‘वापस दो, वापस दो, हमारे कपडे वापस दो, परत करा, परत करा, आमची ताब्यात घेतलेली वस्त्रे विनाशर्त आमच्या स्वाधीन करा’ या घोषणांनी लखनऊच्या गोमतीनगर पोलीस ठाण्यासमोरचा परिसर दणाणून गेलेला. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले येथील रहिवाशांचे आंदोलन ‘कव्हर’ करण्यासाठी आज माध्यमांनी गर्दी केल्याने घोषणांनाही जोम आलेला. तेवढय़ात आंदोलकांपैकी एक उठून बोलू लागतो, ‘भाईयों और बहनो, आपल्या ‘वस्त्रातिरेक विरोधी’ आंदोलनाला मिळणारा पाठिंबा बघून सर्वाचा हुरूप वाढला आहे. सध्या राज्यात निवडणुकीचे दिवस असल्याने विश्वगुरूंसकट अनेक महत्त्वाचे नेते दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रवासमार्गावर राहणाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गॅलरी व बाल्कनीत कपडे वाळत घालू नये, अशी सूचना पोलिसांनी केली. तशी नोटीस आमच्या सोसायटय़ांना मिळाली, पण काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांना ते कळवले नाही. जिथे कळवले तिथले लोक घरकामगार ताईंना तसा निरोप देण्यास विसरले. काहींच्या घरात वाळत घालण्याचे स्टँड नसल्याने त्यांनी नाइलाजाने गॅलरीचा वापर केला. काहींनी काळे कपडे घरात तर उर्वरित रंगाचे बाल्कनीत वाळत घातले. या साऱ्या चुका नागरिकांकडून सहज घडल्या. त्यात कोणताही अतिरेकी हेतू नव्हता. तरीही आदेश झुगारले म्हणून पोलिसांनी साऱ्यांच्या घरात जबरीने घुसून हे कपडे नेले. या कृतीला विरोध करणाऱ्या दहा महिला व चार पुरुषांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. आता दोन आठवडे लोटले तरी नेलेले कपडे पोलीस परत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे रहिवाशांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घरी घालायच्या कपडय़ांची संख्या कमी झाल्याने काहींना अनावश्यक खरेदी करावी लागली तर काहींना तेच तेच कपडे घातल्याने खाज व पुरळ येणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाइलाजाने हे धरणे आंदोलन सुरू आहे.’ भाषण संपताच पुन्हा घोषणाबाजीला वेग येतो. तेवढय़ात लाल टोपी घातलेले सपाचे काही कार्यकर्ते तिथे येतात व नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देऊ लागतात. त्यांचा आक्रमकपणा बघून पोलीस बंदोबस्त वाढवला जातो. हे कळताच भाजपचे काही लोक भगवे दुपट्टे घालून तिथे अवतरतात. नागरिकांच्या आडून आमच्या प्राणप्रिय नेत्याच्या सुरक्षेत ‘सेंध’ लावण्याचा सपाचा डाव उधळून लावू अशा घोषणा त्यांच्याकडून सुरू होतात. दोन्हीकडून सुरू झालेले घोषणायुद्ध काही क्षणात टिपेला पोहोचते. या गदारोळात कपडे आंदोलकांच्या घोषणा ऐकूच येत नाहीत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता हाणामारी होणार असा अंदाज येताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने दाखल होतात. तेवढय़ात ‘प्रियंका जिंदाबाद’ असा घोषणा देणारा एक समूह जवळ येताना दिसताच पोलीस त्यांना दूरच रोखतात. शेवटी सौम्य लाठीमार करून तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांना पळवून लावले जाते. या लाठय़ांचा फटका आंदोलनकर्त्यांनाही बसतो व काहींची डोकी फुटतात. त्यांच्या जखमांवर तात्पुरत्या पट्टय़ा बांधण्यासाठी काही जण नेसत्या वस्त्रांचे काठ फाडतात. एक वरिष्ठ गोमतीनगर ठाण्याच्या प्रमुखाला आंदोलकांसमोर उभा करतो. तो म्हणतो, ‘कायद्याचे उल्लंघन केले म्हणून तुमचे कपडे जप्त केले. नियमानुसार तुम्हाला ते कोर्टात जाऊन सुपूर्दनाम्यावर मिळवावे लागतील. आंदोलन करण्यापेक्षा वकील करा व कोर्टात जा.’ हे ऐकून रहिवासी पुन्हा भडकतात व आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करतात. मग तो वरिष्ठ त्या प्रमुखाला हळूच बाजूला नेऊन विचारतो, ‘‘क्यूं नॉन-इश्यू को इश्यू बना रहे हो?’’ त्यावर तो उत्तरतो, ‘‘सध्या देशभर तर हेच सुरू आहे सर!’’

Story img Loader