तब्बल तीस वर्षांनंतर गुजरातमध्ये डांगच्या जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. गुजरात म्हणजे, सिंहांचे साम्राज्य! या भागात शिरून तेथील मातीवर आपल्या पंजाचे ठसे उमटविणे हे सोपे काम नव्हे. वाघाने ते करून दाखविले. हा वाघ महाराष्ट्रातून गुजरातेत गेला असावा, अशी शंका तेथील वनखात्याला वाटते, असे गुजरातचे वनमंत्रीच म्हणतात. ते खरेही असावे. आमच्या महाराष्ट्रातील विदर्भात असे धाडसी वाघ आहेत. ते बिनदिक्कत कुठेही शिरकाव करू शकतात, इतकेच नव्हे, तर आपले ठसेदेखील उमटवतात. सिंहाचे वर्चस्व असलेल्या प्रदेशात घुसलेला हा वाघ महाराष्ट्राच्या विदर्भातून तेथे गेला असावा, ही गुजरातच्या वनमंत्र्यांना वाटणारी शंका रास्त असू शकते. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रातील कोणासही त्याबद्दल कोणतीच शंकादेखील नाही. एका रात्री एका जंगलातून जात असताना एका शिक्षकास या देखण्या, दमदार वाघाचे दर्शन झाले आणि त्याने लगेचच ती खबर सर्वदूर पोहोचविली. गेल्या जवळपास तीन दशकांत या प्रदेशात फक्त सिंहांचाच वावर वाढला होता. यातील काही सिंह अगोदरच गुजरातबाहेर गेले आहेत, तर काही सिंहांना बाहेरचे वेध लागले आहेत, अशी वदंता आहे. मुळात, सिंह ही गुजरातची अस्मिता असली, तरी वाघाच्या अस्तित्वाची त्यांची आस कधीच लपून राहिलेली नव्हती. वाघ हेच गुजरातच्या आदिम प्रदेशातील जनतेचे दैवत असल्याने, दिवाळीतील वसुबारस नव्हे- ‘बाघबारस’ हा तेथे साजरा होणारा महत्त्वाचा सण असतो. आजही दिवाळीच्या पहिल्या दिवशी ही प्रथा पाळली जाते. म्हणूनच बहुधा प्रसन्न होऊन, अखेर दक्षिण गुजरातच्या डांगच्या जंगलात वाघोबाने दर्शन दिले. महाराष्ट्राच्या विदर्भातील वाघ कधी तरी गुजरातच्या सिंहांच्या प्रदेशात जाणार, असे येथील वनतज्ज्ञांना गेल्या काही दिवसांपासून वाटतच होते.

विदर्भातील एक वाघ तर गेल्या काही दिवसांपासून ज्या दमाने डरकाळ्या फोडू लागला होता, ते पाहता, तो वाघ गुजरातच्या सिंहांनाच आव्हान देण्याच्या तयारीत आहे, असा अंदाज त्या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात होताच, पण तसे उघडपणे कुणीच बोलून दाखवत नव्हते. वाघ असला तरी थेट सिंहाच्या गुहेत जाऊन त्यांना आव्हान देणे सोपे तर नसतेच, पण काहीसे धोक्याचेही असते, हे त्या जाणकारांना माहीत असल्यामुळेच, त्यांनी त्याची वाच्यता केली नसावी. त्यामुळे तशी केवळ कुजबुजच सुरू होती. पण अशा घटना काही लपून राहात नाहीत. हा धाडसी वाघ थेट डांगच्या जंगलात आढळला आणि वनखात्याच्या कॅमेऱ्याने त्याची छबीदेखील टिपली, त्यामुळे आता तो केवळ अंदाज, तर्क किंवा कुजबुज राहिलेली नाही. सिंहांच्या राज्यात वाघाचा शिरकाव झाला आहे, हे सत्य आहे, त्यामुळे आधी केवळ वर्तविले जाणारे सारे अंदाज आता खरे होताना दिसू लागले आहेत. गुजरातच्या जंगलात निर्भयपणे घुसलेला आणि सिंहाच्या साम्राज्यात बिनदिक्कतपणे वावरणारा हा वाघ विदर्भाचा असेल, तर महाराष्ट्राला त्याचा अभिमान वाटतो.

मराठमोळ्या ग्रामीण भागात ही बातमी पोहोचली असेल, तर तेथे नक्कीच एक आरोळी घुमेल, ‘शाब्बास रे माझ्या वाघा!’

Story img Loader