पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १५ ऑगस्ट २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात, एक महत्त्वाचा संदेश दिला आणि जनतेच्या अपेक्षा उंचावल्या.. ‘मला काय त्याचे, माझे काय जाते’ मानसिकता सोडा, ‘टीम इंडिया’ म्हणून म्हणून एकोप्याने काम करा, असे आवाहन त्यांनी जनतेला आणि यंत्रणेलाही केले होते. ‘आपण पंतप्रधान नव्हे, प्रधान सेवक आहोत’ असे सांगताना, ‘कर्तृत्व सिद्ध करा, अन्यथा बाजूला व्हा’, असेही त्यांनी शासन आणि प्रशासनातील कामचुकारांना बजावले होते. त्या शब्दांतून मोदी यांनी व्यवस्था बदलण्याचे, शिस्त लावण्याचे स्वप्न पाहिले होते, याचा विसर त्यांनाच पुन्हा सत्ता देणाऱ्या जनतेला पडलेला नाही. आपण सेवक आहोत असे पंतप्रधान स्वत: म्हणतात, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनीदेखील सेवकभावानेच काम करावे, अशी जनतेची अपेक्षा असावी.

मंगळवारी दिल्लीत पक्षाच्या मंत्री-खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी दांडीबहाद्दर मंत्र्यांची अक्षरश: हजेरी घेतली, तेव्हा पंतप्रधानांच्या त्या पहिल्या भाषणातील इशाऱ्याचा मंत्र्यांना विसर पडला की काय, असेच जनतेस वाटले असावे. मंत्री हा सरकारचा प्रतिनिधी असतो. संसदेच्या सभागृहात उपस्थित राहणे ही त्याची सामूहिक जबाबदारी असते. दांडी मारायची असेल, तर मला आधी कळवा, असे या बैठकीत मोदी यांनी मंत्र्यांना आणि खासदारांना बजावले. दांडीबहाद्दरांना वठणीवर आणणे आपल्याला चांगले जमते, असा थेट इशाराच मोदींनी दिल्याने पुन्हा एकदा, सरकारकडून असलेल्या जनतेच्या आशाआकांक्षांना नवी पालवी फुटली असेल, यात शंका नाही. गेल्या पाच वर्षांत अनेकवार व्यक्त केलेल्या आपल्या त्याच अपेक्षा मंगळवारच्या बैठकीत पुन्हा एकदा वेगळ्या रीतीने व्यक्त करून पंतप्रधानांनी मंत्र्यांना नवा इशारा दिला आहे. आपल्या मतदारसंघात विकासाची कामे करा, माणुसकी जपा, ‘मला काय त्याचे’ वृत्ती सोडा आणि जनतेची कामे करा, असेही त्यांनी मंगळवारच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांना सांगितले. संसदेत खासदार गैरहजर राहतात, सभागृहात किंवा कार्यालयातही मंत्री वेळेवर येत नाहीत, हा नाराजीचा पाढादेखील मोदी यांनी स्वत: पुन्हा एकदा वाचला. हीच नाराजी त्यांनी याआधीही अनेकदा बोलून दाखविली होती. पहिल्या जाहीर भाषणापासून मंगळवारच्या बंद दरवाजाआडच्या बैठकीपर्यंत अनेकवार अशी नाराजी व्यक्त करताना, पंतप्रधानांना आपल्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, एवढा धडा मंत्री किंवा खासदारांनी आता निश्चितच घेतला असेल.

‘कर्तृत्व सिद्ध करा, अथवा बाजूला व्हा’ असे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून बजावले, तो देशाचा ६८वा स्वातंत्र्य दिन होता. पुढील महिन्यात देशाचा ७३वा स्वातंत्र्य दिन साजरा होईल. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा, नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून राष्ट्रास उद्देशून आपले पहिले भाषण करणार आहेत. त्या भाषणात त्यांनी पुन्हा त्या, पाच वर्षांपूर्वीच्या पहिल्याच भाषणातील अपेक्षांची पुनरुक्ती करावी अशी जनतेचीच नव्हे, तर दांडीबहाद्दर मंत्री आणि खासदारांचीही अपेक्षा नक्कीच नसेल!

Story img Loader