ऊठसूट राष्ट्रगीत गायिले तरच आपल्या ‘राष्ट्रीयत्वा’वर शिक्कामोर्तब होईल असे आजकाल सगळ्यांनाच का वाटू लागले आहे? नावातच राष्ट्रीयत्वाचा पुरेसा पुरावा असूनही, राष्ट्रगीत गाण्यामुळे आपण ‘अधिक’ राष्ट्रीय ठरणार, असा आत्मविश्वास अनेकांच्या मनात अलीकडे बळावत चालला असताना, पंजाब नॅशनल बँक नावाच्या राष्ट्रीयीकृत बँकेलाही या विचाराची बाधा झाली, तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. १४ हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे अगोदरच कणा मोडलेला असताना त्यातून सावरण्यासाठी येनकेनप्रकारेण सरकारी कृपेचा लहानसा कटाक्ष आपल्याकडे वळावा यासाठी काही तरी धडपड करण्याची हीच योग्य वेळ आहे, हे समजण्याएवढे शहाणपण या बँकेच्या संचालक मंडळाकडे आहे, असे म्हणता येईल. बँकेच्या सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभांची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी असे कुणा भागधारकाने सुचविले आणि राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचा नामी उपाय सापडल्याच्या आनंदात बँकेच्या व्यवस्थापनाने त्यावर शिक्कामोर्तबही करून टाकले. कधीकधी एखादा आजार अधिक बळावला की औषधाची अधिक प्रभावी मात्रा रुग्णास घ्यावी लागते. बँकेच्या सद्य:स्थितीकडे पाहता, नीरव मोदी गैरव्यवहार प्रकरणानंतर बँकेचा पाय अधिकच खोलात चाललेला असल्याने, दररोज कामकाज सुरू होण्याआधी शाखाशाखांमध्ये वाजविले जाणारे प्रेरणागीत सद्य:स्थितीत पुरेसे बळ देणारे नसावे याची जाणीव व्यवस्थापनास झाली असणार.  पंजाब नॅशनल बँकेच्या नावात नॅशनल हा शब्द राष्ट्रीय जाणिवेचा पुरेसा पुरावा असला, तरी शाखांमध्ये दररोज वाजविले जाणारे प्रेरणागीत फारसे कामाला येत नसल्याने राष्ट्रीयत्वाची भावना नव्याने जागविण्याच्या एखाद्या उपायाच्या शोधात बँकेचे व्यवस्थापन होतेच. ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ हे प्रेरणागीत दररोज वाजवून व कर्मचाऱ्यांना, व्यवस्थापनातील वरिष्ठांना ऐकवूनही, दिवसागणिक शक्तिपाताच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीस रोखण्याकरिता केवळ प्रेरणागीत पुरेसे नाही, हे बहुधा एव्हाना कळून चुकले असावे. शिवाय, राष्ट्रगीताचे सामुदायिक गायन हाच राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून सिद्धच झालेले असल्याने, विशेष आणि सर्वसाधारण बैठकांची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याच्या प्रस्तावास बँकेच्या कार्यकारी अध्यक्षांनी ज्या तत्परतेने मंजुरी दिली, त्यावरूनच बँकेला मनोबल वाढविण्याची किती गरज आहे हे ध्यानात यावे.. अनुत्पादित मालमत्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी हा उपाय किती कामाला येतो ते अजून स्पष्ट झालेले नाही. एका भागधारकाच्या प्रस्तावानंतर सभांमध्ये राष्ट्रगीत वाजविण्याचा निर्णय घेणाऱ्या या बँकेला आपले मनोबल खरोखरीच वाढवायचे असेल, तर बँकेच्या शाखाशाखांमध्ये कामकाजाच्या सुरुवातीस वाजणाऱ्या ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या प्रेरणागीताऐवजी कामकाजाची सुरुवातही राष्ट्रगीताने करून दिवसाचे कामकाज संपेपर्यंत शाखाशाखांमध्ये राष्ट्रगीताच्या सुरावटींचे पाश्र्वसंगीत वाजत ठेवले तर?.. पुढच्या सर्वसाधारण सभेत एखाद्या भागधारकाने हा प्रस्ताव द्यावा आणि तो लगेचच अमलातही यावा.. तसे झाले तर कदाचित मनोबल अधिक लवकर ताळ्यावर येईल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा