एका जंगलात एक ढाण्या वाघ राहत होता. संपूर्ण जंगलावर त्याची सत्ता होती. एकदा त्या जंगलात एक नवाच प्राणी आला. भरदार आयाळ, मोठ्ठा जबडा आणि अणकुचीदार नखे असलेला हा प्राणी पाहून वाघाने त्याच्याशी दोस्ती केली. दोघे मिळून जंगलावर सत्ता गाजवू लागले. दोघेही शिकारीत तरबेज होते. पण आयाळवाला प्राणी बाहेरच्या जंगलातून आलेला असल्याने, ढाण्या वाघाला वचकूनच असायचा. दोघांनी मिळून शिकार केली, तरी वाघ देईल तेवढाच वाटा खाऊन आयाळवाला प्राणी गप्प बसायचा. या जंगलात वाघाने आसरा दिला, म्हणून तो वाघाला मोठा भाऊ मानायचा. तरीही, हा प्राणी कधी तरी आयाळाच्या केसाने आपला गळा कापणार, अशी भीती वाघाला सतत वाटायची. पण सिंह एकटाच होता, आणि वाघाची पिल्ले तर जंगलात गल्लोगल्ली होती. एकटा सिंह स्वत:शीच सुस्कारे सोडत जंगलात वावरायचा. एकदा शेजारच्या जंगलातून एक सिंह फिरत फिरत या जंगलात आला. दोघांची भेट झाली, तेव्हा आपणही सिंह आहोत, आणि आपल्यासारखे सिंह शेजारच्या जंगलांवर राज्य करतात, हे या सिंहाच्या लक्षात आले. दोन सिंहांनी मिळून त्या रात्री खलबते केली. वाघाचे वर्चस्व यापुढे मानायचे नाही, पण त्याच्याशी दोस्ती मात्र तोडायची नाही, असे ठरले. काही दिवसांनी आणखी सिंह याच्यासोबत आले. एक मोठा कळप तयार झाला. सिंह एकटा होता, तोवर शांत होता, आता कळप झाल्याने आपल्याला धोका आहे, हे वाघाने ओळखले. आता शिकारीसाठी सिंहांना बरोबर घ्यायचेच नाही, असे वाघांनी ठरवले. वाघ आता फटकून वागतो, हे सिंहांच्या लक्षात आले, आणि एकमेकांना शह देण्याचे खेळ सुरू झाले. सिंहांनी तोवर आपल्यासाठी जंगलात काही गुहा हेरून ठेवल्या होत्या. शिकारीसाठी जंगलातले काही कोपरेही आखून घेतले. हळुहळू वाघावर कुरघोडी सुरू झाली, आणि वाघ त्रस्त झाले. पण सिंहांचा कळप खूपच मोठा झाला होता. आता सिंहांशी जुळवून घेऊन दोस्तीचे नाटक करतच वाघाला जंगलात वावरणे भाग होते. तरीही सारे काही ठीक होते. एके दिवशी सिंहाने गर्जना करीत संपूर्ण जंगलावरच हक्क सांगितला, आणि वाघांचे कळप अस्वस्थ झाले. शेवटी ती भीती खरी ठरली होती. एकाच जंगलात मित्र होऊन राहणारे वाघ आणि सिंह आता एकमेकांवर गुरगुरू लागले होते. सिंहांचा कळप आपली रुंद छाती काढून दिमाखात जंगलात फिरू लागला. गल्लीबोळात सत्ता गाजवू लागला. एका वाघाने तर नखे बाहेर काढत एका सिंहाला माजलेला बोका म्हटल्याने सिंहांचे टोळके अस्वस्थ झाले. आता काहीतरी होणार, या शंकेने जंगलातले लहानमोठे प्राणी भयभीत झाले. पण ते कधीच एकमेकांशी झगडणार नाहीत, असे जंगलातले काही अनुभवी प्राणी विश्वासाने सांगू लागले आणि गोष्ट खरी रंगात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा