यांनी चक्क, गुळाच्या गोडव्यात घोळलेला कोवळा कडुनिंब चाखायला लावला. आपल्या संस्कृतीचे संक्रांतीच्या गोडव्याइतकेच पाडव्याच्या कडूपणाशीही नाते आहे हे खरे. पण संक्रातीच्या दिवशी तिळगुळाचा गोडवाच हवा. त्या दिवशी गुढीपाडव्याची कडुनिंबाची गोळी नको, हे माहीत असूनही नितीनभाऊंनी यवतमाळच्या साहित्यनगरीत घाऊक प्रमाणात कडुनिंबाच्या गोळ्यांचे डोस पाजले. अर्थात, सण चुकला असला तरी वेळ चुकली नाही. त्यांनी ते तसे करावयासच हवे होते. कारण गडकरी जे बोलले, ते इतर अनेकांच्या मनात कधीपासून असतानाही, ते बोलण्याचे धाडस कुणी करीत नव्हते. आडून आडून, कुजबुज आघाडय़ा चालवून, समाजमाध्यमे किंवा अन्य माध्यमांतून विचारांच्या पाटय़ा टाकून साहित्य क्षेत्रातील कुणी कधीमधी जो विचार दबक्या शब्दांत मांडत असे, तो विचार योग्य जागेवरून ठामपणे मांडून गडकरी यांनी अनेकांच्या मनातील ठुसठुस शमविली. आता, साहित्याच्या मंचावरून राजकारण्यांची लुडबुड नको, हे वाक्य साहित्य क्षेत्रातील कोणा श्रेष्ठीच्या मुखी अधिक शोभले असते. कारण, तसे बोलण्याचा खरा अधिकार त्यांचाच! शिवाय, साहित्य संमेलन हा त्यांच्या पहिल्या हक्काचा मंच! असे असतानाही, दोन-तीन दिवसांच्या साहित्यिक जत्रेत हे वाक्य थेटपणे बोलण्याचे धाडस कुणास का झाले नाही, अशी कुजबुजती चर्चा संमेलनस्थानी होणे साहजिकच! पण सारे जण या एका वाक्यासाठी एकमेकांच्या मुखाकडे पाहात राहिल्याने, सारी मुखे मूग गिळून गप्प राहात असतील, तर हा विचार पुढे येण्याची शक्यता तशी कमीच! नेमके हेच ओळखून, ज्यांना कानपिचक्या द्यायच्या त्यांनीच स्वत:स तसे बजावण्याचे कडवट कर्तव्य गडकरी यांनी बजावले, हे बरेच झाले. तसे पाहिले, तर साहित्यिक आणि राजकारणी यांचे संबंध विळ्याभोपळ्याचे असतात. म्हणजे, ते वैर नव्हे, तर नातेच असते. कोणत्या तरी एका क्षणापुरतेच ते एकमेकांस भेटत असतात, आणि भोपळ्यासही, स्वत:स कापून घेण्यासाठी विळ्याचीच गरज असते. विळा आणि भोपळा एकत्र आला, की भोपळ्याने विळ्याकडून स्वत:स कापून घेण्याचा सोहळा साजरा करावा यातही काहीच गैर नाही. त्यामुळे, राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात लुडबुड करू नये, असे बजावण्याचे श्रेय गडकरी यांच्या रूपाने एका राजकारण्यानेच घेतले हे बरेच झाले. साहित्यिकांच्यात तेवढे धाडस नाही. प्रत्येक संमेलनाच्या हंगामात ते स्पष्टच होत असते. गडकरी यांनी ती कोंडी फोडताना, साहित्यिकांच्या बोटचेपेपणाची नेमकी नस पकडली हेही बरेच झाले. साहित्यसेवेच्या मिषाने राज्यसभेच्या खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या आवाजात ती कोंडी फोडण्याचे धाडस नाही, हेही या निमित्ताने गडकरी यांनी दाखवून दिले. तसे पाहता, राजकारणातील अनेकांच्या जिभेवर साक्षात सरस्वती नांदत असतेच. तरीही राजकारणी कधीच साहित्यिक असल्याचा आव आणत नसतील, तर साहित्यिकांनीही त्यांचाच आदर्श ठेवावयास हवा. तसे झाले नाही, तर तिळगुळाच्या ऐवजी कडुनिबांची गुळात घोळलेली गोळी गिळायची वेळ येते. गडकरींसारख्या राजकारण्यास ते नेमके जमते हे बरेच आहे!

Story img Loader