आपल्या देशात एक कोटीहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेले शेतकरी असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली. शेती हा व्यवसाय किती फायदेशीर असू शकतो हे तर यातून दिसतेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे देशातील शेतकरी शेतीसंबंधित कारणांमुळे आत्महत्या करीत असतात ही एक प्रचंड मोठी दंतकथा असल्यावरच जणू शिक्कामोर्तब होत आहे. यापूर्वी आपल्या विविध पक्षीय मान्यवर नेत्यांनी ही गोष्ट अनेकदा स्पष्ट केली आहे, की शेतकरी हे आत्महत्या करतात ते शेती परवडत नाही म्हणून नव्हे, वा शेतीमुळे त्यांच्या डोक्यावर कर्ज झाले म्हणून नव्हे. आत्महत्येची कारणे आणखी वेगळी आहेत. त्यातील एक महत्त्वाचे व वारंवार चर्चिले गेलेले कारण म्हणजे शेतकऱ्यांची प्रेमप्रकरणे. एरवी शेती हा प्रचंड फायद्याचाच व्यवसाय. २००७-०८ ते २०१५-१६ या कालावधीत बेंगळुरू भागात ३२१, दिल्लीत २७५, कोलकात्यात २३९, चेन्नईत १८१, हैदराबादेत १६२, थिरुवनंतपुरममध्ये १५७ आणि कोचीमध्ये १०९ शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न एक कोटींहून अधिक असल्याचे नोंदविले आहे, यावरून ते दिसतेच. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे या कोटय़धीशांच्या यादीत मुंबईतील २१२ आणि पुण्यातील १९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या शेतकऱ्यांची नावे मिळवावीत व त्या ४०४ जणांचा शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून शिवाजी पार्कावर गौरव करावा. जेटली यांच्या म्हणण्यानुसार, या शेतकऱ्यांनी कर भरलेला नाही व ही काही चांगली बाब नाही. वस्तुत त्यात काहीही गैर नाही. ज्याप्रमाणे उदाहरणार्थ नोकरदारांचा एलटीए हा करमुक्त असतो, त्याचप्रमाणे शेती उत्पन्न हे कायद्याने करमुक्त आहे. किंबहुना त्यासाठी तर आज अनेक जण या व्यवसायात दाखल होत आहेत. त्यात आपले अनेक नेते, अभिनेते आहेत ही किती अभिमानाची गोष्ट. हे ४०४ त्यांपैकीच. त्यांच्याशिवायही अनेक जण आज एखादे शेतघर बांधून शेतकरी होत आहेत. अशी शेतघरे असलेले शेतकरी आपल्या इवल्याशा तुकडय़ातून ‘मेरे देश की धरती सोना उगले’ असे गात जे अमाप करमुक्त उत्पन्न काढतात त्याचा अभ्यास आपल्या शेतीशास्त्रज्ञांनी करायलाच हवा. शेती परवडत नाही, शेतीला व्यवसायाचा दर्जा नाही, शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नाचा भाव ठरविण्याची सोय नाही अशा गोष्टी गृहीत धरल्या जात नाहीत यांसारखी ओरड करणाऱ्या ‘ना-कर-त्या’ शेतकऱ्यांना त्यातून शेतीचे चार धडे तरी घेता येतील. आता काही जण असे म्हणतील की हे लोक खरे शेतकरी नसतातच. कर चुकविण्यासाठी त्यांना सातबारा हवा असतो इतकेच. शिवाय या लोकांमध्ये काही धनदांडगे बागायतदार जमीनदारही असतात. त्यांना कर भरणे भाग पाडलेच पाहिजे. पण असे म्हणणारांची नोंद आपण बळीराजाविरोधकांतच करावयास हवी. सामान्य शेतकऱ्याला पॅकेजांचा लाभ मिळत नाही, धन आणि बळदांडगेच ते पळवतात, वर शेतीच्या सर्व सवलती लाटतात असे म्हणणे हा बळीराजाद्रोहच. असे म्हणणारांविरोधात किमान व्हॉट्सअॅपवर कविता लिहायलाच हव्यात.
हा बळीराजाद्रोहच!
एक कोटीहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेले शेतकरी असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-03-2016 at 00:52 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prominent people hiding their taxable income as agricultural earnings