‘कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार’, ‘निष्पक्ष चौकशी झाल्यास माझे निदरेषत्व सिद्धच होईल’ आणि ‘मी दोषी आढळल्यास तात्काळ पद सोडेन’ वगैरे वाक्ये आता जुनी झाली आहेत. जगात अनेक देशांतील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि गोत्यात आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या वाक्यांचा वापर करून पत्रकारांचे कित्येक प्रश्न टाळले असतील, याला गणती नाही. दक्षिण आशियाई लोक या असल्या विधानांना हसण्यावारीच नेऊ लागले. आता कोणत्या वाक्यांनी वेळ मारून न्यायची, असा प्रश्न दक्षिण आशियातील आजी, माजी, भावी राजकारण्यांपुढे आ वासून उभा राहिला. तो पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आता सोडवून टाकला आहे, याबद्दल त्यांचे आजी, माजी, आणि भावी भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या वतीने अपरंपार आभार. पनामा पेपर्स प्रकरणात नवाझ यांचे नाव आले. या करबुडव्या बेटांवर कंपन्या स्थापून काळा पैसा पांढरा करण्यात नवाझ यांच्या लंडनवासी चिरंजीवाचाही सहभाग होता, हे जगजाहीर झालेले आहेच. पण खुद्द शरीफ हेही अशा कंपन्यांशी संबंधित आहेत, असा आरोप इम्रान खान यांच्या तेहरीक ई इन्साफ पक्षाचे कार्यकर्ते आणि वकील गौहर सिंधू यांनी केला आहे. तो खोटा मानला तरी शरीफ यांना या लंडनवासी चिरंजीवांकडून इतका अर्थपुरवठा होतो की, चार वर्षांत नवाझ आणि त्यांची पत्नी कुलसुम हे दाम्पत्य २०१२ सालात २६ कोटी (पाकिस्तानी) रुपयांच्या एकंदर मालमत्तेचे मालक होते, ती मालमत्ता अवघ्या चार वर्षांत दोन अब्जांवर- म्हणजे २०० कोटींवर गेली.  शरीफ यांची लँडक्रूझर गाडी ही आपल्या नरेंद्र मोदी यांच्या ‘दहा लाखांच्या सुटा’सारखीच, अज्ञात- अनामिक चाहत्याने दिलेली आहे. पण एकदा स्वीकारलेली भेट लिलावात वगैरे काढणाऱ्यांपैकी शरीफ नव्हेत. कितीही टीका झाली, तरी ही आडमाप आलिशान मोटारगाडी नवाझ शरीफच वापरतात. तेवढय़ावर न थांबता, भ्रष्टाचार पचविण्याच्या मुद्दय़ापुरते तरी दक्षिण आशियाचे नेतृत्व पाकिस्तानकडेच असू शकते, हेही खुल्या दिलाने मान्य करायला हवे. एकदा ते केले की मग, शरीफ यांनी परवाच मन की बातवजा राष्ट्रव्यापी प्रसारण झालेल्या भाषणात त्यांच्या देशाला जे सांगितले, त्याचा अर्थ आपल्याला कळू लागेल. पनामा पेपर्सबद्दल चौकशी समिती नेमण्याची मागणी केवळ इम्रान खानचा पक्ष तोंडाळपणे करीत असताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफसुद्धा ‘चौकशी झाली पाहिजे’ असे म्हणून शरीफ यांच्यावर दबाव वाढवत होते आणि या लष्करापेक्षाही शिरजोर असणाऱ्या दहशतवादी संघटनांपैकी ‘जैश’चा म्होरक्या मसूद अझर हादेखील जणू क्षी जिनपिंगच असल्याच्या थाटात, पनामा पेपर्स प्रकरणात राजकारण्यांनी गुंतावे याबद्दल नापसंती व्यक्त करीत होता. एवढय़ा दबावाखालीही शरीफ झुकले नाहीत. चौकशी फक्त पनामा पेपर्सची न होता सर्व काळातल्या सर्व भ्रष्टाचारांची होईल, असा आदेश आपण दिल्याचे त्यांनी जाहीर केले आणि ‘दोषी आढळल्यास पद सोडेन’ हे धृपद आळवल्यानंतर एक नवा अंतरा पेश केला.. ‘मी फक्त अल्ला आणि आवाम यांच्यापुढे झुकतो’ असे म्हणत त्यांनी तमाम लौकिक चौकशा, अघोषित लष्करशाही आणि तिच्या तोडीस तोड अघोषित दहशतवादी सत्ता या सर्व सत्ताकेंद्रांना मोडीतच काढून थेट अल्लाचा आणि लोकांचा कौल मागितला. निधडेपणाचा नवा धडा देऊन शरीफत्व टिकवण्याचा धडा जगाला नव्हे, पण दक्षिण आशियाला तरी शरीफ खचितच देत आहेत. अन्य देश या धडय़ाचा उपयोग कसा करणार, हेच आता पाहायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा