पेट्रोल स्वस्त झाल्याच्या बातमीनं सुखावलेलं तुमचं मन स्वस्ताईच्या काल्पनिक हिंदोळ्यावर झोके घेऊ लागतं. आता खिशाला थोडा आराम मिळणार या कल्पनेनं तुम्ही आनंदूनही जाता. हा सुखाचा क्षण विलक्षण असतो. पण वारंवार असे क्षण आयुष्याला चिकटूनच बसले, तर त्यातली गंमत मात्र टिकत नाही. स्वस्ताईची बातमी थोडीशी कर्णोपकर्णी होते, तोवर पेट्रोल-डिझेलवरच्या अबकारी करात वाढ झाल्याच्या बातम्या येतात. गेल्या दीड वर्षांपासून आपण तर अच्छे दिन येण्याची वाट पाहतोय, हे आपल्या सरकारला माहीत असते. म्हणूनच स्वस्ताईच्या बातम्या पेरून मनावर समाधानाची फुंकर मारण्यापुरता आणि सुखाची एक झुळूक आयुष्यावरून मोरपिसासारखी फिरवण्यापुरता काळजीवाहूपणा सरकारला
करावाच लागतो. पण सुख-दुख, गरिबी-श्रीमंती या तर मनाच्या अवस्था असतात. जेव्हा जेव्हा याचा विसर पडतो, तेव्हा तेव्हा सरकार नावाची जबाबदार व्यवस्था जागी होते. एखादा झटका देऊन, सुखाच्या आनंदात हवेत विहरणारी पावले जमिनीवरच राहावीत यासाठी सरकारी यंत्रणा सदैव काळजी घेत असते. पेट्रोल स्वस्त झाल्याच्या बातम्यांचे ढग विरण्याआधीच आलेल्या अबकारी करात वाढ केल्याच्या बातम्या हे कुणाला आनंदावरचे विरजण, तर कुणाला जखमेवरचे मीठ वाटू शकेल. पेट्रोल स्वस्त झाल्यावरही खिशाचा बोजा हलका होणार नाही, तरीही सरकारच्या तिजोरीत मात्र हजारो कोटींची भर पडेल, हे अर्थशास्त्र सामान्यांच्या कळण्यापलीकडचं असलं, तरी ते व्यावहारिक अर्थशास्त्र आहे. गेल्या महिनाभरात तीन वेळा अबकारी करात वाढ झाली, तरी त्याचा बोजा जनतेवर न टाकता सरकारी तिजोरीत अबकारी कराच्या वाढीव आकारणीतून दहा हजार कोटींची भर पडली असं सांगितलं जातंय. हा प्रकार काहीसा गमतीदार वाटेल, पण यामागचा व्यापारी व्यवहारवाद साध्यासुध्या चष्म्यातून दिसणार नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्याबरोबर काही दिवसांतच झालेली रेल्वेची दरवाढ, त्यानंतर घाईघाईने जुन्या दरात रेल्वेचे पास काढून घेण्यासाठी झालेली पळापळ, त्यातून रेल्वेच्या तिजोरीत जमा झालेली कोटय़वधींची पुंजी, नंतर दरवाढीला दिलेली स्थगिती हे सारं ज्यांना आठवत असेल, त्यांना त्या वेळी झालेली आपली तिरपीट आठवून आता हसूदेखील येत असेल. अशी छोटीशी व्यावहारिक चुणूक दाखवून खिशावर थेट डल्ला न मारताही एकरकमी पसा गोळा करण्याच्या या अर्थनीतीची आता आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून, पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्याच्या बातम्या ही अच्छे दिनच्या समजुतीच्या आनंदाची अनुभूती मानावी, आणि अबकारी कर वाढूनही आपल्या खिशाला त्याची तोशीस लागत नाही, यात समाधान मानावे. स्वस्ताईचा अनुभव घेता आला नाही म्हणून काय झाले?.. महागाईचे चटके बसले नाहीत याचे समाधान काही थोडके नसते..

Story img Loader