माफी आधी मागणे बरे की नंतर, अशा द्विधा मन:स्थितीतच हा मजकूर लिहीत आहे. खरे तर आधीच माफी मागितल्यास नंतर नामुष्की ओढवत नाही. पण माफी कशाबद्दल आहे, हे तर कळायला हवे.. त्यामुळे ती नंतर मागणेच इष्ट. असो. हल्ली प्रत्यक्ष कृती ज्यांनी केलीच नाही, किंवा ज्यांनी धडधडीत चुकीचीच कृती केली, त्यांच्याकडेही ‘इरादे तर चांगले होते’ असे म्हणून सहिष्णूपणे पाहण्याची पद्धत रुळली आहे. तेव्हा माफी मागण्याचा इरादा आम्ही आधीच व्यक्त करीत असून, वाचकांकडून सहिष्णुतेची अपेक्षा करीत आहोत.
आम्ही कोण, हे वाचकांना माहीत आहेच. नसेल तर सांगतो- आम्ही रा. लेले यांचे शेजारी. या दोन शेजारील घरांच्या स्वामिनीदेखील अर्थातच एकमेकींच्या शेजारणी. रविवारी दुपारी या दोघी शेजारणींच्या गप्पा आमच्या दिवाणखान्यात सुरू होत्या, त्या आतल्या खोलीतून आम्ही ऐकल्या. माफी निव्वळ गप्पा ऐकल्याबद्दल मागावयाचे काहीही कारण नाही. आमच्याच घरातले आवाजही आम्ही ऐकायचे नाहीत म्हणजे काय?
या दोघी शेजारणींच्या गप्पांमध्ये आमची ‘ही’ अधिक हिरिरीने आणि ठसक्यात बोलत होती. ‘अग्गं येणारच नाहीत त्या एकत्र. उगाच काय? कशा येतील एकत्र त्या?’ असा ‘हि’चा सूर होता. लेलेंच्या ‘त्या’ काहीशा नरमाईने बोलत होत्या- ‘अगं पण नाही म्हटलं तरी जावा-जावा आहेत नं त्या?’ , ‘आणि वयंपण झालीत गं आता त्यांची नं?’, ‘शेवटी काही झालं तरी घराणं असतंच नं?’ असा त्या नरमाईच्या सुराचा आशय होता.
या नरमाईवर ठसक्याचं उत्तर ‘हे ब्बघ.. काय वाट्टेल ते झालं ना.. तरी लिहून देते तुला.. त्या दोघी काई एकत्र येत नाहीत. अगं वाघीण वाघीण काय, राजकारणासाठी चाल्लंय गं सगळं..’
आँ? राजकारण? वाघीण? ही कुठली मराठी मालिका? नाही नाही.. या दोघी राजकारणावरच बोलत होत्या. इथे आम्ही माफी मागणार आहोत. पण फक्त आमच्या हिची किंवा त्या दोघी शेजारणींची नव्हे. समस्त महिलावर्गाची माफी मागणार आहोत. होय.. आम्ही चुकलो. समस्त महिलांनो, आम्हाला माफ करा.. स्त्रिया राजकारणावर बोलू शकत नाहीत, असे आम्हांस वाटले होते. या देशाची पंतप्रधान एक महिला होती, तिच्या थोरल्या आणि धाकटय़ा अशा दोन्ही सुनांनी गेली सुमारे तीन दशके राजकारणात काढली आहेत.. एवढेच कशाला – जिला ‘मालिकेतली अभिनेत्री’ म्हणून पाहिले तीही आज राजकारणात उच्चपदे भूषविते आहे. तरीही आमचा पुरुषी अहंकार आम्हांस सांगत होता- ‘बायका काय- मालिकांबद्दलच बोलणार’!
एक वाघीण मारली जाते, त्यावर केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री असलेली धाकटी सून चवताळते, थोरल्या सुनेचा मुलगा विरोधी पक्षात असूनही मंत्रीकाकूंना एका ट्वीटद्वारे सूचक पाठिंबा देतो, त्याआधीच थोरली सून दिल्लीत धाकटय़ा सुनेच्या मंत्रालयातर्फे झालेल्या ‘ऑरगॅनिक मेळ्या’त चांगली दीड तास जाऊन येते.. या घडामोडी सध्या घडत असल्याने, ‘अवनी वाघिणीमुळे गांधी खानदान एकत्र येणार की काय?’ असे चऱ्हाट व्हॉट्सअॅप विद्यापीठात सुरू झाले. त्याचा परिपाक म्हणजे शेजारणींच्या या गप्पा.. मालिकांपेक्षा राजकारणच उत्कंठावर्धक, याची ग्वाही देणाऱ्या!