पद्मश्री शब्बीरमामू, गाय हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र पशू आहे त्यामुळे तिचे रक्षण केले तर हिंदू मतांची मोठी बेगमी करता येईल या हिशेबाने गोरक्षणाचा कायदा करण्याचा साक्षात्कार सरकारला झाला, त्याच्या किती तरी आधीपासून तुम्ही करीत असलेल्या मानवतेच्या, गोपालनाच्या कामाबद्दल तुम्हाला केंद्र सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानित केले आहे, ही बातमी तुम्हाला एव्हाना समजलीच असेल. आता, पद्मश्री म्हणजे नेमके काय, ती मिळाल्यावर काय होते आणि त्यामुळे आपल्या नेहमीच्या समस्या सुटतात का, तुमच्या गोशाळेतील गाईंच्या आणि तेरा जणांच्या तुमच्या कुटुंबाच्या जगण्यावरील या पद्मश्रीचे नवे सावट कसे असणार, अशा अनेक नव्या प्रश्नांची आता तुमच्या रोजच्या समस्यांमध्ये भर पडली असेल. तुम्हाला पद्मश्री मिळाली म्हणून तुमच्या सावलीत आश्वस्तपणे राहणाऱ्या शेकडो गाई आता नव्या आणि वेगळ्या आनंदाने मोहरून गेल्या असतील असेही नाही, किंवा पद्मश्री मिळालेला गोपालक म्हणून दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात तुमच्याच टीचभर अंगणावर एखादा पाणीदार काळा ढग येऊन अतिरिक्त पाऊस बरसून जाणार नाही, हे तुम्हालाही माहीतच असेल. तुम्ही, तुमचे तेरा जणांचे कुटुंब आणि पित्याच्या शिकवणुकीतून तुम्ही मायेने सांभाळलेले गोधन यांच्या दररोजच्या समस्या दूर होणार नाहीत, हेही तुम्हाला माहीतच असेल. बीड जिल्ह्य़ाच्या शिरुरजवळील दहिवंडी गावात उजाड, कुसळी रानभरल्या पाच एकरांच्या तुकडय़ावरील पत्र्याचा जेमतेम आडोसा केलेल्या तुमच्या चंद्रमौळी घरात तुम्ही आज ज्या वृत्तीने आणि ज्या स्थितीत जगत आहात, त्याच स्थितीशी तुमच्या भविष्यासही जुळवून घ्यावे लागणार आहे, हेच पद्मश्रीनंतरचे वास्तव आहे. फार तर, उद्या कधी तरी, सरकारी पाहुणे म्हणून तुम्हाला दिल्लीचे निमंत्रण येईल, सरकारी इतमामात तुम्हाचे स्वागत होईल, आणि शानदार समारंभात तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक हा बहुमानांकित पुरस्कार प्रदान केला जाईल. मग त्याचे एखादे शानदार छायाचित्र तुमच्या दोन खोल्यांच्या घरातील रंग उडालेल्या एखाद्या भिंतीवर लटकावता येईल.. जेव्हा जेव्हा तुम्ही किंवा तुमचे कुटुंब या छायाचित्राकडे पाहाल, तेव्हा तेव्हा, आपण सरकारच्या स्वप्नाला हातभार लावणारे महान कार्य करत आहोत असे तुम्हाला वा तुमच्या कुटुंबीयांना वाटू लागेल. पण शब्बीरमामू, तुम्ही कोणत्याही पुरस्कारासाठी किंवा सरकारी मोहीम म्हणून गोपालनाचे हे व्रत स्वीकारलेले नाही, याची तमाम समाजाला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या कामाचे पाय जमिनीवरच आणि मातीचेच राहतील याची समाजास खात्री आहे. त्या शानदार सरकारी सोहळ्यातील एका छायाचित्राची छाया तुमच्या वास्तव जगण्यावर पडू देऊच नका.. कारण, सरकारी किताबासाठी, बहुमानासाठी किंवा पुरस्काराच्या विचारापलीकडे जाऊन, पित्याच्या शब्दाखातर तुम्ही हे काम हाती घेतलेले आहे. या प्राण्यांची ‘जान से भी ज्यादा हिफाज्मत’ करण्याचे वचन तुम्ही तुमच्या पित्यास दिलेले असल्याने, त्या शब्दाचे मोल या किताबाहून किती तरी मोठे आहे. समाजाला ते मोल समजेल तेव्हा तुमच्या कार्याची खरी ओळख पटली असे म्हणता येईल. शब्बीरमामू, तुमच्या किताबाहून मोठा पुरस्कार तुम्ही तुमच्या कामातून कधीचाच मिळविला आहे, आणि त्याबद्दल तुम्ही सदैव आदर व अभिनंदनास पात्र आहात..
‘पद्मश्री’नंतरचे वास्तव..
शब्बीरमामू, तुमच्या किताबाहून मोठा पुरस्कार तुम्ही तुमच्या कामातून कधीचाच मिळविला आहे,
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-01-2019 at 01:01 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padmashri award 2019 shabbir sayyed life struggle