‘मारक शक्तीचा प्रभाव आहे’, हे खुद्द खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनासुद्धा आधी पटले नसणार, तर तुमचीआमची काय कथा? कथा आहे, ती प्रज्ञा यांचीच. ती अशी की, त्यांच्या कुणा – नेहमी अनामिकच राहणाऱ्या- ‘महाराजजीं’नी त्यांना कधी तरी सांगितले होते की मारक  शक्तीचा प्रभाव आहे.. ते त्या विसरूनही गेल्या होत्या.. पण आता भाजपच्या नेत्यांचे निधन  होऊ लागल्याने प्रज्ञा यांना स्वत:हून एवढेच- होय फक्त एवढेच- म्हणावेसे वाटले की, ‘महाराजजी किती खरे बोलत होते’! – खोटे वाटत असेल तर लावा हो तो व्हिडीओ आपापल्याच स्मार्टफोनांवर.. करा त्याचे विश्लेषण. विश्लेषणान्ती असाच निष्कर्ष निघेल की, प्रज्ञा यांनी स्वत:हून जे मत व्यक्त केले आहे, ते फक्त महाराजजी आणि त्यांचा खरेपणा, एवढय़ापुरतेच आहे. पत्रकारांना तरी प्रज्ञा यांनी केलेले ‘माहितीचे कथन’ कोणते आणि त्यांचे ‘स्वत:चे मत’ कोणते, याचा नीरक्षीरविवेक हवा होता.. पण नाही! हा नीरक्षीरविवेक कधीचाच बुडाला आहे आणि त्याचमुळे तर ‘नोटाबंदीमुळे असंघटित क्षेत्रातील लाखो नोकऱ्या गेल्या’ किंवा ‘जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे नव्हे तर उद्योगांचेही कंबरडे मोडले’ किंवा ‘यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील पावणेदोन लाखांचा अतिरिक्त खर्च दाखवण्यात आला होता’ अशापैकी एखाद्या ‘माहितीचे कथन’ करणाऱ्या पत्रकारांना जणू काही, ते स्वत:चीच मते मांडत आहेत अशा पद्धतीने झोडपण्याचे अभ्यासक्रम फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठांमध्ये आता पीएच.डी.पर्यंत पोहोचलेले आहेत. याच विद्यापीठांनी प्रज्ञा यांनाही असेच धारेवर धरले, तर नवल ते काय?

पण आमचे परमशेजारी नेने म्हणतात त्याप्रमाणे, विचारांचा प्रतिवाद हा विचारांनीच करायचा असतो. तसा तो करू गेल्यास प्रज्ञा ठाकूर या सामान्य खासदार व पक्षसेविकेवर  टीका करण्यात काहीही अर्थ नाही, हेही लगेच लक्षात येईल. शिवाय ‘तरीही याच प्रज्ञा ठाकूर यांना लोकांनी बहुमत कसे दिले?’ वगैरे  प्रतिप्रश्न करण्यातही अर्थ नाही. मुद्दा मारक शक्ती मान्य करायची की अमान्य करायची एवढाच आहे ना? मग प्रतिवादही त्याचाच हवा.

तो असा की, मारक शक्तींचा प्रभाव असू शकतो हे जर समजा मान्य केले, तर मग तारक शक्तींचाही प्रभाव असू शकतो हेही मान्य करावेच लागेल. ‘मारक शक्ती’ हा शब्दप्रयोग प्रज्ञा यांचा नसून त्यांच्या कुणा ‘महाराजजीं’चा आहे आणि आपल्या देशात ज्यांना ‘महाराजजी’ म्हटले जाते वा म्हणता येईल असे शेकडय़ाने आहेत. त्यामुळे त्या कुणा महाराजजींना तारक शक्ती मान्य आहे की नाही, हाही प्रश्न नाही. प्रश्न आहे तो, वैचारिक प्रतिवादासाठी आपल्याला ‘तारक शक्ती’ मान्य आहे काय, एवढाच.

ती मान्य का आहे, याचे पुरावे अनेक प्रकारे देता येतील. (असे म्हणून गप्प बसले, तरी वैचारिक युक्तिवादात आपण जिंकू शकतो; तरीही जिज्ञासा खरोखर कायम असेल तर फक्त त्या उरल्यासुरल्या जिज्ञासूंनीच ‘साध्वी प्रग्या’ किंवा ‘प्रज्ञा सिंह वादात’ असे गूगलावे. जे काही निष्कर्ष हाती येतील, ते प्रज्ञा ठाकूर यांच्याचवर तारक शक्तींचा प्रभाव आहे, हे सिद्ध करणारेच नसतील काय?)

Story img Loader