चाळीतल्या जाळीत बसून बाहेरची गंमत पाहणाऱ्या फुरसुंगीच्या गालावर आज थोडी अधिकच लाली चढली होती. कोसळत्या बाजारभावात शेतकऱ्याला हात देणारी जात म्हणून जिल्ह्य़ात बोलबाला झालेल्या फुरसुंगीच्या कांदाचाळीतील चळत पाहात समाधानाने अंगणातल्या आरामखुर्चीवर बसलेल्या साहेबरावांनी कानाजवळच्या ट्रान्झिस्टरचा आवाज वाढविला. नेमक्या त्याच वेळी संसदेतल्या गदारोळाची बातमी वाजू लागली. आमच्या घरी कांदा, लसूण खायची फारशी प्रथा नसल्याने कांदा महागला असला तरी फरक पडत नाही, असे निर्मलाताईंनी सुप्रियाताईंच्या प्रश्नावर सडेतोडपणे सांगितले आणि ते ऐकून चाळीतले ते फुरसुंगी कांदे जाळीतल्या जाळीत जळजळीतपणे चरफडले होते. कांद्याविना स्वयंपाकघराचा गाडा चालविणाऱ्या निर्मलाताईंचा त्यांना रागही आला आणि त्यांच्या सालींवरची लाली थोडी आणखीच वाढली. सरकार आता इजिप्त आणि तुर्कस्तानातून कांदा आयात करणार अशीही बातमी पाठोपाठ वाजू लागल्यावर चाळीत आणखीच चुळबुळ सुरू झाली. एकमेकांआडून माना वर काढत फुरसुंगी कांदे जाळीआडून साहेबरावांकडे पाहात होते.
शेतकऱ्याला हमीभाव देण्याऐवजी केंद्र सरकार कांदा आयात करणार म्हणजे कांद्याचा पुरता वांधा होणार या विचाराने साहेबराव विषण्णपणे चाळीतल्या जाळीआडच्या कांद्याच्या ढिगाकडेच पाहात होते. शहरातली मोठय़ा पगाराची नोकरी सोडून गावाकडे परतलेल्या साहेबरावांनी शेतात फुरसुंगी जातीच्या कांद्याची लागवड केली तेव्हा एकरी दीड-दोन लाखांची कमाई कुठेच गेली नाही या हिशेबाने साहेबराव रोज खुशीत कांदे खात होते..
साहेबराव आरामखुर्चीतून उठून चाळीजवळ आले. डोळे भरून त्यांनी जाळीआडच्या कांद्यांची चळत न्याहाळली. भाव वाढल्यावर लासलगावच्या बाजारात नेऊन कमाई करण्याचे त्यांचे स्वप्न होते. गेल्या वर्षी भावच मिळाला नाही म्हणून रस्त्यावर फेकून उरलेल्या कांद्याचे खत करून पिकविलेला कांदा चाळीत बसून बाजाराला जायची वाट पाहात असतानाच आयात कांद्याने केलेल्या वांध्याची जाणीव कांद्यालाही झाली होती. शिवाय आता बाहेरचा कांदा बाजारात येणार म्हणजे बाजारातला आपला भाव उतरणार हेही त्यांना कळले होते. अगोदरच अवकाळी पावसामुळे पीक शेतातच वाया गेले असताना उरल्यासुरल्या आपल्याला आता चाळीतच सडून जायची वेळ येणार की काय या भीतीने काळवंडलेल्या कांद्याकडे पाहताना साहेबरावांच्या डोळ्यांत पाणी साचले होते. आणखी दोन-तीन महिने तग धरली तर मरगळलेल्या बाजार समितीत पुन्हा कांद्याचा घमघमाट सुटेल; पण तोवर शेतात अडकलेल्या पशापायी उभारलेले कर्ज आणखी फुगणार या विचाराने साहेबराव हैराण झाले. कांद्याचे दर वधारत असतानाच बाहेरचा कांदा आणून स्थानिक शेतकऱ्याचा वांधा करण्याच्या सरकारी धोरणावर चरफडत साहेबरावांनी चाळीचा जाळीदार दरवाजा उघडला आणि गोण्यांमध्ये भरलेला फुरसुंगी कांदा टेम्पोत घालून ते बाजाराकडे निघाले. अगोदरच अवकाळीचं पाणी भरल्याने फुगलेला कांदा पुरता कुजायच्या आत बाजारातून गिऱ्हाईकापर्यंत पोहोचला नाही तर तुर्कस्तानी कांदा आपल्या फुरसुंगीस कच्चा खाऊन टाकेल या चिंतेने चिडचिडलेल्या साहेबरावांचा टेम्पो बाजाराच्या दिशेने धावत सुटला होता. गोणीतल्या फुरसुंगी कांद्यांच्या साली भावाच्या भयाने काळवंडल्या होत्या..